गोव्यातील बिर्ला मंदिर पाहण्यासाठी वाढत चाललेला उत्साह

बिर्ला मंदिराचे लोकार्पण झाल्यापासून लोकांमध्ये हे मंदिर पहाण्याची अनिवार उत्सुकता आहे आणि ती दिवसेंदिवस वाढतच चाललेय. ३ मे २०२३ रोजी या भव्य मंदिराचे उद्घाटन झाले आणि  तेव्हापासून बिर्ला मंदिराला भेट देण्यासाठी गोवेकरांइतकेच पर्यटकही उत्साहाने आणि अभूतपूर्व संख्येने येत आहेत. .

विशेष म्हणजे, हे मंदिर केवळ हिंदू धर्मीयांनाच नव्हे तर विविध धर्मीय पर्यटकांनाही आकर्षित करते. शांत वातावरण, अप्रतिम संगमरवरी वास्तुकला आणि आध्यात्मिक अनुभूती यांमुळे हे मंदिर गोव्यातील अवश्य भेट द्याव्या अशा ठिकाणांपैकी एक ठरले आहे.

Birla Mandir Night View
बिर्ला मंदिर पाहण्यासाठी रात्रीची वेळ सर्वोत्तम 

बिर्ला मंदिराचे रात्रीचे सौंदर्य अक्षरशः मन मोहून टाकणारे आहे. रात्रीच्या वेळी  प्रकाशझोतात न्हालेली संपूर्ण संगमरवरी वास्तू अधिकच आकर्षक दिसते आणि मंदिराचा दिव्य अनुभव अनेक पटींनी वाढतो.

याच कारणामुळे आम्ही मंदिराला दिवसा न जाता संध्याकाळी भेट देण्याचे ठरवले. मंदिर सुरू झाल्यानंतर लगेच जाणे शक्य झाले नव्हते. अखेर डिसेंबरच्या सुट्टीत आम्ही एक संध्याकाळ निश्चित केली आणि बिर्ला मंदिर पाहण्यासाठी निघालो.

बिर्ला मंदिर गोवा: स्थान, वेळा आणि कसे पोहोचाल?

बिर्ला मंदिर हे वास्को येथील  बिट्स पिलानी के. के. बिर्ला गोवा कॅम्पसमध्ये वसलेले आहे. त्यामुळे गोव्यातील तसेच बाहेरून येणाऱ्या पर्यटकांसाठी येथे पोहोचणे अतिशय सोयीचे आहे.

हे मंदिर पणजीपासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर असून येथे टॅक्सी किंवा खासगी वाहनाने सहज जाता येते. तसेच दाबोळी विमानतळ अगदी जवळ असल्यामुळे विमानाने गोव्यात येणाऱ्या पर्यटकांसाठीही हे एक उत्तम पर्यटनस्थळ ठरते.

बिर्ला मंदिर गोवा वेळा

सकाळी : ६.०० ते १२.००

दुपारनंतर : ३.०० ते रात्री १०.००

रात्री उशिरापर्यंत दर्शनाची सुविधा असल्यामुळे मंदिराच्या प्रकाशमय सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी संध्याकाळची वेळ अधिक योग्य ठरते.

संपूर्ण संगमरवरी वास्तुकलेचा अद्भुत आविष्कार

आम्ही सुमारे संध्याकाळी सातच्या सुमारास मंदिरात पोहोचलो. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांच्या रांगा पाहून मंदिरात किती गर्दी असेल याचा अंदाज येत होता.

रस्त्याच्या कडेने दिसणारा संपूर्ण मंदिर आणि परिसराची झलक डोळ्याचे पारणे फेडणारी होती. गाडी पार्क करून आम्ही मंदिरामध्ये प्रवेश केला. .

प्रवेशाशी असलेली कमान पाहताच आपल्याला आतील मंदिराच्या सौंदर्याचा अंदाज येतो. अतिशय सुबक कोरीव कामाने युक्त अशी ही कमान ह्या संपूर्ण वास्तूचे आणि परिसराचे सौंदर्यअधिकच खुलवते. 

सुरुवातीच्या काही पायऱ्या चढून गेल्यानंतर दोन्ही बाजूला श्री बसंतकुमार बिर्ला आणि श्रीमती सरलादेवी बिर्ला यांचे देखणे संगमरवरी पुतळे उभारण्यात आले आहेत.

संपूर्ण मंदिर, त्यातील मुर्त्या, बाहेरील हे दोन्ही पुतळे, प्रवेशाशी असलेली कमान सारे शुभ्र संगमरवरी दगडात उभारण्यात आले आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या कमानीपासून ते संपूर्ण मंदिर हे आधुनिक वास्तुशिल्पाचा नयनरम्य नमुना आहे.

Radhakrishna Birla Mandir Goa
Shiv Parvati Birla Mandir Goa
राधा-कृष्णांसह अनेक देवतांची सुंदर मंदिरे

बिर्ला मंदिर हे मुख्यतः राधा-कृष्णांना समर्पित असले तरी येथे इतर अनेक हिंदू देवतांच्याही सुंदर मूर्ती स्थापित करण्यात आल्या आहेत.

मंदिरात पुढील देवतांचे दर्शन घेता येते—

श्री गणपती

नंदीसह भगवान शिव आणि पार्वती

श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान

स्वतंत्र हनुमान मूर्ती

मंदिराच्या आतील भागातील कलाकुसरही तितकीच मोहक आहे. खांब, छत यावरील नक्षी काम अप्रतिम आहे. छतावर सुंदर कोरीव कमळे. तसेच इतरत्रही कमळे, मोर, हत्ती इत्यादीचे सुबक कोरीव काम पाहात राहावे असे आहे. मंदिरातील  देवतांच्या मूर्ती, त्यांचा अलंकार गोव्यातील इतर मंदिरांपेक्षा वेगळा आणि  ऐश्वर्य संपन्न वाटतो.

Hanuman Birla Mandir Goa
Shri Ganesh Birla Mandir Goa
भव्य सभामंडप आणि अप्रतिम कोरीवकाम

मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर समोरच्या राधाकृष्णाच्या दर्शनासाठी रांग लागलेली होती त्या रांगेत आमचा नंबर येईपर्यंत आम्ही उभे राहून सभोवतालचे निरीक्षण करत होतो.

दर्शन घेऊन झालेले अनेक पर्यटक मंदिराची आणि स्वतःचे फोटो काढण्यात मग्न होते. आमचा नंबर येताच कृष्णाचे डोळे भरून दर्शन घेतले आणि पुरोहितांनी दिलेला कच्च्या शेंगदाण्याचा प्रसाद घेऊन इतर देवतांचे दर्शन घेतले.

मंदिराला ही आमची पहिलीच भेट असल्यामुळे सभामंडपात शांत बसून ध्यान करण्याचा विचार होता. मात्र सभामंडपातील सुंदर संगमरवरी खांब, आकर्षक छतावरील कलाकुसर आणि देखण्या मूर्ती यांमुळे माझे लक्ष सतत त्या वास्तुकलेकडेच वेधले जात होते. मंदिराचे सौंदर्य इतके विलक्षण आहे की ते पाहण्यातच मन रमून जाते.

Birla Mandir Internal View
स्वच्छ परिसर, सुंदर उद्याने आणि भक्तिमय वातावरण

दर्शन झाल्यानंतर आम्ही मंदिराच्या परिसरात काही वेळ फेरफटका मारला.

मंदिराभोवतीची हिरवीगार उद्याने, स्वच्छ आणि नीटनेटका परिसर तसेच सर्वत्र पसरलेली शांतता मनाला विलक्षण प्रसन्नता देत होती. संपूर्ण परिसरात मंद स्वरात भक्तिगीते सुरू होती, ज्यामुळे वातावरण अधिकच आध्यात्मिक आणि भक्तिमय वाटत होते.

अनेक भाविक मंदिराभोवती प्रदक्षिणा घालत होते, तर काहीजण शांतपणे बसून त्या प्रसन्न वातावरणाचा आनंद घेत होते. अनेकांच्या ओठांवर भक्तिगीतांचे सूर आपोआप उमटत होते.

आम्ही मंदिरात प्रवेश केला तेव्हा “मधुराष्टकम्” हे मधुर स्तोत्र सुरू होते. त्यानंतर माझ्या आवडत्या  सूर्यगायत्रीचे रामभजन ऐकायला मिळाले आणि पुढे मला अतिशय प्रिय असलेल्या कुलदीप पैंच्या बालचमूचे हरे कृष्ण मंत्राच्या गायनाचे स्वरही कानी पडले. या मधुर भक्तिसंगीतामुळे मंदिरातील अनुभव अधिकच संस्मरणीय आणि आनंददायी झाला.

मंदिराचे दिव्य सौंदर्य, प्रसन्न वातावरण मनात साठवून घेत; आपल्या विलोभनीय सौंदर्याने आकृष्ट करण्याऱ्या मंदिराकडे परत परत वळून पहात आम्ही मागे फिरलो.

Shriram, Seetamata and Lakshman
गोव्यातील अवश्य भेट द्यावे असे पर्यटनस्थळ

तुम्ही श्रद्धाळू असाल किंवा उत्कृष्ट वास्तुकलेचे चाहते असाल, गोव्यातील बिर्ला मंदिर प्रत्येकाने एकदा तरी अवश्य पाहावे असे ठिकाण आहे.

शुभ्र संगमरवरी मंदिर, नयनरम्य उद्याने, स्वच्छ आणि शांत परिसर, मंदिराच्या मागील बाजूस असलेले आकर्षक नृत्य करणारे कारंजे (Dancing Fountains) आणि मनाला समाधान देणारे वातावरण या सर्व गोष्टी मिळून येथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाचा अनुभव अविस्मरणीय बनवतात.

केवळ एक धार्मिक स्थळ म्हणून नव्हे तर नागर शैलीमध्ये बांधलेल्या सुंदर वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना पाहण्यासाठी ह्या मंदिराला जरूर भेट द्यावी. येथे काही क्षण घालवले की मनाला शांतता,सात्विक समाधान आणि सकारात्मक ऊर्जा मिळाल्याची अनुभूती येते.

कॅटेगरी Goan Temples

error: Content is protected !!