अनंत देवस्थान – शेषशायी विष्णूचे अद्वितीय मंदिर
गोव्याच्या फोंडा तालुक्यातील सावई आणि वेरे ही दोन गावे आपल्याला एका अद्वितीय आध्यात्मिक अनुभवाची वाट दाखवतात – आणि या वाटेचा शेवट होतो एका अप्रतिम, शांततामय आणि सौंदर्यपूर्ण मंदिरात – अनंत देवस्थान! अनंत देवस्थान म्हणजे अनंतशयन विष्णूचे अप्रतिम सुंदर मंदिर.
सावई गाव संपताच सुरू होणाऱ्या वेरे गावात वसलेले हे मंदिर सावईवेरेचे मदनंत मंदिर म्हणूनही प्रसिद्ध आहे. पणजीहून सुमारे २४–२५ किमी अंतरावर, माशेल – खांडोळा मार्गे आपण येथे पोहोचतो. मार्गावर माशेलमधील देवकी-कृष्ण व खांडोळ्याचा महागणपती ही प्रसिद्ध स्थळंही लागतात. खांडोळ्यानंतर बेतकी, मग सावई आणि शेवटी वेरे – ही वाट म्हणजे एक भक्तीमय प्रवासच.
जलाशयावर उभं असलेलं मंदिर
अनंत देवस्थानाचं सर्वात आश्चर्यकारक वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर पाण्यावर उभं आहे. प्रथमदर्शनी हे कोणाच्याच लक्षात येणार नाही, कारण मंदिराची रचना इतकी कुशल आहे की त्याच्या भव्यतेत हे वैशिष्ट्य लपून जातं. मंदिराच्या पायऱ्या उतरून आत जाताना, समोर, मंदिराच्या शेजारी एक छोटी तळी दिसते, पण खऱ्या अर्थाने संपूर्ण मंदिराचं अधिष्ठान या जलाशयावर आहे.



कौशल्यपूर्ण वास्तुरचना
मंदिर साधारण ५००-६०० वर्षापूर्वीचे आहे असे मानले जाते. मंदिराला लाल कौलाचे उतरते छत आहे. ह्या मंदिराचे शिखर आणि त्यावरील घुमट हा इतर मंदिरांच्या तुलनेत थोडा अरुंद वाटतो. तर एका सुंदर कोरीव खांबासारख्या शिखरावर छोटा घुमट आणि त्यावर कळस आहे. समोरील भव्य सभा मंडपातून आत मंदिरात प्रवेश करताना, प्रवेश द्वाराच्या समोर फरशांऐवजी ऐवजी काचा बसवलेल्या आहेत. ज्यामधून खालील पाणी आणि त्यामध्ये पोहोणारे छोटे मासे आपल्याला पाहायला मिळतात. सभामंडपानंतर असणाऱ्या अंतराळातून पुढील मध्यमंडप, अर्थात चौकामध्ये प्रवेश करताच नेहमी प्रमाणे चार खांब दिसतात. हे चारही खांब लाकडी आहेत. परंतु त्यातील एक खांब चांदीच्या पत्र्याने मढवलेला आहे. जिथे देवाचा कौल घेतला जातो. चारही खांबांवर विविध देवतांच्या कोरीव मूर्ती आहेत.
मंदिराच्या आतल्या बाजूचा छताचा भाग संपूर्णपणे लाकडी आहे. छताच्या मधोमध एक आकर्षक झुंबर आहे. चौकात प्रवेश करताच उजव्या बाजूला चौकाच्या वरच्या दिशेला जाण्यासाठी लाकडी जिना आहे. चौकात आपण दर्शन घेण्यासाठी ज्या द्वारासमोर उभे राहतो त्या लाकडी द्वारावरही सुंदर कोरीव काम आपल्याला पाहायला मिळते. त्या द्वाराच्या वर शेषशायी विष्णूची कोरीव मूर्ती आहे. द्वाराच्या दोन्ही बाजूला जय-विजय आणि बाजूलाच असलेल्या भव्य खांबांवर नारद आणि तुंबर आहेत.
इथून पुढे गर्भगृह.… साधारणपणे इतर मंदिरांमध्ये, चौकातील दरवाजा आणि गर्भगृहाचा दरवाजा यांच्या मध्ये जी जागा असते ती दोन्ही बाजूने बंद असते. किंवा दोन्ही बाजूने ह्या जागेत प्रवेश करण्यासाठी दरवाजे असतात. इथले आणखी एक वेगळेपण म्हणजे इथे मात्र हा भाग पॅसेज असल्याप्रमाणे दोन्ही बाजूने ओपन आहे. त्यामुळे भाविक आतल्या बाजूला जाऊनही अगदी गर्भगृहाच्या द्वारातून विष्णूचे दर्शन घेऊ शकतात.


शेषशायी विष्णूची दिव्य मूर्ती आणि विशिष्ट अभिषेकविधी
मंदिरातील शेषशायी विष्णूची मूर्ती काळ्या दगडामध्ये कोरलेली आहे. परंतु गंध पूजा केल्यानंतर, निळ्या आणि इतर रंगाच्या गंधांमध्ये ती इतकी सुंदर तऱ्हेने सजवली जाते की मूर्तीकडे पाहत राहावे असे वाटते. मूर्तीला अभिषेकही मंदिराच्या खालील पाण्यानेच करतात. परंतु हे पाणी मंदिराखालील तळीचे नसून मुख्य मूर्ती आणि तिच्या मागे असलेली अभिषेकाची मूर्ती यांच्या मध्ये एक हातभर खोल विहीर आहे. ह्या विहिरीचे पाणी काढून अनंत अर्थात विष्णूला अभिषेक केला जातो.
सात्विक निर्मल परिसर
मंदिराच्या बाहेरील मोठा मोकळा सभामंडप मात्र साधारण ३०-४० वर्षपूर्वी बांधलेला आहे. ह्या सभामंडपाचे छतही लाकडाचे आहे. मंदिराच्या मुख्य द्वाराच्या समोरच्या बाजूला मंदिरातील कार्यक्रमांसाठी रंगमंच उभारलेला आहे. मंदिराच्या सभोवतालचा परिसरही अतिशय सुंदर आहे. हिरवळीने, तसेच फुलझाडे आणि छोट्या माडांनी सुशोभित केलेला हा परिसर मन प्रसन्न करून टाकतो. मंदिराच्या कंपाउंडच्या बाहेर असणारी शेतं आणि कुळागरं ह्या प्रसन्नतेत आणखीन भर घालतात.


अनंत देवस्थान : दैवी आणि नैसर्गिक शांततेचे अद्भुत मिश्रण
असे हे सुंदर वास्तू आणि रमणीय परिसर असलेले, अनंत अर्थात शेषशायी विष्णूचे एकमेव देवस्थान पुन्हा पुन्हा भेट द्यावे असे आहे.
तुम्ही गोव्यात गेलात, तर हे स्थळ तुमच्या यादीत असायलाच हवं – एकदा अनुभवलं, की पुन्हा बोलावणं नक्कीच येणार आहे!