सन्ना म्हणजे काय?
गोवन सन्ना किंवा सान्ना (Goan Sanna/ Sannas) हा एक अतिशय हलका, स्पॉंजी असा वाफवलेला तांदळाचा केक किंवा इडलीसारखा पदार्थ आहे. गोवा आणि मंगळूर येथील ख्रिश्चन समाजाबरोबरच गोव्यातील हिंदू समाजामध्येही ही गोवन पद्धतीची पारंपारिक इडली अर्थात सन्ना बनवली जातात. ख्रिश्चन बांधवांच्या लग्न समारंभामध्ये तसेच सण समारंभासारख्या विशेष प्रसंगी सन्ना बनविले जातात.
सन्ना कशी असते?
सन्ना म्हणजे दक्षिण भारतीय इडलीची गोमंतकीय आवृत्ती म्हणायला हरकत नाही. जी अधिक जाळीदार, हलकी आणि काहीशी गोडसर असते. पारंपारिक पद्धतीमध्ये सन्ना बनवण्यासाठी गावठी उकडीचे तांदूळ, किसलेले खोबरे आणि नारळाची ताडी वापरली जाते. ताडी उपलब्ध नसल्यास ड्राय यीस्ट वापरूनही सन्ना बनवतात.
सन्ना मुख्यत्वे चिकन शाकुती, मटण विंदालू यांसारख्या मसालेदार मांसाहारी पदार्थांसोबत खाल्ली जाते. तुम्ही ती चटणीबरोबरही खाऊ शकता.
आता मऊ आणि स्पॉंजी गोवन सन्ना बनवण्याची अत्यंत सोपी पद्धत पाहू.
गोवन सन्ना बनवण्यासाठी लागणारे साहित्य
इडलीचे तांदूळ अथवा कुठलाही तांदूळ: २ कप
ड्राय यीस्ट: १ लहान चमचा
साखर: ३ चमचे
पोहे: ¼ कप
किसलेले खोबरे: ½ कप
मीठ: चवीपुरते
गोवन सन्ना बनवण्याची कृती
१. तांदूळ स्वच्छ धुवून दोन ते तीन तास भिजत ठेवावे.
२. तांदूळ बारीक वाटण्यापूर्वी पंधरा मिनिटे ड्राय यीस्ट आणि एक चमचा साखर एका वाटीमध्ये १/४ वाटी पाणी घालून व्यवस्थित एकत्र करून फुगत ठेवावे.
३. पोहेही स्वच्छ धुवून १५ मिनिटासाठी भिजवून ठेवावे.
४. आता भिजत घातलेले तांदूळ निथळून घेऊन त्यामध्ये भिजवलेले पोहे, किसलेले खोबरे. २ चमचे साखर आणि एक कप पाणी घालून मिक्सरमधून जाडसर रवाळ वाटून घ्यावे.
५. बारीक वाटलेले हे पीठ एका मोठ्या पातेल्यात ओतून घ्यावे. मिक्सरच्या भांड्याला लागलेले पीठ किंचित पाणी घालून पातेल्यातील पिठात ओतावे.
६. आता ह्या पिठामध्ये एक लहान चमचा मीठ आणि फुगलेले यीस्ट घालून मिश्रण हलवून एकजीव करावे आणि एका गरम जागेमध्ये दोन तास फुगण्यासाठी ठेवावे.
७. दोन तासांनी पीठ फुलून दुप्पट होईल.
८. आता आपल्याला ज्या वाट्यांमध्ये सन्ना करायची आहेत त्या वाट्याना आतून तेल लावावे आणि प्रत्येक वाटीत साधारण ३/४ इतके पीठ घालावे.
९. इडली पात्रामध्ये आवश्यक तितके पाणी घालून ते उकळत ठेवावे. पात्रातील चाळणीवर पीठ भरलेल्या वाट्या ठेवून पात्र झाकून पंधरा ते वीस मिनिटे वाफवून घ्यावे.
१०. सन्ना थंड झाले की वाटीतून अलगद काढून घ्यावे.
मस्त मुलायम, हलकी आणि स्पॉंजी गोवन सन्ना खाण्यासाठी तयार आहे!