गणेश चतुर्थीचा सण हा महाराष्ट्राइतकाच गोव्यातही अत्यंत प्रसिद्ध आहे. किंबहुना गणेशोत्सव हा गोव्यातील लोकांचा सर्वात आवडता सण आहे. दसरा आणि दिवाळीपेक्षाही इथे गणेशोत्सव अधिक उत्साहात साजरा केला जातो. चवथ अर्थात गणेश चतुर्थीचे वेध लोकांना श्रावण सुरु होताच लागलेले असतात. पक्का मासेखाऊ असलेल्या गोवेकरांपैकी सगळेच नसले तरी बरेचजण, श्रावण अत्यंत श्रद्धेने पाळतात. संपूर्ण श्रावण ते गणेश चतुर्थीचा उत्सव संपेपर्यंत ते शिवराक म्हणजे शाकाहारी असतात.

गणेश चतुर्थीच्या आधी दोन तीन महिने इथले मूर्तिकार मुर्त्या बनवायला सुरुवात करतात. चिकणमातीने बनवण्यात येणाऱ्या गणेश मुर्त्या रंगरंगोटीसह श्रावण संपेपर्यंत तयार झालेल्या असतात.

श्रावणाचा जसा शेवटचा आठवडा येतो तसा घरोघरी चवथीच्या तयारीला सुरवात झालेली असते. घराची रंगरंगोटी, चतुर्थीच्या सामानाची म्हणजे सजावटीच्या सामानाची, माटोळीच्या सामानाची खरेदी; त्याचबरोबर, तय म्हणजे हरतालिकेच्या पूजेची तयारी अशी सर्व लगबग महिला तसेच पुरुष वर्गात सुरु होते. महाराष्ट्राप्रमाणे इथे घरोघरी गणपती पुजले जात नाहीत, तर प्रत्येक व्यक्तीच्या मूळ घरी एक गणपती पूजला जातो. गोव्यात किंवा गोव्याबाहेर व्यवसायानिमित्त विखुरलेले सर्व आप्त स्वकीय, गणेश चतुर्थीच्या एक दोन दिवस आधी आपल्या मूळ घरात पोचतात. गावातील घरे माणसांनी फुलून जातात.  काही घरांमध्ये तर चाळीस ते सत्तर-ऐंशी लोक एकत्र येतात. शहरे मात्र या दिवसात अक्षरशः ओस पडतात. गणेश चतुर्थीनिमित्त शाळांनाही आठ दिवस सुट्टी असते.

गोव्यातील गणेश उत्सव

गोव्यामध्ये बहुतेक घरातून वार्षिक दिड दिवस गणपती असतो. तर काहींच्या कडे वार्षिक पाच दिवस असतो. मात्र काही काही वाड्यांमध्ये तिसाल असतो, म्हणजे दोन वर्षे दिड दिवस आणि तिसरे वर्ष पाच दिवस असतो. खूप क्वचित लोकांच्या कडे वार्षिक सात दिवस गणपती बसवला जातो.

माटोळी

गणपतीची आरास बनवण्यापेक्षा इथे अधिक महत्व असते माटोळीचे. माटोळी आणि चवथ हे समीकरणच बनलेलं आहे जणू. गणरायाच्या आगमनाची वार्ता माटोळीच्या साहित्याने भरलेला बाजार देत असतो. माटोळी म्हणजे वर्षा ऋतूंमध्ये मिळणाऱ्या नैसर्गिक फुले फळे आणि भाज्या यांनी सजवलेली आरास.  माटोळीमध्ये, आंब्याचे टाळे, तोरिंग, आंबाडे, ईडलिंबू, कांगल्यो, तवशे, चिबूड, कुडडूक, मावळिंग, सुपारी, नारळ, हळदीची पाने इ. अनेक फळे, भाज्या, फुले यांचा वापर केला जातो.

महाराष्ट्रात गणरायाला मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो. तर गोव्यात मोदकांपेक्षा नेवरीला महत्व असते. नेवऱ्या म्हणजे करंज्या.  सुक्या खोबऱ्याच्या साखर घालून केलेल्या गोड करंज्यांबरोबरच मिरची पूड घालून केलेल्या तिखट करंज्या आणि गूळ व ओल्या नारळाच्या करंज्याही घरोघरी बनवल्या जातात. नेवऱ्यांसोबत घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी चकल्या, शंकरपाळ्या आदि इतर फराळही केला जातो. चतुर्थीला केल्या जाणाऱ्या स्वयंपाकात मुगागाठी हे मुख्य पक्वान्न असते. तर पंचमीच्या दिवशी खतखते प्रमुख असते.

गोव्यातल्या चवथीचे मला सगळ्यात आवडणारे वैशिष्ट्य म्हणजे घुमट आरती. घुमटाशिवाय आरती ही कल्पना गोव्यात अशक्य. घुमट, झाँज, शामेळ आणि आरतीची ह्या सर्व वाद्यांच्या ठेक्यातील विशिष्ट चाल! प्रत्येक वाड्यावरची मुले चवथ जवळ येताच ह्या वाद्यांच्या दुरुस्तीला लागतात. चतुर्थीच्या दिवसात दुपारी आणि रात्रीची आरती ह्या मुलांचा ग्रुप प्रत्येक घरात जाऊन करतो. ही मुले येऊन घुमट आरती झाल्यानंतरच जेवणे होतात. गावागावामध्ये घुमट आरती वाजवणाऱ्या मुलांची पथके असतात. गणपतीचे विसर्जनही वैयक्तिक न करता वाड्यातील सर्व गणपतींचे बरोबरच केले जाते.

घुमट

गणेशोत्सव जवळ येताच. राज्यात विविध ठिकाणी घुमट आरती स्पर्धा होतात. त्यामध्ये राज्यस्तरीय स्पर्धेचा मान मुख्य. घुमट आरती वाजवणाऱ्या ह्या मुलांना पाहणे आणि ऐकणे अतिशय आनंददायी असते.  तालबद्ध असे त्यांचे वादन, त्या अनुषंगाने होणाऱ्या त्यांच्या हालचाली सगळेच ऊर्जादायी. घुमट आरती ऐकताना आणि वाजवणाऱ्या मुलांना पाहताना नकळत त्यांची ऊर्जा आपल्यामध्ये संचारली नाही तर नवल.

घरोघरच्या गणेशोत्सवाला अधिक महत्व असल्याने इथे सार्वजनिक गणपतीचे महत्व तुलनेने खूपच कमी आहे. सार्वजनिक गणपती देवळांमध्ये आणि इतरत्र नऊ किंवा अकरा दिवस असतात. परंतु गणरायाच्या कृपेने त्याला विकृत स्वरूप अजून तरी प्राप्त झालं नाही. ह्या दिवसांमध्ये शाळकरी मुलांसाठी, महिलांसाठी विविध स्पर्धा ठेवल्या जातात. त्याचबरोबर भजनी मंडळांची भजने, गाण्याचे कार्यक्रम ठेवले जातात. उगीच सिनेमातल्या गाण्यांचा भयंकर आक्रोश गोव्यातील सार्वजनिक गणेशोत्सवात कुठेही ऐकायला मिळत नाही. गणेशाची मूर्ती आणि सजावटसुद्धा मुख्यत्वे इको फ्रेंडली असतात.

असा हा गोव्यातील गणेशोत्सव; इतरत्र गेलेल्या संबंधितांना एकत्र आणणारा आणि सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुलांच्या कलागुणांना आणि गोव्यातील सांस्कृतिक परंपरांना प्रेरणा देणारा असतो.

कॅटेगरी Goa