विजयादुर्गा केरीचे प्रथम दर्शन
तीन चार वर्षांपूर्वी संस्कृत भारती गोवा च्या निवासी शिबिरासाठी केरीला एकदिवसासाठी जाण्याचा योग आला. विजयादुर्गा मंदिराच्या मागच्याबाजूस रस्त्याच्या पलीकडे असलेल्या मंदिराच्या मालकीच्याच इमारतीत आमचे शिबीर होते. दिवसभर शिबिरात व्यस्त असल्याने त्यावेळी इमारतीच्या बाहेरच्या निसर्गाकडे लक्षपूर्वक पाहता आले ते दुपारच्या वेळी जेवणासाठी आम्ही बाहेर पडलो तेव्हा..
दुपारचा महाप्रसाद घेण्यासाठी आम्ही मंदिरामध्ये गेलो. चारीबाजूनी अतिशय नीटस असलेल्या, फुलझाडांनी नटलेल्या प्रांगणाच्या मधोमध हे विलोभनीय मंदिर उभे आहे. मंदिरामध्ये जाऊन आम्ही विजयादुर्गा देवीच्या तेजस्वी मूर्तीचे दर्शन घेतले. त्यावेळी आमच्याकडे वेळ कमी असल्याने आम्ही पुन्हा लगबगीने शिबिराच्या ठिकाणी पोचलो. तिथून निघताना, आजूबाजूचा निसर्ग, पुन्हा भेटीला ये असे निमंत्रण देत होता. मात्र बऱ्याचदा ठरवूनही पुनर्भेटीचा योग काही येत नव्हता. तो योग यावर्षी आला, अचानकपणे काहीच न ठरवता.
अप्रतिम निसर्गाच्या सानिध्यातील वैशिष्ट्यपूर्ण मंदिर
यावेळी मात्र मी सगळे मंदिर, आजूबाजूचा परिसर, देवीची मूर्ती डोळेभरून पाहिले. तिन्ही सांज होत आली होती. डिसेंबरचा महिना असल्याने दिवस लहान. केरीचे हे विजयादुर्गा मंदिर अगदी निसर्गाच्या कुशीत आहे. एका बाजूने गाव तर दुसऱ्याबाजूने गर्द झाडी. मंदिरामध्ये जत्रा आणि उत्सव वगळता, एरव्ही इतर मंदिरांच्या तुलनेत गर्दी कमी असते.. त्यामुळे मंदिरातही उगाच गर्दी गडबड विशेष असत नाही. मंदिर हे गोव्यातील मंदिरांच्या पद्धतीचे कौलारू. देवीचा अलंकार झालेला असल्याने मूळ मूर्तीचे दर्शन काही झाले नाही. देवी बहुतेक अष्टभुजा आहे असे वाटते.
या देवळात एक विशेष गोष्ट माझ्या लक्षात आली ती ही की इतर देवळांच्या बाहेर फुले विकणाऱ्या बायका बसलेल्या असतात किंवा इतर बारीक सारीक दुकाने असतात तसे व्यापारीकरण इथे अजिबात दिसले नाही. हे मला खूप भावले. देवळात शिरताना फुले विकणाऱ्या बायकांचे फुले घ्या असे हाकारे नसल्याने देवळाच्या शांततेत भर पडते.
नेटका आकर्षक मंदिर परिसर
देवीचे दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही बाहेरून संपूर्ण मंदिराला एक प्रदक्षिणा काढली. चारी बाजूला असलेली कौलारू घरे, हॉल वगैरे इमारतीही मंदिर आणि परिसराच्या सौंदर्यात भर घालत होत्या.
चारी बाजूला अत्यंत नेटक्या पद्धतीने लावलेली फुलझाडे, समोरील तुळशीवृंदावन, दीपस्तंभ पाहून आम्ही जायच्या विचारात होतो कारण लवकरच काळोख दाटून येईल असे वाटत होते. मंदिराच्या मूळच्याच शांततेत, दिवस मावळायला लागल्यामुळे आता आणखीन भर पडली होती. आम्ही मंदिराच्या मागच्या बाजूने असलेल्या मार्गाने प्रवेश केला होता. तिथे जाण्यासाठी वळणार इतक्यात समोरच्या प्रवेशद्वाराबाहेरचा परिसर जाताजाता पाहण्याची लहर आम्हाला आली तसे आम्ही पुढच्या गेटच्या दिशेने वळलो. तिथून उजवीकडे लक्ष गेले आणि आम्ही समोरच्या दर्शनाने थक्क झालो.
मंदिर परिसरातील नदी सदृश्य तळी
गोव्यातील मंदिरांच्या समोर अथवा मागे असणारी तळी हे गोव्यातील पुरातन मंदिरांचे वैशिष्ट्य. त्याप्रमाणे इथेही तळी होती पण ती इतर देवळांपेक्षा खूप वेगळी. एखादी छोटीशी नदीच जणू… आणि तिच्यापलीकडे घनदाट कुळागर अर्थात नारळीपोफळीची बाग, इतर अनेक वृक्षांसह….
मन धुंद करणारा अविस्मरणीय निसर्ग
खाली तळीपर्यंत जाण्यासाठी पायऱ्या होत्या. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूलाही उंच झाडे होती त्यावर माकडे धुडगूस घालत होती. परत मागे फिरण्याचे विसरून आम्ही निसर्गाच्या ओढीने पायऱ्या उतरून कधी त्या तळीच्या किनाऱ्यावर पोचलो समजलेच नाही. तिथून तळी थोडी खाली होती. पायऱ्यांचा शेवट झाल्यानंतर असलेल्या कठड्यावर समोरचे निसर्ग सौंदर्य आरामात बसून न्याहाळता यावे म्हणून बाक घातलेला आहे. त्यावर बसून समोरच्या पाण्यात जोरजोरात ओरडत पोहणारा बदकांचा थवा, आकाशात फुललेली बगळ्यांची माळ, बाजूच्याच दगडावर ध्यानमग्न झालेले बक मुनी. आकाशात आपल्या घरट्याकडे परतण्याची गडबड करीत कलरव करणारे पक्षी, असा मंत्रमुग्ध करणारा निसर्ग पाहण्यात व अधून मधून हा निसर्ग मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपण्यात आम्ही मग्न झालो, स्वतःलाच विसरून गेलो.
निसर्गाच्या धुंदीत आम्ही इतके धुंद झालो होतो की काळोखाने आपली चादर पसरलेलं आमच्या लक्षातही आलं नाही. वातावरणात थोडी भयाणता आली आणि आम्ही भानावर येऊन परतण्यासाठी उठलो. देवीच्या आणि निसर्गाच्या दर्शनाने मन कृतार्थ झाले. पुढच्या खेपेला इथे दोन दिवसाचा तरी मुक्काम करायचा असं मनाशी निश्चित करूनच आम्ही घराकडे वळलो. मात्र त्याआधीच अचानक आम्हाला परत इथे येण्याचा योग आला.
मार्गशीर्ष नवरात्रीत विजयादुर्गेचा मखरोत्सव
अश्विन नवरात्रीमध्ये बहुतेक देवळामध्ये असणारे मखर ही गोव्यातील नवरात्रीची खासियत. परंतु विजयादुर्गा मंदिरात अश्विन नवरात्रीत मखर न होता मार्गशीर्ष महिन्यात होते, हे आम्हाला एका ओळखीच्या व्यक्तीकडून कळले आणि एके रात्री आम्ही मुद्दाम मखर पाहण्यासाठी म्हणून केरीला पोहोचलो.
विजयादुर्गा मखराचे वैशिष्ट्य
गोव्यामधील मखरोत्सव पाहणे म्हणजे एक अप्रतिम आनंदाचा आणि भक्तीमध्ये डुंबण्याचा योग असतो. प्रत्येक देवळाची मखराला झोके देण्याची पद्धत स्वतंत्र. वाद्य संगीतही थोड्याफार फरकाने वेगळे. केरीच्या ह्या देवळात मखर केवळ पुढे पाठी न झुलवता उजव्या डाव्या दिशेलाही झुलवले जाते शिवाय ते संपूर्ण मागे पर्यंत सुद्धा फिरवतात.. तर मंद प्रकाशात झुलणारे मखर, त्यामध्ये विराजमान असलेली दिव्य तेजाने तळपणारी विजयादुर्गा आणि श्रवणीय संगीत अशा भक्तिमय वातावरणात अर्धा पाऊण तास गेला. त्यानंतर आम्ही प्रसाद घेऊन परत फिरलो.
गानसम्राज्ञी केसरबाई केरकरांचा गाव
ह्या केरी गावाचे आणखीन एक वैशिष्ट्य विशेष करून संगीत प्रेमींना इथे मला सांगायला आवडेल की हे केरी गाव आपल्या प्रसिद्ध शास्त्रीय गायिका केसरबाई केरकर यांचं गाव आहे. गावात केसरबाई केरकर विद्यालय आहे. तिथून जवळच केसरबाई केरकर जिथे राहत होत्या ते घरही आहे.
विजयादुर्गा केरीला जाण्याचा मार्ग
पणजीहून साधारण तीस किलोमीटर दूर असलेले, निसर्गाच्या कुशीत वसलेले केरी गाव फोंडा तालुक्यात आहे. पणजीहून जाताना माशेल सावईवेरे रस्त्यावरील बेतकी गावातून उजवीकडे सरळ गेल्यास साधारण पाच कि.मी. अंतरावर आहे. त्याशिवाय म्हार्दोळ हायवे वरून प्रियोळ मार्गे डावीकडे वळून सरळ केरीला जाता येते. बेळगाव वरून केरीला येत असाल तर फोंडा ते केरी अंदाजे दहा बारा किलोमीटर आहे.
मित्रानो जर तुम्ही निसर्ग प्रेमी असाल व मंदिरांना भेट देणे तुम्हाला आवडत असेल तर फोंडा तालुक्यातील केरीच्या विजया दुर्गा मंदिराला भेट देण्यास विसरू नका.