प्रॉन्स विंदालू हा गोव्यातील अत्यंत लोकप्रिय पदार्थ आहे. ताज्या सुंगटांपासून, म्हणजेच कोळंबी किंवा झिंग्यांपासून बनवला जाणारा हा तिखट, आंबट आणि चटपटीत पदार्थ पारंपारिक गोवन खाद्यसंस्कृतीचा एक स्वादिष्ट भाग आहे.

चला तर मग, ही चविष्ट गोवन प्रॉन्स विंदालू रेसिपी घरच्या घरी कशी बनवायची ते पाहूया.

गोवन प्रॉन्स विंदालूसाठी आवश्यक साहित्य

  • प्रॉन्स – ५०० ग्रॅम
  • कांदे – २
  • हळद – ¼ लहान चमचा
  • तिखट – ½ लहान चमचा
  • मीठ – चवीनुसार
  • साखर – १ चमचा
  • तेल – ३ ते ४ मोठे चमचे

विंदालू मसाला पेस्टसाठी लागणारे मसाले

  • काश्मिरी मिरची – ६ते ७
  • गोवन गावठी मिरची किंवा बॅडगी मिरची – ४ते ५
  • आले – १ इंच
  • लसूण पाकळ्या – ८–१०
  • कांदा – २–३ उभे चिरलेले तुकडे
  • धणे – १ मोठा चमचा
  • जिरे – १ छोटा चमचा
  • मोहरी – १ छोटा चमचा
  • लवंग – ३–४
  • मिरी – ½ लहान चमचा
  • जायपत्री – २ तुकडे
  • दालचिनी – १ इंच काडी
  • हिरवी वेलची – २
  • गोवन व्हिनेगर – ½ वाटी
  • हळद – ¼ छोटा चमचा
spices for Prawns vindaloo

प्रॉन्स विंदालू बनवण्याची कृती

१. प्रॉन्स स्वच्छ करून मुरवून घ्या

प्रथम प्रॉन्स अर्थात सुंगटांचे वरचे टरफल काढून ते स्वच्छ धुवून घ्यावेत.

धुतलेल्या प्रॉन्सना हळद, मीठ आणि तिखट लावावे आणि अर्ध्या तासासाठी मुरू द्यावे.

Marinated prawns
२. विंदालू मसाला पेस्ट तयार करा

काश्मिरी मिरची आणि गोवन गावठी मिरची पाण्यामध्ये अर्धा तास भिजवून ठेवावी.

कांदा बारीक चिरून घ्यावा.

विंदालू पेस्टसाठी लागणारे सर्व मसाले मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यात व्हिनेगर घालून बारीक वाटून घ्यावे. मसाला वाटताना पाणी अजिबात घालू नये.

३. मुरवलेले प्रॉन्स शिजवून घ्या

एका पॅनमध्ये तेल गरम करावे आणि मसाला लावलेले प्रॉन्स त्यामध्ये २–३ मिनिटे परतून घ्यावेत.

प्रॉन्सचा रंग बदलला की ते तेलातून काढून घ्यावेत.

cooked prawns
४. विंदालू मसाला शिजवा

याच उरलेल्या तेलामध्ये आवश्यक असल्यास आणखी तेल घालून बारीक चिरलेला कांदा घालावा.

कांदा बदामी रंगाचा आणि मऊ झाला की त्यामध्ये तयार केलेली विंदालू मसाला पेस्ट घालावी.

पेस्ट हलवून कांद्यामध्ये चांगली मिसळावी. हे मिश्रण साधारण ३–४ मिनिटे शिजू द्यावे.

पेस्टचा रंग छान गडद झाला आणि पेस्ट साधारण जाडसर झाली की त्यामध्ये दोन वाट्या पाणी घालावे.

चवीनुसार मीठ आणि एक चमचा साखर घालून मिश्रण हलवून एकजीव करावे.

Prawns vindaloo
५. प्रॉन्स घालून विंदालू पुन्हा शिजवा

या मिश्रणात तेलात शिजवलेले प्रॉन्स घालून पुन्हा सारे हलवून एकत्र करावे.

पॅन झाकून साधारण १० मिनिटे शिजू द्यावे.

दहा मिनिटांनंतर या मिश्रणातून तेल सुटलेले आणि मिश्रण साधारण जाडसर झालेले दिसेल. आपले चविष्ट प्रॉन्स विंदालू तयार झालेले आहे.

prawns vindaloo with chapati

प्रॉन्स विंदालू कशाबरोबर खावे?

सुंगटांच्या चवीची लज्जत वाढवणारे हे आंबट-तिखट प्रॉन्स विंदालू तुम्ही उकड्या भाताबरोबर, गोवन पावाबरोबर, चपातीबरोबर किंवा गोवन सान्नां बरोबरही खाऊ शकता.

कॅटेगरी Goan Food

error: Content is protected !!