मशरूम म्हणजेच अळंबी, आजकाल बऱ्याच लोकांना आवडते. विशेषतः तरुण मुले मशरूमचे वेगवेगळे पदार्थ आवडीने खातात. परंतु ही अळंबी किंवा मशरूम हे कृत्रिम पद्धतीने पिकवलेले असतात. ह्या कृत्रिम पद्धतीच्या अळंबीपेक्षा ताजी अळंबी अत्यंत चविष्ट लागते. ही ताजी अळंबी पावसाळ्यामध्ये काही दिवस बाजारात आलेली आपल्याला पाहायला मिळते. अस्सल गोमंतकीय पद्धतीने बनवलेली अळंबीची शाकुती तर अप्रतिम चविष्ट असते.
काहीशी मांसाहाराशी जवळीक करणारी अळंबी शाकुतीची चव एकदा जरूर चाखून पहा.
ही शाकुती कशी करायची ते आता आपण पाहूया.
अळंबीच्या शाकुतीसाठी लागणारे पदार्थ
मुख्य पदार्थ
- अळंबी: एक पुडी (साधारण ६० ते ७०)
- ओले खोबरे: दीड वाटी
- एक मोठा कांदा: उभा चिरलेला
- एक मध्यम आकाराचा कांदा: बारीक चिरलेला
- एक टोमॅटो: बारीक चिरलेला
- तेल: दोन ते तीन मोठे चमचे
- हळद: अर्धा छोटा चमचा
- आले: अर्धा इंच
- लसूण पाकळ्या: पाच ते सहा
- मीठ: चवीपुरते
हिरवे वाटण करण्यासाठी लागणारे पदार्थ
- ताजी कोथिंबीर: एक वाटी
- लसूण पाकळ्या: १०-१२
- आले: अर्धा ते पाऊण इंच
- हिरवी मिरची: एक ते दोन
- लिंबाचा रस: एक मोठा चमचा
अळंबी शाकुती बनवण्यासाठी लागणारे मसाले
- सुकी मिरची: आठ ते दहा
- धणे: एक मोठा चमचा
- लवंग: २ ते ३
- मिरी: अर्धा चमचा
- दालचिनी: एक इंच
- जिरे: एक चमचा
- बडीशेप: अर्धा चमचा
- जायपत्री: लहान तुकडा
- तमालपत्री: एक
- हिरवी वेलची: २
- मसाला वेलची: एक
- चक्री फुल: चार पाकळ्या
- खसखस: एक चमचा
अळंबी शाकुती बनवण्याची कृती
- प्रथम अळंबीची सर्व माती काढून, तीन ते चार वेळा अळंबी स्वच्छ धुवून घ्यावी.
- आले, लसूण, कोथिंबीर, मिरची; लिंबाचा रस पिळून बारीक वाटून घ्यावे.
- सर्व सुका मसाला एक एक करून थोड्या तेलामध्ये भाजून घ्यावा. प्रथम सुकी मिरची भाजून घ्यावी. मग बाकीचे मसाले भाजून शेवटी खसखस भाजावी.
- थोड्या तेलामध्ये ५-६ लसणीच्या पाकळ्या, अर्धा इंच आले, उभा चिरलेला कांदा, तांबूस भाजून घ्यावे. ओले खोबरेही तांबूस भाजून घ्यावे.
- सारे भाजलेले मसाले आणि भाजलेला कांदा खोबरे थंड झाले की त्यामध्ये हळद घालून त्याची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यावी.
- एका कढईमध्ये एक ते दीड मोठा चमचा तेल गरम करावे.
- गरम केलेल्या तेलामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून दोन तीन मिनिटे हलकासा परतून घ्यावा. त्यामध्ये टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवून घ्यावा.
- आता ह्या कांदा टोमॅटोमध्ये बारीक वाटलेला हिरवा मसाला आणि थोडे मीठ घालून सगळे छान परतून घ्यावे. मसाल्याला साधारण तेल सुटले की यामध्ये स्वच्छ धुतलेली अळंबी घालावी आणि एक वाटी पाणी घालून वरती झाकण ठेवून अळंबी १५ ते वीस मिनिटे शिजू द्यावी. मध्ये मध्ये ढवळून पाणी आटले नाही याची खात्री करून घ्यावी. आवश्यक असल्यास थोडे पाणी घालावे.
- अळंबी शिजली की त्यामध्ये मसाल्याची बारीक पेस्ट घालावी. शाकुती मसाल्याची कन्सिस्टन्सी मध्यम जाडसर होईल इतपत पाणी घालावे.
- सुरुवातीला अळंबी शिजताना थोडे मीठ घातलेले असल्याने त्यानुसार मीठ घालावे आणि आठ ते दहा मिनिटे शिजू द्यावे.
बारीक चिरलेल्या कोथिंबिरीने सजवून गरमागरम वाढावे.
चपाती अथवा गोवन पाव किंवा पोळी बरोबर शाकुती अप्रतिम लागते. सोबत खरपूस तळलेले अळंबी रवा फ्राय असल्यास ही ताज्या अळंबीची शाकुती खाण्याची लज्जत आणखीनच वाढते.