काही महिन्यापूर्वी  वेंगुर्ला, मालवण, कुडाळ येथे तीन चार दिवसाच्या प्रवासाला आम्ही गेलो होतो. वेंगुर्ला आणि मालवण पाहिल्यानंतर गोव्याला परतताना आम्ही कुडाळ पाहायला गेलो. पहिल्या दिवशी.पिंगुळीचा श्री राऊळ महाराज मठ पाहिल्यानंतर दुसऱ्यादिवशी सर्व प्रथम सरसोली धाम हा सिंधी समाजाचा मठ पाहायचे असे आम्ही ठरविले.

तिथे जाताना वाटेत आम्हाला, भारतातले पहिले साई मंदिर असा एक बोर्ड दिसला. तो वाचून उत्सुकतेपोटी आम्ही त्या दिशेला वळलो. समोरचे ते छोटेसे टुमदार देऊळ, त्याच्या समोर एक सुंदरसे तुळशी वृंदावन असे सारे पहात आम्ही आत जाऊन साईबाबाच्या सुंदर मूर्तीचे दर्शन घेतले. साई बाबांच्या प्रदक्षिणा मार्गावर साईबाबांच्या कित्येक मूर्ती, फोटो लक्ष वेधून घेत होत्या. हे सारे पाहून  निघताना, हे मंदिर सर्वात पहिले मंदिर कसे ही उत्सुकता होतीच. तेव्हा जाता जाता त्याची चौकशी केली असता हे मंदिर इ. स. १९२२ मध्ये साईबाबांच्या महासमाधी नंतर बांधवले गेलेले पहिले देऊळ असल्याचे कळले.

तिथून थोड्याच अंतरावर सरसोली धाम आहे. दोन्ही बाजूला घनदाट झाडे असलेला रस्ता सरसोलीच्या दिशेने पुढे जातो. कुडाळ रेल्वे स्टेशन पासून तीन कि. मी अंतरावरील सरसोली धाम कुडाळ मधील काविलगावात आहे. साई लीला शाह यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधलेला हा मठ प्रशस्त जागेत सुंदर निसर्गाने सजवलेला आहे.

सरसोली धाम परिसर, कुडाळ
सरसोली धाम, कुडाळ
सरसोली धाम, कुडाळ

फाटकासमोरच साई लीला शहांचे एक छोटे मंदिर आहे. ह्या मंदिराच्या समोर असलेल्या हॉल मध्ये प्रत्येक दिवशी दुपारी साडेबारा ते दोन आणि रात्री साडेसात ते नऊ या वेळेत प्रसादाची सोय असते.

भव्य अशा मुख्य मंदिरात; शिवपार्वती, श्रीकृष्ण-रुक्मिणी, राम-सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांच्या मुर्त्या दर्शनीय भागात आहेत. त्यांच्या दोन्ही बाजूला समोरासमोर माता दुर्गा आणि झुलेलाल व गुरु नानक यांच्या मूर्ती विराजित आहे. मुर्त्यांच्या समोरील हॉल अतिशय प्रशस्त आहे. वरील छताची वास्तुरचनाही अत्यंत विलोभनीय आहे. मधोमध एक आकर्षक झुंबर ह्या छताची शोभा वाढवते. मुळच्या शांत प्रसन्न वातावरणात देवळाच्या गोलाकार छतावर लिहिलेले अध्यात्मिक ग्रंथातले विविध कोट्स मन आणखीनच शांत करतात.. इथून डाव्या बाजूला बाहेर आले की महादेवाची पिंडी आहे जिच्यावर अखंड जलाभिषेक सुरु असतो.

याशिवाय ह्या परिसरात एक तलाव आणि गोशाळाही आहे. गोशाळेमध्ये अनेक भटक्या गुरांनाही आसरा दिलेला आहे. त्यांना फिरण्यासाठी प्रशस्त जागा आहे.  अतिशय शांतीपूर्ण अशा ह्या रम्य सुंदर जागेला एकदा भेट दिली की इथे परत एकदा आले पाहिजे अशी मनाशी खूणगाठ बांधतच आपण इथून बाहेर पडतो.

कॅटेगरी Konkan