भारतातील विविध प्रदेशांत नवरात्रोत्सव वेगवेगळ्या आणि वैशिष्ट्यपूर्ण पद्धतींनी साजरा केला जातो. पश्चिम बंगालमधील भव्य दुर्गापूजा आणि गुजरातमधील रंगतदार गरबा हे नवरात्रोत्सवाचे प्रसिद्ध प्रकार आहेत. पण गोव्यात नवरात्रोत्सव कसा साजरा केला जातो, याची तुम्हाला कल्पना आहे का? गोव्यामधली नवरात्र ही अद्वितीय अशा मखरोत्सवासाठी प्रसिद्ध आहे. हा मखरोत्सव गोव्यातील अनेक मंदिरांमध्ये आणि विशेष करून फोंड्यातील सर्व मंदिरामध्ये नवरात्रीचे नऊ दिवस अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो.
गोव्याची सांस्कृतिक परंपरा, प्राचीन मंदिरे, हिंदू सण आणि धार्मिक पर्यटन यांविषयी जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी मखरोत्सव हा गोव्याच्या समृद्ध परंपरांचा अनुभव घेण्याची एक सुंदर संधी आहे.
मखरोत्सव म्हणजे काय? गोव्यातील नवरात्रोत्सवाचे खास वैशिष्ट्य
मखर म्हणजे लाकडी चौकटीपासून तयार केलेली झोपाळ्यासारखी रचना. छताला बसवलेल्या लोखंडी कडीला साखळीच्या साहाय्याने हा मखर टांगलेला असतो. रंगीबेरंगी कागद आणि फुलांनी सुंदर सजवलेला मखर हा नवरात्रोत्सवातील मंदिराच्या सजावटीचा मुख्य भाग असतो.
नवरात्रीच्या नऊही दिवसांत देवीला मखरात विराजमान केले जाते. दररोज देवीला वेगवेगळ्या सुंदर अलंकारांनी सजवले जाते. मखरामध्ये देवी प्रत्येक दिवशी; हत्ती, घोडा, वाघ, गरुड अशा वेगवेगळ्या वाहनांवर विराजमान झालेली असते.
अशी वाहनावर किंवा आसनावर स्वार होऊन मखरात बसलेल्या देवीची मग; ढोल, ताशे, शेमेळ, सनई अशा वाद्यांच्या गजरात झुलवत आरती केली जाते.
गोव्यातील मखरोत्सवाचा भक्तिमय आणि रोमांचक अनुभव
मखरोत्सवाच्या वेळी मंदिरातील वातावरण अत्यंत मोहक असते. मंद प्रकाशात उजळून निघणारी देवीची मूर्ती, सुंदर सजवलेला मखर आणि वाद्यांचा जयघोष हे सर्व अनुभवताना रोमांचित व्हायला होते.
हा सगळा सोहळा इतका अभूतपूर्व असतो की मखरामध्ये बसून प्रत्यक्ष देवीच आपल्या समोर झोके घेण्याचा आनंद घेत आहे असा भास काही क्षण आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही
गोव्यातील मखरोत्सवाचा इतिहास आणि पोर्तुगीजकालीन पार्श्वभूमी
मखरोत्सवाची सुरुवात कशी काय झाली याबद्दल असं सांगतात की, पोर्तुगीज राजवटीत सालसेत, तिसवाडी, बार्देश तालुक्यातील देवदेवतांचे स्थलांतर फोंडा तालुक्यामध्ये करण्यात आले.
मखरोत्सव हा देवतांच्या या ऐतिहासिक स्थलांतराचे प्रतीक मानला जातो. आजही हा उत्सव गोव्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाचा एक महत्त्वाचा भाग आहे.
विशेष म्हणजे, मखरोत्सव केवळ देवीच्या मंदिरांपुरता मर्यादित नाही. श्री मंगेश आणि श्री रामनाथ यांसारख्या देवतांच्या मंदिरांमध्येही हा उत्सव साजरा केला जातो.
काही मंदिरांमध्ये घटस्थापनेपासून नवमीपर्यंत नऊही दिवस मखरोत्सव साजरा केला जातो, तर काही मंदिरांमध्ये हा उत्सव पाच दिवसांचा असतो किंवा पाचव्या दिवसापासून सुरू होतो.
म्हार्दोळच्या महालसा नारायणी मंदिरातील मखरोत्सव
म्हार्दोळ येथील महालसा नारायणी मंदिरात नवरात्रीच्या नऊही दिवसांत मखरोत्सव साजरा केला जातो.
या उत्सवातील सहाव्या दिवशीचे त्रिमूर्ती दर्शन आणि नवव्या दिवशीचे पंचमूर्ती दर्शन ही येथील विशेष आकर्षणे आहेत.
सुरुवातीला मखराला मंदगतीने झोके दिले जातात. त्यानंतर हळूहळू झोक्यांचा वेग वाढू लागतो. त्याच वेळी सोबतच्या वाद्यांच्या गजराचाही वेग वाढतो आणि त्यावेळी जी भक्तिमय वातावरण निर्मिती होते ती वर्णनातीत आहे.
महालसा मंदिराच्या मखराबरोबर असणारा वाद्यांचा गजर हा सर्व वातावरण संमोहित करून टाकतो.
पारंपरिक वाद्यांचा नाद, मखराची लयबद्ध हालचाल आणि देवीच्या दर्शनातून मिळणारी आध्यात्मिक अनुभूती यांमुळे महालसा नारायणी मंदिरातील मखरोत्सव हा भाविकांसाठी आणि गोव्याच्या मंदिर परंपरांमध्ये रस असणाऱ्या पर्यटकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरतो.
मंगेशी मंदिरातील मखरोत्सव: थरारक आणि भक्तिमय अनुभव
गोव्यातील मंगेशी मंदिरातील मखरोत्सवाचा अनुभवही तितकाच रोमांचक असतो.
सुरुवातीला मखर अतिशय सावकाश झुलवले जाते. सावकाश झुलवता झुलवता मखर उजव्या किंवा डाव्या बाजूला वळले की दोन्ही बाजूला असे वेगाने झुलवले जाते की ते पाहताना अंगावर रोमांच उभे राहतात.
अशा पद्धतीने मखर झुलवणाऱ्या पुरोहितांची एकाग्रता, कौशल्य आणि शारीरिक ताकद खरोखरच विलक्षण असते.
मंगेशी मंदिरातील मखरोत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मखर फिरवण्याचा विधी संपल्यानंतर होणारा मंत्रघोष. सर्व लहान थोर पुरोहित मिळून उच्चरवाने मंत्रपठण करतात ते कुठल्याही अध्यात्मिक व्यक्तीला परमोच्च आनंदाची अनुभूती देते. या मंत्रोच्चारांमुळे मंदिरातील वातावरण अधिकच भारावून जाते आणि मनाला एक वेगळीच आध्यात्मिक उंची प्राप्त होते.
माशेल येथील देवकीकृष्ण मंदिरातील मखरोत्सव
माशेल येथील देवकीकृष्ण मंदिरात गोव्यातील मंदिर परंपरेचे आणखी एक सुंदर रूप पाहायला मिळते.
येथे देवकी देवीच्या मांडीवर बालकृष्ण विराजमान असल्याचे स्वरूप दाखवले जाते. त्यामुळे या मंदिरातील मखरोत्सवालाही आपले असे एक वेगळेच महत्त्व
गोव्यातील विविध मंदिरांमधील मखरांची वैशिष्ट्ये
गोव्यातील प्रत्येक मंदिरातील मखराचा आकार, सजावट आणि रचना वेगवेगळी असते. एवढेच नव्हे, तर प्रत्येक मंदिरात मखराला झोके देण्याची पद्धतही वेगळी असते. त्यामुळे प्रत्येक मंदिरातील मखरोत्सवाचा अनुभव अनोखा ठरतो.
महालसा नारायणी मंदिरातील मखरासोबत वाजवले जाणारे भव्य पारंपरिक संगीत भाविकांना आणि पर्यटकांना मंत्रमुग्ध करते. तर मंगेशी मंदिरात मखर फिरवण्याचा विधी संपल्यानंतर होणारा सामूहिक मंत्रघोष मनाला भक्तिरसात चिंब भिजवतो.
गोव्यातील मंदिर परंपरा आणि सांस्कृतिक वारसा किती वैविध्यपूर्ण आहे, हे या वेगवेगळ्या प्रथा आणि विधींमधून दिसून येते. एकच उत्सव साजरा करताना प्रत्येक मंदिराने आपली स्वतंत्र ओळख आणि परंपरा जपली आहे.
केरी येथील विजयादुर्गा मंदिरातील वैशिष्ट्यपूर्ण मखरोत्सव
गोव्यातील इतर मंदिरांमध्येही मखरोत्सवाचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. त्यापैकी एक म्हणजे केरी येथील विजयादुर्गा मंदिर. येथे अश्विन नवरात्रीऐवजी मार्गशीर्ष महिन्यात वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने मखरोत्सव साजरा केला जातो.
गोव्यातील मखरोत्सवाचा अनुभव एकदा तरी घ्यायलाच हवा!
गोव्यातील हा अभूतपूर्व मखरोत्सव म्हणजे केवळ धार्मिक परंपरा नाही, तर तो गोव्याची आध्यात्मिक ओळख, मंदिरांची परंपरा, पारंपारिक संगीत आणि अनेक वर्षांपासून जपल्या गेलेल्या सांस्कृतिक प्रथांचा उत्सव आहे.
सुंदर सजवलेला मखर, त्याची लयबद्ध हालचाल, पारंपारिक वाद्यांचे घुमणारे सूर आणि भक्तिभावाने केलेला मंत्रघोष या प्रत्येक गोष्टीतून एक विलक्षण अनुभव मिळतो. हा अनुभव उत्सव संपल्यानंतरही दीर्घकाळ मनात रेंगाळत राहतो.
हीच गोव्याची खरी ओळख आणि त्याच्या समृद्ध परंपरांचे सार आहे. गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांपलीकडील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभव अनुभवायचे असेल, तर या चैतन्यमय उत्सवाच्या काळात गोव्याला एकदा तरी अवश्य भेट द्यावी.