गोवन खतखते – पारंपारिक आणि लोकप्रिय पदार्थ
गोव्याचा एक अत्यंत प्रसिद्ध आणि रुचकर पारंपारिक पदार्थ म्हणजे खतखते! जे गोव्याबरोबरच; कोकणांत आणि महाराष्ट्र, कर्नाटकातील सारस्वत आणि गोव्याशी संबंध असलेल्या इतर समाजात गणेश चतुर्थीला आवर्जून बनवले जाते. गणपतीचा तो आवडता पदार्थ आहे अशीही एक धारणा आहे.
श्रावण महिन्यात मिळणाऱ्या, तसेच काही बारमाही मिळणाऱ्या विविध फळभाज्या आणि कंद घालून केलेली ही भाजी म्हणजे अवीट गोडीचा खास पदार्थ आहे.
ह्यात घातलेल्या प्रत्येक भाजीची चव आणि वास ह्या भाजीला एक विशिष्ट चव प्राप्त करून देते. त्याशिवाय त्रिफळ/तिरफळ नावाचं गोवा आणि कोकण प्रांतात मिळणारं एक छोटंसं फळ यामध्ये मसाला म्हणून वापरलं जातं. ह्या खतखत्याच्या वैशिष्ट्यपूर्ण चवीसाठी ह्या तिरफळाचा महत्वपूर्ण सहभाग असतो. त्यामुळे खतखत्यामध्ये त्रिफळ हे असलंच पाहिजे.
गणपतीला खतखत्याचा नैवेद्य दाखवला जातो त्यामुळे ह्यामध्ये एकवीस प्रकारच्या भाज्या घालाव्यात अशीही एक धारणा आहे. तर जवळ जवळ वीसेक प्रकारच्या भाज्या घालून बनवलेले खतखते कसे करायचे ते पाहूया,
खतखत्यासाठी लागणाऱ्या मुख्य भाज्या
- मुळा
- भोपळा
- सुरण
- वांगं
- बटाटा
- कच्चं केळं
- नीरफणस
- मक्याचं कणीस
- मोठी काकडी
- मुडली (अरवी)
- शेवग्याची शेंग
- कोंब (Bamboo shoots)
- माडी
- अंबाडे
खतखते बनवण्यासाठी लागणाऱ्या इतर भाज्या
ह्या मुख्य भाज्यांशिवाय; गाजर, दोडकं, पडवळ, तेंडली, गड्डा, दुधी भोपळा, बीट; ह्या सर्व किंवा यातील मिळतील तितक्या भाज्या, हवे असल्यास भुईमुगाच्या शेंगाचे दाणे किंवा मटार..
खतखते किती लोकांसाठी बनवणार त्या प्रमाणात आणि आपल्या आवडीनुसार कमी जास्त भाज्या घ्याव्यात
इतर साहित्य
- तूर डाळ: एक वाटी (तुम्हाला तूर डाळ वापरायची नसेल तर आदल्या दिवशी भिजत घातलेले ग्रीन पीज वापरावेत)
- नारळ: अर्धा किंवा एक संपूर्ण (तूर डाळ घातल्यास अर्धा नारळ, तूर डाळ नसल्यास एक नारळ किंवा भाज्यांच्या प्रमाणानुसार नारळाचे प्रमाण ठरवावे)
- आले: एक इंच
- तिरफळ: १०-१२
- सुकी मिरची: ८-१० (कुठली वापरताय त्यानुसार कमी अधिक)
- ओली मिरची: दोन
- चिंच: लिंबाएवढा (अंबाडे घातल्यास चिंचेची आवश्यकता नाही)
- बारीक केलेला गूळ: एक मोठा चमचा
- हळद: अर्धा लहान चमचा
- मीठ: चवीपुरते
फोडणीसाठी लागणारे साहित्य
- खोबरेल अथवा कुठलेही तेल: एक मोठा चमचा
- मोहरी: एक चमचा
- हिंग: अर्धा छोटा चमचा
- कडीपत्ता: १०-१५ पाने
पारंपारिक गोवन खतखते बनवण्याची कृती
- तुरीची डाळ (ग्रीन पीज) कुकरमध्ये छान शिजवून घ्यावे.
- किसलेले ओले खोबरे, सुक्या मिरच्या, आले, दोन तिरफळे, चिंच आणि हळद हे सारे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे.
- एका मोठ्या पातेल्यामध्ये ज्या भाज्यांना शिजायला खूप वेळ लागतो आणि ज्या शिजल्यानंतर विरत नाहीत अशा सर्व भाज्या म्हणजे, कणीस, कोंब, फणसाच्या आठळ्या, भुईमुगाचे दाणे इ. घालाव्यात. तिरफळे ठेचून टाकावीत.
- ह्या भाज्या बुडतील इतके पाणी आणि भाज्यांपुरते थोडेसे मीठ घालून पातेल्यावर पाणी घातलेले ताट झाकून मध्यम आंचेवर शिजवण्यास ठेवावे.
- आता इतर भाज्या एक एक करून चिरावयास घ्याव्या. भाज्यांचे शक्यतो मोठे तुकडे करावेत.
- ज्या भाज्यांना शिजायला काही वेळ लागतो अशा भाज्या आधी टाकाव्यात. आणखी थोडे मीठ आणि पातेल्यावरील ताटातील पाणी भाज्यांमध्ये घालावे. आणि पुन्हा ताटात दुसरे पाणी घालून झाकून ठेवावे.
- भाज्या मध्ये मध्ये हलवून वर खाली कराव्यात.
- सगळ्यात शेवटी पटकन शिजणाऱ्या भाज्या जसे, वांगे, शेवग्याच्या शेंगा इ. भाज्या घालाव्यात. शिजलेली तुरीची डाळ घालावी. सगळे हलवून एकत्र करावे
- आता खोबऱ्याचे वाटण घालावे, गूळ आणि मीठ घालावे. (भाज्या शिजताना थोडे मीठ घातलेले असल्याने त्याप्रमाणे मीठ घालावे).
- पुन्हा सर्व खतखते हलवून एकजीव करावे आणि काही वेळ शिजवू द्यावे.
तोपर्यंत फोडणी तयार करावी.
- फोडणीच्या वाटीमध्ये तेल गरम करावे.
- तेल गरम झाले की मोहरी टाकावी.
- मोहरी तडतडली की हिंग व कढीपत्त्याची पाने घालून गॅस बंद करावा.
फोडणी खतखत्यामध्ये घालून खतखत्याचा गॅस बंद करावा.
अप्रतिम चवीचे खतखते तयार.
तळटीप: हे खतखते तुम्ही सुकी मिरची न घालता फक्त ओल्या मिरचीचेही बनवू शकता. ते ही स्वादिष्ट लागते.