गोव्याला येणाऱ्या अनेकांच्या आवडत्या पर्यटनस्थळांपैकी एक ठिकाण म्हणजे गोव्याची राजधानी, पणजी! मांडवी नदीच्या किनारी वसलेले हे सुंदर शहर नेहमीच पर्यटकांना आकर्षित करत असते. याच पणजी शहरातील एक छोटासा भाग म्हणजे मळा. पणजीतील अल्तिनो डोंगराच्या पायथ्याशी वसलेले हे छोटेसे उपनगर गोवन-पोर्तुगीज शैलीतील सुंदर घरांसाठी प्रसिद्ध आहे. फोंतेन्हास म्हणून ओळखला जाणारा हा परिसर पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे. मात्र याच मळा परिसरातील सर्वात आकर्षक आणि मळा प्रभागाची शोभा वाढवणारे ठिकाण म्हणजे येथील मारुती मंदिर! जे श्री मारुतीराय संस्थान आणि मारुतीगड म्हणूनही ओळखले जाते. पणजीतील सर्वात सुंदर आणि गोव्यातील अनेक देखण्या मंदिरांपैकी एक असे हे मारुतीचे मंदिर.
अल्तिनो डोंगरावरील मारुती मंदिर – पणजीचे सुंदर आकर्षण
अल्तिनो डोंगरावर वसलेले हे मंदिर पणजीमध्ये प्रवेश करताना अगदी अटल सेतूवरूनही दिसते. मंदिराचे विलोभनीय स्थापत्य आणि रात्रीच्या वेळी करण्यात येणारी आकर्षक विद्युत रोषणाई दुरूनही आपले लक्ष वेधून घेते.
विलक्षण स्थापत्यशैली असलेले श्री मारुतीराय संस्थान ज्या जागी उभे आहे, ती जागाच मनाला भुरळ घालणारी आहे. अशा या सुंदर जागी सुरुवातीला म्हणजेच इ.स. १९३४ साली एका छोट्या मंदिराची उभारणी करण्यात आली.
२३ जानेवारी १९३४ रोजी (माघ शुद्ध दशमी) मारुतीरायाच्या पूर्णाकृती संगमरवरी पाषाणातील मूर्तीची विधिवत स्थापना करण्यात आली.
मळा येथील डोंगराच्या पायथ्यापासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी सुरुवातीला केवळ एक पायवाट होती. पुढे हळूहळू तेथे पायऱ्या बांधण्यात आल्या.
मारुती मंदिराचा इतिहास आणि जीर्णोद्धार
इ.स. १९७४-७५ साली श्री मारुतीराय मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. त्यावेळी मंदिराचा भव्य सभामंडप बांधण्यात आला. तसेच मंदिराच्या पायथ्याशी सुंदर आणि कलात्मक प्रवेशद्वार उभारण्यात आले.
आज आपल्याला दिसणाऱ्या तेजस्वी केशरी-लाल रंगाच्या आधुनिक मंदिराची पुनर्बांधणी आणि विस्तार इ.स. १९८० ते १९९० च्या दशकात करण्यात आला.
आज हे मंदिर असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे, तसेच अनेक पर्यटकांसाठीही ते एक महत्त्वाचे आकर्षण ठरले आहे.
चहुबाजूंनी झाडाझुडपांनी आच्छादलेला डोंगराळ परिसर, डोंगराच्या पायथ्याशी असणारी नैसर्गिक झरी आणि सुंदर घरांनी नटलेला मळा गाव हे सारेच मनमोहक आहे.
मारुती मंदिरात कसे जावे? – पायऱ्या आणि वाहनाने जाण्याची सोय
पणजी येथील कदंब बसस्थानकापासून साधारण ३ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मंदिराकडे जाण्यासाठी डोंगराच्या पायथ्यापासून साधारण शंभर पायऱ्या चढाव्या लागतात. ज्यांना पायऱ्या चढून जाणे शक्य नाही, त्यांना मळा मार्गे किंवा अल्तिनो मार्गे वाहनाने थेट मंदिरापर्यंत पोहोचता येते.
मारुती मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण वास्तुरचना
श्री मारुतीराय संस्थान हे सुंदर वास्तुकलेचे एक उत्तम उदाहरण आहे. मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यरचना हेच त्याचे सर्वात मोठे आकर्षण आहे.
दोन चाके असलेल्या रथाच्या आकाराची मंदिराची रचना आहे. मंदिराचा उठावदार तांबूस केशरी रंग आणि मंदिर परिसराला लाभलेली हिरव्यागार निसर्गाची जोड यामुळे मंदिराचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. हे सगळंच अविस्मरणीय आहे.
मंदिरातील सुंदर कोरीव काम आणि आकर्षक मुर्त्या
मंदिराच्या समोर सुंदर अष्टकोनी दीपस्तंभ आहे.
मंदिरात प्रवेश करताच मुख्य गाभाऱ्याकडे जाणाऱ्या पायऱ्या चढण्यापूर्वी प्रथम आपल्याला तेल वाहण्यासाठी ठेवलेल्या छोट्याशा, पण सुबक काळ्या दगडातील मारुतीच्या मूर्तीचे दर्शन होते.
या मारुतीच्या मूर्तीच्या मागील बाजूच्या भिंतीमध्ये चौकोनी आकाराचा एक झरोका ठेवलेला आहे. या झरोक्यातून आपल्याला मंदिरातील मुख्य मूर्तीचे दर्शन घेता येते.
मंदिराच्या आतील बाजूस उत्तम लाकडामध्ये केलेले कोरीव कामही पाहत राहावे असे सुंदर आहे. चौकाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या सज्जांवर अष्ट लोकपालांच्या सुबक कोरीव मूर्ती आहेत.
गाभाऱ्याच्या वरच्या बाजूला श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि त्यांच्या समोर हात जोडलेल्या रामभक्त हनुमान यांच्या रेखीव कोरीव मूर्ती आहेत.
या मूर्तींच्या एका बाजूला ध्यानमुद्रेत बसलेला मारुती, तर दुसऱ्या बाजूला पंचमुखी हनुमान यांच्या अतिशय सुंदर कोरीव मूर्ती आहेत.
चौकाची रचनाही अतिशय देखणी आहे. चौकाच्या दोन्ही बाजूंना भाविकांना बसण्यासाठी उंचवटे बांधण्यात आले आहेत. सुंदर आणि विस्तृत खिडक्यांमुळे मंदिराच्या आतील भागाला एक वेगळेच सौंदर्य प्राप्त झाले आहे.
डाव्या बाजूला काचेच्या खोलीत पालखी ठेवलेली आहे. त्याचबरोबर जुन्या आणि नव्या मंदिराची दोन छायाचित्रेही येथे पाहायला मिळतात.
मारुती मंदिरातून दिसणारे पणजी आणि परिसराचे विहंगम दृश्य
मंदिराच्या बाहेर येताच आपल्यासमोर पणजीच्या पूर्वेकडील भागाचे भव्य दर्शन घडते.
डोंगराच्या पायथ्याशी वसलेला गाव, अटल सेतू, पाटो परिसर आणि दूरवर दिसणारे बांबोळी शहर हे सारे मंदिरासमोर बांधलेल्या सुंदर कठड्यावरून पाहता येते.
उंच डोंगरावरून दिसणारे पणजी शहराचे हे विहंगम दृश्य मनाला आनंद देणारे आहे. मंदिराच्या सुंदर स्थापत्याबरोबरच येथील निसर्गरम्य परिसर आणि शहराचे दृश्य यामुळे या मंदिराला भेट देण्याचा अनुभव अधिकच अविस्मरणीय ठरतो.
मारुतीगड जत्रोत्सव – मारुतीरायाची महापूजा आणि पालखी मिरवणूक
मारुतीराय संस्थान, मारुतीगडचा जत्रोत्सव अतिशय प्रसिद्ध आहे. दरवर्षी साधारणपणे फेब्रुवारी महिन्यामध्ये ही जत्रा भरते.
जत्रेच्या निमित्ताने मारुतीरायाची महापूजा आणि महाआरती केली जाते. यावेळी मारुतीरायाच्या पालखीची मिरवणूकही मळा परिसरातून काढली जाते.
जत्रोत्सवाच्या काळात मळ्यातील रस्ते विविध वस्तूंची दुकाने, खेळण्यांची दुकाने आणि खाण्यापिण्याच्या पदार्थांच्या स्टॉल्सनी गजबजून जातात.
मळा, पणजी तसेच गोव्याच्या इतर भागांतील अनेक भाविक यावेळी मारुतीरायाचे दर्शन घेण्यासाठी आणि जत्रेचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी करतात.
श्री मारुती मंदिर पणजी – दर्शनाच्या वेळा
अशा ह्या विलक्षण सुंदर आणि पुन्हा पुन्हा भेट द्यावी असे वाटणाऱ्या पणजीतील मारुती मंदिराच्या दर्शनासाठीच्या वेळा पुढीलप्रमाणे आहेत.
वार दर्शनाच्या वेळा
प्रत्येक शनिवार सकाळी ६.३० ते रात्री ९.३०
इतर दिवस – सकाळ सकाळी ७.०० ते दुपारी १२.००
इतर दिवस – संध्याकाळ संध्याकाळी ४.०० ते रात्री ८.३०