साळावली धरण गोवा – पिकनिकसाठी निसर्गसुंदर ठिकाण

सगळा आठवडा कामाच्या धावपळीत गेल्यानंतर एक रविवार कुटुंबासोबत आनंदाने घालवण्यासाठी पिकनिक करायचे असेल तर त्यासाठी गोव्यामध्ये पिकनिकची ठिकाणे कमी नाहीत. आपल्या प्रियजनासोबत धमाल करत, निसर्गाच्या सौंदर्याचा आणि पाण्याच्या मधुर संगीताचा अनुभव घेत घालविण्याचे मला आवडलेले आणि नुकतेच पाहिलेले एक ठिकाण म्हणजे साळावली धरण (Salaulim Dam).

सुंदर साळावली धरण

साळावली धरण – गोव्यातील सर्वात मोठे मानवनिर्मित धरण

साळावली धरण हे गोवा राज्यातील महत्त्वाच्या धरणांपैकी एक आहे. गोव्यातील सर्वात मोठे मानवनिर्मित धरण म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण आता गोव्यातील लोकप्रिय पर्यटनस्थळ म्हणूनही प्रसिद्ध झाले आहे.

दक्षिण गोव्यातील सांगे तालुक्यात असलेले हे धरण सांगे शहरापासून सुमारे ५ कि.मी. अंतरावर आहे. मडगावपासून ते अंदाजे २६ किमी अंतरावर असून चांदोर मार्गेही येथे जाता येते. तेथून कुडचडे-सावर्डे मार्गे साळावलीला पोहोचण्यासाठी सुमारे २० मिनिटे लागतात.

साळावली नदी

स्थानिक लोकांप्रमाणेच पर्यटकांनाही आकर्षित करणारे हे धरण, पश्चिम घाटातील हिरव्यागार डोंगररांगांमधून वाहणाऱ्या साळावली नदीवर बांधलेले आहे. साळावली नदी ही झुआरी नदीची उपनदी आहे. गोवा पर्यटन खात्याने धरणाच्या आजूबाजूच्या परिसराचे सुंदर सुशोभीकरण केले असल्यामुळे हे ठिकाण कुटुंबासोबत पिकनिक, निसर्गभ्रमंती आणि पर्यटनासाठी लोकप्रिय झाले आहे.

साळावली धरण वर्षभर सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत पर्यटकांसाठी खुले असते.

साळावली धरणाला भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ: ऑगस्ट ते सप्टेंबर.

वैशिष्ट्यपूर्ण डकबिल स्पिलवे – साळावली धरणाचे प्रमुख आकर्षण

बहुतेक धरणे ही साधारण एकसारखीच दिसतात. त्यांच्यामध्ये जो काही फरक जाणवतो तो त्यांच्यातील आकाराचा, जलाशयाचा, त्यातून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रमाणाचा आणि आजूबाजूच्या निसर्ग सौंदर्याचा. साळावली धरणालासुद्धा ही सर्व वैशिष्ट्ये लागू पडत असली तरी इतर धरणापेक्षा ह्या धरणाचे वेगळे आकर्षण म्हणजे त्याची अभूतपूर्व अशी वैशिष्ट्यपूर्ण रचना.

साळावली धरण हे वैशिष्ट्यपूर्ण अशा डकबिल स्पिलवे पद्धतीने बांधलेले आहे. त्याला कोणतेही दरवाजे नाहीत. ह्या जलाशयाचे पाणी अर्धवर्तुळाकार अशा उघड्या भागातून ओसंडून जवळजवळ १४० फूट उंचीवरून खाली कोसळते.

हे पाणी इतक्या प्रचंड वेगाने खाली पडते की पुलावर उभे राहून हे अदभूत दृश्य पाहताना त्या पाण्याचे तुषार आपल्या अंगावर येतात. पाण्याची ही फवारणी जणू काही वाफच उसळत असावी अशी भासते.

हे दृश्य इतके अप्रतिम सुंदर दिसते की नुसतेच पाहात राहावे. ढगांनी भरलेले आकाश, स्पिलवेमधून कोसळणाऱ्या पाण्याचा आवाज, पाण्याच्या तुषारांची सभोवताली पसरलेली धुरकट फवारणी… हे सारे पाहणारा एखादा जादुई विश्वात रमणारा स्वप्नाळू असेल तर त्याला एखाद्या जादूगारिणीच्या उकळत्या कढईची आठवण होईल.

साळावली धरणाचे प्रवेशद्वार आणि पर्यटकांचा अनुभव

साळावली धरणाला दोन प्रवेशद्वारे आहेत.

ज्यांना केवळ धरण पाहायचे आहे, ते वरच्या बाजूच्या प्रवेशद्वारातून प्रवेश करू शकतात. या प्रवेशद्वारापर्यंत वाहने नेता येतात. हे प्रवेशद्वार धरणावरील पुलाच्या दुसऱ्या टोकाला आहे. प्रवेशद्वाराजवळ वाहन पार्क करून थेट पुलावरून चालत धरणाचे सुंदर दृश्य पाहता येते.

खालच्या प्रवेशद्वारातून गेल्यास धरणावर पोहोचण्यासाठी सुमारे १०० पायऱ्या चढाव्या लागतात. या मार्गाने धरणाच्या परिसरातील विस्तीर्ण उद्यानही पाहता येते.

याशिवाय खालच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ बग्गीची सुविधाही उपलब्ध आहे. ह्या प्रवेशद्वाराकडून एक रस्ता वर धरणापर्यंत जातो; जिथून ज्येष्ठ नागरिकांना घेऊन जाण्यासाठी बग्गीची ही सुविधा उपयोगी ठरते.

salaulim dam

धरणावरचा लांब रुंद पूल पर्यटकांना अप्रतिम विहंगम दृश्य अनुभवण्याची संधी देतो. एका बाजूला विशाल जलाशय, तर दुसऱ्या बाजूला खाली कोसळणारे पाणी दिसते. वन विभागाच्या अधिपत्याखाली येणारी एका बाजूची गर्द वनराई ह्या परिसराच्या सौंदर्यात आणखी भर घालते. हे संपूर्ण निसर्गदृश्य डोळ्यांत साठवून ठेवावे असे आहे.

सुंदर उद्यान, साहसी खेळ आणि पिकनिकसाठी उत्तम ठिकाण

धरणाच्या परिसरातील हिरवीगार वनराई, धरणाच्या खाली असलेले औषधी वनस्पतींचे उद्यान आणि फळाफुलांवर बागडणारी रंगीबेरंगी फुलपाखरे असा सुंदर नजारा येथे पाहता येतो. हे उद्यान विस्तीर्ण असून पर्यटकांना निसर्गाच्या सान्निध्यात आराम करण्यासाठी भरपूर जागा उपलब्ध आहे.

साहसी खेळांची आवड असणाऱ्या पर्यटकांसाठी येथे आउटडोअर अॅडव्हेंचर अॅक्टिव्हिटीज देखील आहेत. या खेळांची रचना झाडांच्या खोडांचा वापर करून करण्यात आली आहे. त्यामध्ये एक छोटासा झुलता पूल, थोडा वेळ आराम करण्यासाठी झाडांच्या खोडांवर उभी केलेली झोपडीवजा छोटीशी जागा आणि बरेच काही आहे.

जवळच एक छोटेसे उपहारगृह आहे. त्याच्या पलीकडे एक सुंदर कालवा असून त्यात आणि आजूबाजूच्या परिसरात अनेक बदके विहार करताना पाहायला मिळतात.

हिरवाई, जलाशयाचे मनोहारी दृश्य, औषधी वनस्पतींचे उद्यान, साहसी खेळ आणि शांत वातावरण यामुळे साळावली धरण हे कुटुंबीय आणि मित्रांसोबत एक दिवस आनंदात घालवण्यासाठी गोव्यातील एक उत्तम पिकनिक स्पॉट आहे.

beautiful salaulim dam
कॅटेगरी Goa

error: Content is protected !!