महाराष्ट्रात जसा मटकीच्या उसळीबरोबर कट असतो. तसा गोव्यामध्ये मुगागाठींबरोबर सार केले जाते. फरक इतकाच की हे सार संपूर्ण सात्विक म्हणजे कांदालसणीशिवाय केले जाते. मुगागाठी, मुगाची उसळ, मुगाचे सार, खतखते हे सर्वच पदार्थ सणसमारंभ, धार्मिक कार्ये अशा वेळी बनवले जातात. त्यामुळे हे सर्व पदार्थ सात्विक असतात. मुगागाठी करताना, मूग शिजल्यावर वरचे जे पाणी असते ते बाजूला काढून त्यापासून हे सार बनवले जाते.
मुगाचे सार बनवण्याची पद्धत –
साहित्य :
- ५ ते ६ वाट्या मुगागाठी बनवताना काढलेला कट
- ४-५ओल्या मिरच्या
- एक इंच आले
- एक वाटी कोथिंबीर
- एक वाटी किसलेले ओले खोबरे
- एक मध्यम आकाराचा टोमॅटो
- एक लहान तुकडा गूळ
- एक चमचा चिंचेचा कोळ
- चवीनुसार मीठ
फोडणीसाठी साहित्य :
- एक मोठा चमचा गावठी खोबरेल
- एक चमचा मोहरी
- दोन चिमटी हिंग
- अर्धा छोटा चमचा हळद
- दोन काश्मिरी सुक्या मिरच्या (ऑप्शनल)
- १०-१२ कढीपत्त्याची पाने
कृती :
१. एका पातेल्यामध्ये शिजलेल्या मुगाचे वरचे पाणी काढून घ्यायचे.
२. ओली मिरची, आले, कोथिंबीर आणि ओले खोबरे, सगळे बारीक वाटून घ्यायचे.
३. हे वाटण मुगाच्या पाण्यामध्ये मिसळून मंद आंचेवर शिजवत ठेवायचे.
४. त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा.
५. हे सर्व शिजले की त्यात चिंचेचा कोळ, गूळ आणि मीठ घालून एक उकळी काढायची.
६. फोडणीच्या वाटीमध्ये तेल घालून तेल तापले की त्यामध्ये मोहरी घालायची
७. मोहरी तडतडली की त्यामध्ये हिंग, कढीपत्त्याची पाने, सुक्या मिरच्या घालायच्या
८. शेवटी हळद घालून ही फोडणी मुगाच्या सारामध्ये घालून गॅस बंद करायचा.
गरम गरम भाताबरोबर हे मुगाचे सार आणि तोंडी लावायला मुगागाठी हा असा छोटा मेनू सुद्धा अप्रतिम लागतो.