देवकी आणि बाल कृष्णाचे भारतातील एकमेव मंदिर

गोव्यातील माशेल गावाचा उल्लेख आला की सर्वप्रथम डोळ्यासमोर उभे राहते ते शांत आणि सुंदर देवकी कृष्ण मंदिर.

ह्या मंदिराची विशेषतः म्हणजे  बाळकृष्ण आणि माता देवकी यांचे भारतातील हे एकमेव मंदिर आहे. देशभरात राधा-कृष्णाची अनेक मंदिरे पाहायला मिळतात. परंतु बाळ कृष्ण आणि त्याला मांडीवर घेतलेली त्याची जन्मदात्री माता देवकी यांचे अत्यंत भावनिक असे दुर्मिळ रूप इथे पाहायला मिळते.

देवकीकृष्ण मंदिराची रचना गोव्यातील इतर अनेक मंदिरांसारखीच आहे. मंदिर आणि मंदिराचा परिसर अत्यंत प्रेक्षणीय आहे.  गोव्यातील प्रत्येक मंदिराचे स्वरूप बहुदा ठरलेले असले तरी प्रत्येक मंदिराचे स्वतःचे असे वेगळे सौंदर्य आहे. एकाची दुसऱ्याशी तुलना करणे किंवा एकाला दुसऱ्यापेक्षा दुय्यम ठरवणे केवळ अशक्य आहे.

प्रत्येक श्रीकृष्ण भक्ताने भेट द्यावे असे गोव्यातील अनोखे देवकी कृष्ण मंदिर

गोव्यातील अनेक प्राचीन मंदिरांप्रमाणे देवकीकृष्ण मंदिराची वास्तुशैलीही पारंपारिक आहे. तरीही या मंदिराचे स्वतःचे एक आकर्षक वेगळेपण आहे. बाहेरील सभामंडप, गाभाऱ्यासमोरील महा मंडप किंवा चौक आणि सभामंडप व महा मंडपाच्या मधील अंतराळ असे देवकीकृष्ण मंदिराचे सर्वसामान्य स्वरूप आहे.

मंदिरात हळूहळू पुढे जाताना त्याची रचना अधिक सुंदरपणे उलगडत जाते. बाहेरील सभामंडप पुढे मध्यभागी असलेल्या अर्धमंडपाने महामंडपाशी  जोडलेला आहे आणि त्यापुढे गर्भगृह आहे. .

दोन्ही बाजूंनी खुला असलेला सभामंडप मजबूत खांबांवर उभा आहे. सभामंडपाच्या वरील कोनाकृती छताला बाहेरून लाल कौले आहेत, परंतु आतल्या बाजूने लाकडी पट्ट्याने सजवलेले हे छत आकर्षक दिसते.

Front view of Devaki Krishna Temple

मंदिरातील चौकाच्या छताचा आतील भागही सुंदर लाकडी कोरीवकामाने सजलेला आहे. छतावरच्या फुलांच्या कलाकृती, चौकाच्या दोन्ही बाजूच्या छताला लाकडानेच उतरत्या कमानीप्रमाणे दिलेला आकार. चौकात प्रवेश करताच उजव्या बाजूला असलेला वरच्या सज्जात जाण्यासाठीचा जिना हे सर्वच मंदिराच्या सौंदर्यात भर घालते. चौकात असलेले खांबही खूप रुंद आणि गोलाकार असल्याने लक्ष वेधून घेतात.

गर्भगृहाच्या चौकटीवर चांदीच्या पत्र्यावर नक्षीदार कलाकुसर केलेली आहे. तर गर्भगृहाच्या एकदम बाहेरील भिंतीच्या कमानीवरील चांदीच्या पत्र्यावर विष्णूचे दहा अवतार कोरलेले आपल्याला पाहायला मिळतात. याच कमानीच्या वरच्या भिंतीवर लाकडामध्ये कोरलेल्या देवकी कृष्णाची सुंदर मूर्ती आहे. गर्भगृहाच्या बरोबर समोर, चौकामध्ये प्रवेश करताच असलेल्या पहिल्या दोन खांबावरच्या लाकडी भिंतीवर; कुरुक्षेत्रावर श्रीकृष्णाला शरण आलेल्या अर्जुनाचे अत्यंत सुंदर कोरीव चित्र आहे.

एकूणच संपूर्ण मंदिर आणि मंदिर परिसर अत्यंत विलोभनीय आहे.

श्रीकृष्णार्जुनाचे कोरीव चित्र

वात्सल्यमूर्ती देवकी आणि बाळकृष्णाची मन मोहून टाकणारी मूर्ती

या मंदिराचे खरे आकर्षण म्हणजे बाळकृष्णाला मांडीवर घेतलेल्या देवकीची सुंदर मूर्ती. पारंपरिक गुजराती शैलीत बनवलेली ही मूर्ती सुमारे ४०० वर्षांहून जुनी आहे. काळ्या दगडात तयार केलेल्या या मूर्तीवर सुवर्णमंडित आवरण आहे.

देवकीच्या चेहऱ्यावरील वात्सल्यपूर्ण  स्मित आणि तिच्या मांडीवर बसलेला बाळकृष्ण पाहताच प्रत्येक भक्त मंत्रमुग्ध होतो. आईची ममता आणि दैवी सौंदर्य यांचा मिलाफ या मुर्तीत पाहायला मिळतो. .

देवकी कृष्णाची मूळ मूर्ती
देवकी आणि कृष्णाच्या पुनर्भेटीची भावनिक कथा

आपल्याला माहीत आहे की कृष्णाला लहानाचे मोठे यशोदा मातेने केले. मग देवकी आणि तान्हा श्रीकृष्ण बरोबर कसे असा प्रश्न अनेक भक्तांच्या मनात येतो.

यामागे कृष्ण आणि त्याची जन्मदात्री आई देवकी यांच्या पुनर्मिलनाची एक भावनिक कथा सांगितली जाते.

कंसाच्या मृत्यूनंतर देवकीची कैदेतून मुक्तता झाली. त्यावेळी तिने प्रथमच कृष्णाला पाहिले. यापूर्वी अर्भकरूपाने पाहिलेल्या कृष्णाला एका बालकाच्या रूपात पाहताच ती संभ्रमात पडली. समोर उभ्या असलेल्या त्या दैवी बालकाकडे ती आश्चर्याने पाहत राहिली. तो आपलाच पुत्र आहे यावर तिचा विश्वास बसेना. त्या क्षणी कृष्ण तिच्यासमोर बालरूपात प्रकट झाला आणि मातृत्वाने भारावलेल्या देवकीने त्याला प्रेमाने आपल्या मांडीवर घेतले.

आई आणि मुलाच्या या भावनिक भेटीचे दर्शन मंदिरातील मूर्तीमधून घडते.

कदाचित म्हणूनच ही मूर्ती भक्तांच्या मनाला इतकी भावते. कारण ती मूर्ती आईमुलाच्या शाश्वत नात्याचे प्रतीक आहे.

देवकी कृष्ण
देवकीकृष्ण मंदिराचा रंजक इतिहास

देवकी कृष्ण देवस्थान हे मूलतः तिसवाडी तालुक्यातील चोडण ह्या गावी होते. पोर्तुगीजांच्या धार्मिक छळामुळे गोव्यातील अनेक हिंदू मंदिरे सुरक्षित भागात हलवण्यात आली. त्याचप्रमाणे देवकीकृष्णाची मूर्तीसुद्धा  प्रथम डिचोली तालुक्यातील मये येथे हलवण्यात आली.

परंतु नंतर डिचोलीही पोर्तुगीजांच्या ताब्यात गेले व  भक्तांनी ही पवित्र मूर्ती पुन्हा स्थलांतरित केली आणि ती माशेल येथे आणण्यात आली. आजचे मंदिर याच ठिकाणी उभे आहे.

माशेल मधील ह्या मंदिराची स्थापना १८४२ मध्ये झाली. मात्र त्याआधी मूर्ती एका स्थानिक ब्राह्मणाच्या घरात सुरक्षित ठेवण्यात आली होती, असे मानले जाते.

परिसरातील मंदिर
प्रसिद्ध चिखल कालो आणि कृष्ण जन्माष्टमी उत्सव

या मंदिरात वर्षभर अनेक धार्मिक उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात. कृष्ण जन्माष्टमी, गोवर्धन प्रतिपदा, बली प्रतिपदा, रथसप्तमी, लक्ष्मीपूजन तसेच मार्गशीर्ष महिन्यातील दशमीएकादशीचा जत्रेचा उत्सव अत्यंत प्रेक्षणीय असतो. ह्या जत्रोत्सवाचा मुख्य दिवस मार्गशीर्ष शु. त्रयोदशीला असतो.

ह्या विविध कार्यक्रमांपैकी चिखलकालो हा उत्सव संपूर्ण गोव्यात विशेष प्रसिद्ध आहे.

साधारण आषाढ महिन्यामध्ये  मंदिराच्या समोर असणाऱ्या मैदानामध्ये हा कार्यक्रम मोठया उत्साहाने साजरा केला जातो. ह्या मैदानामध्ये केलेल्या चिखलात पुरुष आणि लहान मुले लोळण घेतात. हा खेळ पाहण्यासाठी गोव्यातून असंख्य भाविक गर्दी करतात. या वेळी उत्साह आणि सांस्कृतिक ऊर्जेने संपूर्ण परिसर भारावून जातो.

गोव्याची प्राचीन परंपरा जपणारा हा उत्सव आजही मोठ्या जल्लोषाने साजरा केला जातो.

देवकी कृष्ण परिसरातील मंदिर
देवकीकृष्ण मंदिरातील जन्माष्टमी: प्रत्यक्ष कृष्णजन्माचा अनुभव

देवकी कृष्ण मंदिरातील जन्माष्टमीचा उत्सव हा अत्यंत अद्वितीय असतो.

संध्याकाळ होताच मंदिर भक्तांनी भरून जाते आणि वातावरण भक्तिमय बनते. रात्री साधारण ८ वाजता कृष्णजन्माचे कीर्तन सुरू होते.

या उत्सवाची विशेष गोष्ट म्हणजे कृष्णजन्म फक्त सांगितला जात नाही, तर तो प्रत्यक्ष साकारला जातो.

पारंपरिक वेशातील एक पुजारी किंवा भक्त देवकीची भूमिका साकारतो. समोर अंतरपाट धरला जातो आणि मंगल मंत्रोच्चारांमध्ये प्रतीकात्मक कृष्णजन्म साजरा केला जातो.

अंतरपाट हटवताच भक्तांना देवकीच्या मांडीवरील बाळकृष्णाचे दर्शन होते. भक्त भारावलेल्या अवस्थेत असतानाच बाळकृष्णाला पाळण्यात ठेवण्यात येते.

त्यानंतर दोन पुजारी बाळकृष्णाला पाळण्याच्या वरून व खालून एकमेकांकडे देत “कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या…” पारंपरिक स्वरात म्हणतात. त्यानंतर बाळकृष्णाला पाळण्यात घालून पाळणा हलवला जातो. हा प्रसंग पाहताना प्रत्यक्ष कृष्ण जन्म पाहिल्याची अनुभूती येते.

नंतर पुजारी बाळकृष्णाची मूर्ती प्रत्येक भक्ताच्या डोक्याला लावून आशीर्वाद देतात. एकूणातच अविस्मरणीय असा हा कृष्ण जन्माष्टमीचा सोहळा असतो.

हा केवळ उत्सव नसून आयुष्यभर लक्षात राहणारा आध्यात्मिक अनुभव असतो.

बाळकृष्ण, देवकी कृष्ण
देवकी कृष्ण परिसरातील उपमंदिरे

मंदिर परिसरात मुख्य मंदिराच्या दोन्ही बाजूनी श्री लक्ष्मी रवळनाथ, श्री दाडसाखळ, अत्री गोत्रीयांचा श्री राम पुरुष म्हाळे पुरुष, श्री भूमिका देवी, पंचिष्ट देवता अशा विविध देवतांची मंदिरे आहेत.

मंदिराच्या समोरील मैदानाच्या पलीकडे, मंदिराचे सभागृह, भक्तांसाठी निवास व्यवस्था आणि कँटीन आहे. देवकी कृष्णाच्या भेटीला आलेल्या भक्तांसाठी ह्या कँटीन मध्ये दुपारच्या आरतीनंतर सात्विक रुचकर महाप्रसाद असतो.

देवकीकृष्ण मंदिराची वेळ आणि ठिकाण

देवकी कृष्ण मंदिर गोव्यातील फोंडा तालुक्यात असून पणजीपासून सुमारे १७ किलोमीटर अंतरावर आहे. पणजीफोंडा मार्गावरील बाणस्तरी पुलापासून हे मंदिर साधारण ३ किलोमीटर अंतरावर आहे.

मंदिर सकाळी ६ वाजता उघडते आणि रात्रीच्या आरतीनंतर ८:३० वाजता बंद होते.

आरतीची वेळ

दुपारची आरती – १२:३० वाजता

रात्रीची आरती – ८:३० वाजता

सकाळची शांत वेळ आणि संध्याकाळची आरती मंदिराचा आध्यात्मिक अनुभव घेण्यासाठी विशेष योग्य मानली जाते.

देवकीकृष्ण मंदिराजवळील प्रसिद्ध मंदिरे

देवकीकृष्ण मंदिराच्या भेटीसोबत जवळील इतर प्रसिद्ध मंदिरांनाही भेट देता येते.

यामध्ये खांडोळा येथील महागणपती मंदिर, बेतकी येथील मंडोदरी मंदिर आणि सावई-वेरे येथील अनंत देवस्थान या मंदिरांचा समावेश होतो.

ही सर्व मंदिरे मिळून गोव्याच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाची सुंदर सफर घडवतात.

देवकीकृष्ण मंदिर मनात कायमचे घर का करते

काही मंदिरे भव्यतेमुळे लक्षात राहतात, तर काही मंदिरे भावनिक जवळीक निर्माण झाल्याने कायम स्मरणात राहतात. देवकीकृष्ण मंदिर हे दुसऱ्या प्रकारातील मंदिर आहे.

देवकी आणि बाळकृष्णाची भावपूर्ण मूर्ती, जन्माष्टमीचा अनोखा उत्सव आणि मंदिराचा इतिहास — या सर्व गोष्टी मंदिराला वेगळे स्थान देतात.

माशेल गाव सोडल्यानंतरही देवकीच्या मांडीवर प्रेमाने विसावलेल्या कृष्णाचे ते शांत स्मित मनात कायमचे राहते.

कॅटेगरी Goan Temples

error: Content is protected !!