गोवा हे भारतातील असं पर्यटनस्थळ आहे ज्याच्या प्रेमात अनेक जण पडलेले आहेत. कुणाला ते कशासाठी आवडेल हे सांगणे कठीण असले तरी गोवा वेगवेगळ्या प्रकृतीच्या लोकांना वेगवेगळ्या कारणासाठी आवडते. एक जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून आज गोव्याचे जे चित्र प्रामुख्याने समोर येते व जे अधिकाधिक लोकांना आवडते; ते म्हणजे येथील आलिशान क्लब्स, कॅसिनो, आकर्षक समुद्र किनारे, समुद्री स्वादाचे वैविध्य, इथली अतिशय प्रसिद्ध फेणी, मनाला भुरळ पाडणारा निसर्ग, सुंदर देवालये आणि चर्चेस.. .
परंतु तुम्हाला माहीत आहे का? की मूळ गोवा मात्र ह्या आधुनिक गोव्यापेक्षा खूपच वेगळा होता.
अजूनही गोव्याच्या अनेक गावामध्ये हा वास्तविक गोवा आढळून येतो. शांत जीवनशैली आवडणारा, संगीत, नाटक कला याबद्दल प्रेम असलेला आणि धार्मिक स्वभावाचा असा मूलतः गोव्याचा नागरिक होता आणि बऱ्याच प्रमाणात अजूनही आहे.
तरीही काळाच्या ओघात आधुनिक जीवन शैलीच्या प्रवाहात सापडलेला आजचा गोवा हा ह्या पिढीजात वारशापासून काहीसा दूर गेला आहे. साधारण शंभर वर्षांपूर्वी गोव्याचे जे स्वरूप होते, जी जीवनशैली होती ती आजच्या आधुनिक गोव्यापासून फारच दूर गेली आहे.
हा आधुनिक जीवनशैलीमध्ये हरवून गेलेला सत्तर ऐंशी वर्षांपूर्वीचा मूळ गोवा कसा होता, इथल्या लोकांचा व्यवसाय, जीवनशैली, संस्कृती कशी होती हे जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी दक्षिण गोव्यामधील बिग फूट जे अँसेस्ट्रल गोवा म्युझियम म्ह्णूनही ओळखले जाते त्या ठिकाणाला तुम्ही भेट देऊ शकता.
बिग फूट म्युझियम गोवा – गोव्याच्या समृद्ध वारशाची एक अविस्मरणीय सफर
उघड्या आकाशाखाली उभ्या केलेल्या ह्या संग्रहालयाची संपूर्ण संकल्पना महेंद्र जोसेलीनो अल्वारीस यांची आहे. त्यांनी अत्यंत बारकाईने आणि वास्तवदर्शी पद्धतीने पारंपारिक गोमंतकीय गावाची प्रतिकृती उभी केली आहे.
अतिशय नेटकेपणाने उभी केलेली ही गावाची प्रतिकृती पाहताना आणि त्यामधून फेरफटका मारताना आपण त्या हरवलेल्या जुन्या गोव्यातून फिरून आल्याचा आभास निर्माण होतो. संग्रहालयातील प्रत्येक कोपरा जुन्या गोव्याचे वास्तवदर्शी चित्र उभे करतो. त्याकाळातील दैनंदिन जीवनशैली, तेव्हाचा सामाजिक स्तर, त्याकाळातील व्यवसाय, व्यवसायानुरूप दाखवल्या गेलेल्या पारंपारिक छोट्या घरांच्या प्रतिकृती हे सारे पाहताना आपण जुन्या स्वाभाविक गोव्याचा अनुभव घेऊ शकतो.
मुख्य म्हणजे हा संपूर्ण म्युझियम स्वयं मार्गदर्शित म्हणजे सेल्फ गाईडेड आहे. पर्यटकांना इथे स्वयंचलित ऑडिओ द्वारे संपूर्ण संग्रहालयाची माहिती मिळते. इंग्रजी, हिंदी आणि कोंकणी अशा तीन भाषांमधून ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.
बिग फूट म्युझियममध्ये काय पाहावे?
बिग फूट मध्ये प्रवेश करताच सुरुवातीच्या स्वागत कक्षात, त्याकाळातील हाताने हलवून वारा घालणारे पंखे आणि माचीला नावाचे त्याकाळातले पारंपारिक वाहन ज्यामध्ये दोन व्यक्तींना समोरासमोर बसवून हाताने उचलून नेले जायचे ते पाहायला मिळते. पुढे बिग फूट मध्ये भटकंती करताना एके ठिकाणी ह्या माचीलावर बसण्याचा आनंद तुम्हाला घेता येईल.
ह्या स्वागतकक्षातून बाहेर पडताच सर्वप्रथम भगवान परशुरामांची मूर्ती दिसते. हिंदू पुराणानुसार परशुरामांनी समुद्र मागे हटवून गोमंतक भूमीची निर्मिती केली. परशुरामांनी निर्माण केलेल्या ह्या गोमंतक भूमीची माहिती घेऊन अँसेस्ट्रल गोव्याच्या छोटेखानी प्रवासाची सुरुवात होते.
पारंपारिक गोमंतकीय गावजीवनाचे वास्तवदर्शी दर्शन
या संग्रहालयामध्ये जुन्या काळातल्या गोव्याच्या जीवनशैलीचे आणि समाजाचे चित्रण अत्यंत बारकाईने प्रदर्शित केलेले आहे. इथे उभारलेल्या गावातून फिरताना विविध पारंपारिक व्यवसायांचे शिल्परूप देखावे पाहायला मिळतात.
त्यामध्ये मच्छीमार समाज, कोळीणी, माडावरून नारळ काढणारा आणि ते सोलणारा पाडेली, पोदेर अर्थात पाववाला, काजूपासून फेणी बनवण्याची पद्धत, मिठाचे आगार, त्याकाळातील कासार, चांभार, न्हावी, धनगर, खाजेकार, फुलविक्रेती, चणे विक्रेता, भाजीविक्रेता इ. प्रत्येक देखावा इतका वास्तवदर्शी पद्धतीने साकारण्यात आला आहे की सगळे पाहताना आपण अक्षरशः जुन्या काळामध्ये हरवून जातो.
या पारंपारिक व्यवसायांबरोबरच संग्रहालयात त्या काळातील ग्रामीण जीवनाचे अनेक सुंदर प्रसंगही उभे करण्यात आले आहेत. त्यावेळी खेळले जाणारे खेळ, पाणवठ्यावर कपडे धुणाऱ्या बायका. गोकुंडातून पडणारे पाणी यांचीही शिल्पे अत्यंत सुरेख बनवलेली आहेत.
याशिवाय त्या काळातील हिंदू आणि ख्रिश्चन समाजाचे जीवनही येथे प्रभावीपणे मांडण्यात आले आहे. वेगवेगळ्या चालीरीती, सण-उत्सव, वेशभूषा आणि घरांची रचना यातील वेगळेपणा तरीही त्यांच्यामध्ये असलेला एकोपा आणि सौहार्दता याची सुंदर झलक इथे अनुभवायला मिळते.
हा अनुभव घेऊन पुढे जाताच पक्षीप्रेमींसाठीही एक खास विभाग आहे. रंगीबेरंगी पोपट, विविध प्रकारची कबुतरे, कोंबडे आदी अनेक तऱ्हेचे पक्षी असलेला हा विभाग पक्षी प्रेमींना बराच वेळ खिळवून ठेवतो.
या संग्रहालयाला ‘बिग फूट’ हे नाव का पडले?
हे सगळे पहिल्या नंतर आपल्या डोक्यात याला बिग फूट का म्हणत असतील हा प्रश्न उरतोच आणि त्याचे उत्तर आपल्याला पुढे सापडते.
संग्रहालयाच्या पुढील भागात असलेल्या एका छोट्या गुहेमध्ये प्रसिद्ध बिग फूटची पवित्र पाऊलखूण पाहायला मिळते आणि तिच्यामागील रंजक दंतकथाही समजते. ती अशी…
बिग फूट मागील दंतकथा
ही कथा आहे महादार नावाच्या एका श्रीमंत व्यक्तीची.
महादार केवळ श्रीमंतच नव्हता तर तो अत्यंत दयाळू होता. आपल्या ह्या दानी स्वभावामुळे तो प्रसिद्ध होता. गरीब आणि गरजूंना मदत करण्यासाठी तो नेहमी तत्पर असे.
याचाच गैरफायदा गावातील काही आळशी आणि लोभी लोकांनी घेतला. खोट्यानाट्या अडचणी सांगून ते महादार कडून मदत मिळवत. कनवाळू आणि भोळ्या स्वभावाचा महादार कोणालाही निराश न करता आपली संपत्ती गरजूंना देत राहिला आणि शेवटी स्वतःची सर्व संपत्ती गमावून बसला.
बेघर आणि निराधार झालेल्या महादारला आता इतरांकडे मदतीसाठी हात पसरावा लागला. विडंबना अशी की, ज्यांना त्याने आयुष्यभर मदत केली, त्यांच्यापैकी एकही जण त्याच्या मदतीला पुढे आला नाही. अशा कठीण परिस्थितीत त्याची पत्नी मरण पावली आणि तो पूर्णपणे एकटा पडला.
इतके संकट आल्यानंतरही त्याचा परोपकारी स्वभाव बदलला नाही. त्याच्या ह्या दयाळू आणि निस्वार्थ वृत्तीने प्रसन्न झालेला देव त्याच्या स्वप्नामध्ये प्रकट झाला. त्याने त्याची गमावलेली सर्व संपत्ती परत देण्याची इच्छा व्यक्त केली.
परंतु महादारने स्वतःसाठी काहीही न मागता, उलट ज्यांनी त्याच्यावर अन्याय केला होता त्यांच्यासाठीच प्रार्थना केली. त्याच्या या उदात्त आणि निःस्वार्थ वृत्तीने प्रभावित होऊन देवाने त्याला आणखीन एक वर मागण्यास सांगितला. तेव्हा महादारने मानवजातीच्या कल्याणासाठी उभे राहून तपश्चर्या करता येईल अशी एक छोटीशी जागा मागितली.
त्याच्या भक्तीची परीक्षा घेण्यासाठी देवाने त्याला एक तापलेला खडक दाखवला. कोणतीही तक्रार न करता महादार त्या उष्ण खडकावर एका पायावर उभा राहून तपश्चर्या करू लागला.
त्याच्या या अढळ श्रद्धेने आणि भक्तीने अखेर देव प्रसन्न झाले. त्यांनी महादारवर आशीर्वादांचा वर्षाव केला आणि त्याला स्वर्गामध्ये स्थान दिले.
मात्र जिथे त्याने खडतर तपश्चर्या केली होती त्या खडकावर त्याच्या पायाची छाप कायम राहिली. हीच पवित्र पाऊलखूण पुढे ‘बिग फूट’ म्हणून प्रसिद्ध झाली आणि त्यावरूनच या संग्रहालयाला बिग फूट म्युझियम हे नाव मिळाले.
आजही अनेकांची अशी श्रद्धा आहे की, या पवित्र पाऊलखुणेसमोर शुद्ध मनाने प्रार्थना करणाऱ्या प्रत्येकाची मनोकामना पूर्ण होते.
पवित्र बिग फूटची पाऊलखूण
संग्रहालयातील या गुहेमध्ये पोचताच प्रसिद्ध बिग फूटची पवित्र पाऊलखूण जतन करून ठेवण्यात आलेली आपल्याला दिसते.
तुमचा या दंतकथेवर विश्वास असो किंवा नसो, या पाऊलखुणेसमोर काही क्षण उभे राहिल्यावर मन नकळत शांत होते. त्यामुळे संग्रहालयातील हा अनुभव अधिक अर्थपूर्ण आणि आध्यात्मिक वाटतो.
संत मीराबाईंचे रेखीव शिल्प
याच बिग फूटमधले आणखीन एक विशेष संस्मरणीय आकर्षण म्हणजे येथील संत मीराबाईचे भव्य शिल्प.
चौदा मीटर लांबीचे हे शिल्प प्रतिभावान कलाकार महेंद्र जोसेलिनो अराउजो अल्वारिस यांनी अवघ्या ३० दिवसात साकारलेले आहे. जांभा दगड म्हणजे लॅटेराइट मध्ये कोरलेले हे सर्वात लांब शिल्प म्हणून याची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नोंद करण्यात आलेली आहे.
एकतारी वाजवत भक्तीमध्ये रममाण झालेल्या मीरेचे हे सुरेख शिल्प पाहात राहावे असे आहे. कपाळावरील कुंकू, दंडावर बाजूबंद, पायात पैंजण असे विविध अलंकारांनी सजलेले हे शिल्प अतिशय मोहक आहे.
औषधी आणि मसाल्यांच्या बागेला नक्की भेट द्या
सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या प्रदर्शनांबरोबरच संग्रहालयामध्ये एक आकर्षक औषधी आणि मसाल्यांच्या वनस्पतींची बाग देखील आहे.
या बागेत विविध औषधी वनस्पती, पारंपरिक मसाले आणि गोमंतकीय घरांमध्ये पिढ्यान्पिढ्या वापरल्या जाणाऱ्या वनस्पती पाहायला मिळतात. प्रत्येक वनस्पतीची उपयोगिता माहितीफलकांच्या माध्यमातून समजावून सांगितली आहे. त्यामुळे हा भाग माहितीपूर्ण आणि तितकाच आनंददायी ठरतो.
बिग फूट म्युझियमला कसे पोहोचाल?
बिग फूट म्युझियम हे दक्षिण गोव्यातील लोटली (Loutolim) गावात असून, सेव्हिअर ऑफ द वर्ल्ड चर्चपासून अवघ्या ४०० मीटर अंतरावर आहे.
गोव्यातील कोणत्याही भागातून येथे सहज पोहोचता येते.
प्रमुख ठिकाणांपासूनचे अंतर
मडगाव – सुमारे १० कि.मी.
पणजी – सुमारे २९ कि.मी.
गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ (दाभोळी) – सुमारे २५ कि.मी.
मडगाव रेल्वे स्थानक – सुमारे १० ते १२ कि.मी.
येथे जाण्यासाठी गोवा माइल्स अॅप द्वारे टॅक्सी बुक करता येते. तसेच स्कूटर किंवा दुचाकी भाड्याने घेऊन किंवा स्वतःच्या वाहनानेही सहज पोहोचता येते.
जवळील पर्यटनस्थळे
बिग फूट म्युझियमला भेट देण्याचा आणखी एक फायदा म्हणजे या परिसरात अनेक प्रसिद्ध पर्यटनस्थळे आहेत. त्यामुळे एका दिवसात अनेक ठिकाणांना भेट देता येते.
जवळील काही प्रमुख पर्यटनस्थळे:
- वेर्णा येथील श्री महालसा नारायणी मंदिर
- वास्को येथील बिर्ला मंदिर
- कोलवा बीच
- बाणावली बीच
- काबो द रामा किल्ला
बिग फूट म्युझियमला भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ
बिग फूट म्युझियम हे मोकळ्या आकाशाखालील खुले संग्रहालय आहे. त्यामुळे इथे भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे ऑक्टोबर ते मार्च हा होय. एप्रिल – मे महिन्यामध्ये कडक उन्हाळा आणि जून नंतर सप्टेंबर पर्यंत पावसाळ्यामध्ये गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो ऑक्टोबर ते मार्च ह्या काळात बिग फूटला भेट देणे श्रेयस्कर असते.
बिग फूट म्युझियमची वेळ आणि प्रवेश शुल्क
भेटीचे नियोजन करण्यापूर्वी खालील माहिती जाणून घेणे उपयुक्त ठरेल.
भेट देण्याची वेळ: सकाळी ९.०० ते सायंकाळी ६.०० (दररोज खुले)
प्रवेश शुल्क: प्रति व्यक्ती ₹१५०
(टीप: प्रवेश शुल्कामध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतो.)
बिग फूट म्युझियमला भेट का द्यावी?
गोवा म्हणजे फक्त समुद्रकिनारे, नाईटलाइफ, कॅसिनो आणि सी-फूड एवढेच नाही. दक्षिण गोव्यातील लोटली गावामधील बिग फूट म्युझियम तुम्हाला पर्यटनाच्या गजबजाटापासून दूर असलेल्या अस्सल आणि पारंपारिक गोव्याची ओळख करून देते.
पारंपारिक व्यवसाय, ग्रामीण जीवनशैली, लोककथा, अध्यात्म, वास्तुकला, कला आणि शतकानुशतके जपलेल्या चालीरीतींचे जिवंत उभे केलेले सुरेख दर्शन या संग्रहालयात घडते.
तुम्ही इतिहासप्रेमी असाल, संस्कृती जाणून घेण्याची आवड असेल, छायाचित्रणाची आवड असेल किंवा समुद्रकिनाऱ्यांपलीकडील गोवा अनुभवायचा असेल, तर बिग फूट म्युझियम हा तुमच्या प्रवासातील अविस्मरणीय अनुभव ठरेल.