कुलदेवता महालसा नारायणी
महालसा नारायणी, माझी कुलदेवता. माहेर आणि सासर दोन्ही कडून. लग्नापूर्वी गोव्याला येण्याचं मुख्य कारण असायचं कुलदेवतेचं दर्शन. ते झालं की मग बाकीचं थोडं फार गोवा दर्शन. पुढे महालसा मातेची कृपा अशी झाली की ती सासरहूनही कुलदेवता झाली. आणि सासर दिलं ते ही गोव्यात, तिच्यापासून अवघे पंचवीस कि.मी. दूर पणजीमध्ये! महालसा आईवरची माया, ती सासरकडूनही कुलदेवता झाल्यावर आणखीनच वाढली. सुरुवातीला वर्षातून दोन तीनदा म्हार्दोळला जाणं व्हायचं. पुढे पुढे महालसेचा इतका लळा लागला की आता अगणित वेळा जाणे होते. कुलदेवता आहे हे कारण जरी बाजूला केलं तरी महालसेच्या मंदिरात आणि खास करून दरदिवशी विविध अलंकारांनी नटलेल्या महालसेच्या मूर्तीत असं काही तरी आकर्षण आहे की तिच्या दर्शनाची पुन्हा पुन्हा ओढ लागते.
महालसा नारायणी मंदिराचा इतिहास
खरं तर महालसा मूळची वरेण्यपुरी अर्थात सध्याच्या वेर्णा गावची. पोर्तुगीज राजवटीच्या अत्याचारात अनेक देवदेवतांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं त्यावेळी महालसा म्हार्दोळ येथे स्थलांतरित झाली..
स्कंद पुराणातील सह्याद्री खंडात लिहिल्याप्रमाणे परशुरामाने उत्तरेतील त्रिहोत्र येथून सारस्वतांची दहा कुटुंबे गोमंतक भूमीत आणली. ह्या कुटुंबांनी आपल्याबरोबर आपल्या कुलदेवताही आणल्या, ती कुलदैवते होती. – मंगेशी, महालसा, महालक्ष्मी, महादेव, शांतादुर्गा, नागेश आणि सप्तकोटेश्वर. नंतर आणखीन सारस्वत कुटुंबे आपापल्या कुलदैवतांबरोबर गोमंतकात आली. अशी ही एकूण सहासष्ट कुटुंबे होती, त्यातील सहा कुटुंबे वरेण्यपुर म्हणजे सध्याचे वेर्णा येथे स्थायिक झाली.
म्हार्दोळ मधील महालसेच्या ह्या मंदिराशेजारी, शांतेरी देवीचे मंदिरही आहे. ही शांतेरी देवी मूळची म्हार्दोळची आणि तिने वेर्ण्याच्या महालसेला आपल्या शेजारी स्थायिक होण्यासाठी जागा दिली अशी कथा सांगितली जाते. ह्या गोष्टीवर श्रद्धा असणारे भाविक त्यामुळे आधी शांतेरीचे दर्शन घेऊनच मग महालसेचे दर्शन घेतात. रोजची आरतीही प्रथम शांतेरी देवीची केली जाते. त्यानंतर महालसा मंदिराच्या पाठीमागे असलेल्या ग्रामपुरुष, श्री भगवती, चतुःषष्ठी योगिनी, कालभैरव, श्री दाढ आदी छोट्या मंदिरातून आरती होते आणि मग महालसेची आरती केली जाते.
महालसा नारायणी म्हणजे नक्की कोण?
ही महालसा म्हणजे कोण असा प्रश्न गोव्याबाहेरून मंदिर पाहायला आलेल्या अनेक पर्यटकांना पडलेला मी पाहिलेला आहे. कोणी तिला खंडोबाची पत्नी महालसा समजतात तर कोणी तिच्या नावातील महालक्ष्मीच्या साधर्म्याशी सांगड घालत तिला महालक्ष्मीच समजतात.
म्हार्दोळची महालसा कोण हे जाणायचे असेल तर आपल्याला थेट समुद्रमंथनाच्या प्रसंगाकडे पोचलं पाहिजे. समुद्रमंथनातून जेंव्हा अमृतकुंभ बाहेर आला तेंव्हा अमृतकुंभासाठी देव आणि दैत्यांमध्ये युद्ध सुरु झाले. देवांना अमृत मिळवून देण्यासाठी विष्णूने अप्रतिम सुंदर अशा मोहिनीचे रूप घेतले. तिच्या सौंदर्याने सारे दैत्य मोहित झाले. ह्या संधीचा फायदा घेत मोहिनीने सारे अमृत देवांमध्ये वाटले. तेवढ्यात राहूच्या लक्षात ही गोष्ट आली आणि त्याने अमृत पिण्यासाठी देवाचे रूप घेतले. हे लक्षात येताच मोहिनीने त्याचे शीर धडापासून वेगळे केले.
म्हार्दोळची महालसा म्हणजे हीच मोहिनी होय. यज्ञोपवीत धारण केलेल्या चतुर्भुज महालसेच्या मागील उजव्या हातात त्रिशूल तर दुसऱ्या हातात अमृत कुंभ आहे. तर समोरील उजव्या हातात तलवार, आणि गुढगे टेकलेल्या विरोचन दैत्याचे केस पकडलेले आहेत तर दुसऱ्या हातात राहूचे शीर आहे. ह्या शिरातून टपकणारे रक्त वाघ पीत आहे. आडव्या पडलेल्या दैत्याच्या पाठीवर ती उभी आहे.
सौंदर्य, चलाख बुद्धी आणि शौर्य यांचा मिलाफ म्हणजे महालसा!
महालसा नारायणी देवस्थानाचे स्वरूप
म्हार्दोळचे हे महालसा नारायणीचे मंदिर जवळ जवळ साडे चारशे वर्षे जुने आहे. पूर्वीच्या मंदिराचा मुख्य ढाचा तसाच असला तरी, काही अंतर्गत बदल झाले आहेत. जसे गाभाऱ्याचे समोरील द्वार आणि द्वाराच्या दोन्ही बाजूच्या व वरच्या बाजूच्या भिंती चांदीच्या पत्र्याने मढवलेल्या आहेत. तर गाभाऱ्याचे मुख्य द्वार सोन्याने मढवलेले आहे. महालसेच्या मंदिरावरील कळस सुवर्णाचा आहे. ह्या कळसाखालील घुमट पितळेचा आहे. तर छप्परासाठी तांब्याचा वापर केलेला आहे. चौकाच्या दोन्ही बाजूला असलेल्या दाराच्या वरच्या बाजूला पिरॅमिड आकाराचे छतही तांब्याचे आहे. मंदिराच्या स्थापत्यात केलेला असा सुवर्ण, तांबे आणि पितळ यांचा वापर मंदिरातील सकारात्मक ऊर्जेत विशेष भर पाडतो.
सध्या असलेला समोरचा सभामंडप, हनुमानाचे मंदिर, नवग्रह मंदिर, यज्ञमण्डप आदी सर्व नंतर बऱ्याच वर्षाने बांधण्यात आले आहे. सुंदर प्रांगण लाभलेल्या ह्या मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार अतिशय लक्षवेधी आहे. ह्या प्रवेशद्वारावर चतुर्भुज महालसेची सुंदर कोरीव मूर्ती आहे. प्रवेश द्वाराच्या वर सनई चौघडा वाजवण्यासाठी एक लहान खोली आहे. प्रवेशद्वारातून आत येताच आपले लक्ष वेधून घेते ती धातूची उंच दीपमाळ, जी विविध उत्सवांच्या वेळी पेटवली जाते. ह्या दीपमाळेच्या मागे, मुख्य महालसा मंदिराच्या समोर हनुमानाचे छोटे मंदिर आहे. दीपमाळ आणि हनुमान मंदिराच्या मध्ये सुंदर ध्वजस्तंभ आहे. बाजूलाच एक भव्य दीपस्तंभ आहे.
मंदिरात प्रवेश करताच मोठा सभामंडप आहे. ह्या सभामंडपाच्या दोन्ही बाजूला आणि दर्शनी भागात दगडी खांब आहेत. जिथून आपण ह्या सभामंडपात प्रवेश करतो त्या प्रवेशद्वाराच्या वरच्या भिंतीवर शेषशायी विष्णूची कोरीव मूर्ती आहे. समोरच्या भिंतीवर मधोमध महालसेची चतुर्भुज अशी सुंदर कोरीव मूर्ती आहे.
इथून आपण प्रवेश करतो नगारखान्यात. जिथे नगारा, ताशे त्याचबरोबर महालसेची पालखी इत्यादी ठेवलेले असते. आरतीच्या वेळी इथूनच नगारे वगैरे वाद्ये वाजवली जातात. ह्या नगारखान्याच्या दोन्ही बाजूला बाहेरील सभामंडपात असलेल्या सज्जावर जाण्यासाठी जिने आहेत. इथून पुढे आपण प्रवेश करतो मंदिराच्या गाभाऱ्यासमोरील चौकात. चौकात शिरण्यासाठी असलेल्या द्वाराच्या दोन्ही बाजूला मोठ्या खिडक्या आहेत. चौकाच्या दोन्ही बाजूला अतिशय नाजूक असे सुंदर कोरीवकाम केलेले लाकडी खांब आहेत, वरील छतही लाकडी आहे. त्याशिवाय चारही बाजूनी सुंदर कोरीव अशा विविध देवदेवतांच्या लाकडी मूर्ती आहेत. इतर मंदिरातील आणि ह्या मंदिराच्या चौकातील फरक म्हणजे इतर बहुतेक देवळामध्ये आपल्याला दोन्ही बाजूला मोठ्या खिडक्या पाहायला मिळतात, त्या इथे नाहीत. तर त्याऐवजी दोन्ही बाजूला, कट्टा वाटावा अशा लाकडाच्या लांब फळ्या आहेत. ह्या फळ्यांच्या मागील भिंतीला लाकडी गज आहेत ज्यामधून चौकात प्रकाश आणि हवा खेळली जाते.
गाभाऱ्यामध्ये जाण्यासाठी असलेल्या चांदीच्या द्वाराच्या दोन्ही बाजूला चांदीच्याच पत्र्यावर कोरलेल्या लक्ष्मी आणि सरस्वती तसेच शुभ चिन्हे आहेत व वरच्या बाजूला अमृतमंथनाचे चित्र आहे. शेजारीच थोड्याशा बाहेरच्या बाजूला जय विजय आहेत. ह्या दरवाज्यानंतर आणखीन एक दरवाजा आहे आणि मग गाभाऱ्याचे प्रवेशद्वार. सोन्याच्या पत्र्याने कलाकुसर करून मढवलेल्या ह्या प्रवेशद्वाराच्या आत आपल्याला अलंकार केलेल्या विलोभनीय महालसादेवीचे दर्शन होते.
शाळीग्रामाच्या मूळ मूर्तीचे दर्शन घ्यायचे असल्यास सकाळी साधारण नऊ साडेनऊपर्यंत अभिषेकादी विधी होईपर्यंत आपल्यास ते घेता येते. त्यानंतर देवीला अलंकार केला जातो. दरदिवशी विविध अलंकारात आपल्याला देवीस पाहता येते. हा अलंकार इतका अप्रतिम असतो की देवीचे कितीही डोळे भरून दर्शन घेतले तरी मन भरत नाही. यासाठी रोज अगदी मनापासून हा अलंकार करणाऱ्या पुरोहिताच्या सर्जनशीलतेचे कौतुक करावे तितके थोडेच!
मंदिरातील अद्भुत घंटा
ह्या महालसा नारायणी मंदिरातील आणखीन एक अद्भुत वैशिष्ट्य म्हणजे इथली प्रचंड पितळी घंटा. जिचा मधला रिंगर काढलेला आहे. ह्या घंटेचा पोर्तुगीज राजवटीत अचूक न्याय देण्यासाठी वापर केला जात असे. ह्या घंटेबद्दलची कथा अशी आहे की जो ही घंटा वाजवताना खोटी साक्ष देई त्याचा तीन दिवसात मृत्यू होत असे. त्यामुळे पोर्तुगीज राजवटीतही मंदिरामध्ये दिली जाणारी साक्ष ही न्यायालयात अनुज्ञेय मानली जात असे. ज्यावेळी कोणी साक्ष देऊ इच्छित असे तेव्हाच त्या घंटेला मधला रिंगर जोडला जाई. आजही ही घंटा आपल्याला मंदिरात पाहायला मिळते.
मंदिर परिसर
मंदिराचा सभोवतालचा संपूर्ण परिसरही मनोहर आहे. दोन्ही बाजूला भक्तगणांना राहण्यासाठी खोल्या, कँटीन, पुरोहितांची काही घरे ऑफिस तसेच लग्न मुंजीसाठी असलेला एक हॉल आहे. मंदिराच्या उजव्या बाजूला सध्या नूतनीकरण करून अतिशय सुंदर बनवलेले शांतेरी देवीचे मंदिर आहे. तर डाव्याबाजूला कॅन्टीनच्या अलिकडे असणाऱ्या रस्त्याने पुढे गेले की कौशिक गोत्रियांच्या सिंह पुरुषाचे मंदिर त्याच्या पुढे हल्ली काही वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला सिंह पुरुष हॉल व अधिक खोल्या आहेत.
मंदिराच्या प्रवेशद्वाराबाहेरील रस्त्यावर एक छोटेसे दत्त मंदिर आहे. औदुंबराच्या छायेतील हे दत्त मंदिर छोटेसे परंतु सुंदर आहे. ह्या रस्त्याच्या दुतर्फा अनेक छोटी हॉटेल्स आणि दुकाने आहेत.
मंदिरातील विविध कार्यक्रम
संपूर्ण वर्षभर मंदिरामध्ये विविध कार्यक्रम होत असतात. त्यामध्ये प्रमुख म्हणजे श्रावणातील जायांची पूजा, अश्विन नवरात्रातील मखर, कार्तिक महिन्यात दीपोत्सव, मार्गशीर्षात चंपा षष्ठीचा रथ, माघ महिन्यात पाच दिवस देवीची जत्रा, महाशिवरात्र उत्सव, फाल्गुन महिन्यातील रंगपंचमी उत्सव अशा अनेक कार्यक्रमांबरोबरच प्रत्येक रविवारी महालसेची पालखी, पंचमीला शांतेरीची पालखी, प्रत्येक दिवशी दुपारी आणि रात्री शांतेरी आणि महालसेची आरती असते.
अशा ह्या म्हार्दोळ येथील सुंदर महालसा मंदिराला तुम्ही अजून भेट दिली नसेल तर लवकरच जरूर भेट द्या.