पारंपारिक गोवन पातोळ्यांची रेसिपी

काही पदार्थांची काही सणांबरोबर परंपरेने जोडी जमत आलेली आहे. प्रांतानुसार या पदार्थांच्या आणि सणांच्या जोड्या वेगवेगळ्या असतात. कारण प्रत्येक प्रांताचे स्वतःचे असे खास पारंपारिक पदार्थ असतात. गोव्याचेही स्वतःचे खास पारंपारिक पदार्थ आहेत. त्यातील काही पदार्थांच्या विशिष्ट सणांशी जोड्या जमलेल्या आहेत. जसे की, नागपंचमी आणि पातोळ्या, चवथ अर्थात गणेशचतुर्थी आणि नेवऱ्या (करंज्या), तसेच दिवाळी आणि पोहे.

नागपंचमी जवळ येताच बाजारात हळदीची पाने दिसू लागतात. महिलाही एकमेकींना “पंचमीक पातोळ्यो करतले मगो?” असे प्रश्न विचारू लागतात.

पातोळ्यांच्या कृतीमधला पहिला आणि अविभाज्य घटक आहे हळदीची पाने. पातोळ्या आणि हळदीच्या पानांचे हे समीकरण इतके घट्ट आहे की बरेच जण हळदीच्या पानांना पातोळ्यांची पाने असेच म्हणतात.

तर आता या स्वादिष्ट आणि पारंपारिक गोवन पातोळ्या कशा करायच्या, त्याची कृती पाहूया.

पातोळ्या

पारंपरिक गोवन पातोळ्यांसाठी लागणारे साहित्य

  • हळदीची पाने: ५–६
  • तांदळाचे पीठ: १ वाटी
  • खवलेला ओला नारळ: १ वाटी
  • गूळ: पाऊण वाटी
  • पांढरे तीळ: १ चमचा
  • वेलची पूड: अर्धा छोटा चमचा
  • मीठ: चवीपुरते
  • तूप: १ चमचा

गोवन पातोळ्या बनवण्याची कृती

१. प्रथम हळदीची पाने स्वच्छ धुवून घ्यावीत. पाने मोठी असतील तर त्यांचे दोन किंवा तीन भाग करावेत.

२. तांदळाच्या पिठामध्ये पाणी आणि थोडेसे मीठ घालून त्याचे जाडसर बॅटर तयार करावे.

३. एका कढईमध्ये चमचाभर तूप घालावे. त्यामध्ये पांढरे तीळ, ओले खोबरे आणि गूळ घालून चांगले परतून घ्यावे. सारण तयार होत आले की त्यामध्ये चिमूटभर मीठ आणि वेलची पावडर घालून व्यवस्थित एकत्र करावे आणि गॅस बंद करावा.

४. हळदीचे एक पान घ्यावे. त्यावर तांदळाच्या पिठाचे बॅटर पसरून घ्यावे आणि त्यावर नारळाचे तयार सारण पसरावे. त्यानंतर हळदीचे पान उभे किंवा आडवे दुमडून घ्यावे. अशाप्रकारे सर्व पानांमध्ये तांदळाचे पीठ आणि खोबऱ्याचे सारण भरून घ्यावे.

५. एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी तापत ठेवावे. त्यावर एक चाळण ठेवून त्यात सर्व तयार पातोळ्या ठेवाव्यात. चाळणीवर झाकण ठेवावे आणि या पातोळ्या मध्यम आचेवर साधारण १५ मिनिटे वाफवून घ्याव्यात.

६. पातोळ्या थंड झाल्यानंतर पानासकट अथवा पाने काढून सर्व्ह कराव्यात.

हळदीच्या पानांच्या सुवासाने दरवळणाऱ्या पातोळ्या

हळदीच्या पानाच्या सुवासाने सुखावणाऱ्या या स्वादिष्ट गोवन पातोळ्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कितीही खाऊ शकता. पोट भरेल पण मन भरणार नाही. अशा रुचकर लागतात पातोळ्या!

कॅटेगरी Goan Food

error: Content is protected !!