उत्तर गोव्यातील एक शांत आणि सुंदर किनारी गाव–केरी
केरी नावाची गोव्यामध्ये तीन गावे आहेत. एक पेडणे तालुक्यात, एक फोंड्यामध्ये आणि एक बेळगावला जाताना चोर्ला घाट लागण्यापूर्वी येते ते सत्तरी तालुक्यातले केरी. तीनही गावे निसर्गरम्य आणि स्वतःचे वेगळेपण जपणारी आहेत.
यातील पेडणे तालुक्यातील केरी गाव हे महाराष्ट्र सीमेलगतअसून, गोव्याहून वेंगुर्ल्याला जाताना लागते. सागरी किनारा लाभलेले हे शांत निसर्गरम्य गाव, कमी गर्दीचे पर्यटन स्थळ आहे. केरीला जाताना वाटेत लागणारा निसर्ग, गोव्यातील वैशिष्ट्याने परिपूर्ण परंतु आता कोकण जवळ आला आहे ह्याचा आभास होणारी गावे प्रवासाचा आनंद द्विगुणीत करतात.
पेडणे तालुक्यातील हे केरी गाव विशेष प्रसिद्ध आहे ते केरी बीच आणि देव आजोबा मंदिरामुळे. इतर समुद्रकिनाऱ्याच्या तुलनेत अतिशय स्वच्छ आणि शांत असणारा बीच आणि बीचवरील देव आजोबा मंदिराचे पावित्र्य यांचा संगम इथे अनुभवायला मिळतो.
जर तुम्ही उत्तर गोवा फिरायला येणार असाल आणि पर्यटकांच्या गर्दीपासून दूर असलेला असा शांत आणि निवांत समुद्रकिनारा तसेच समुद्रकिनाऱ्याजवळ एखादे मंदिर असा अनोखा संगम असलेल्या ठिकाणाच्या शोधात असाल तर पेडणे तालुक्यातील केरी त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.
केरी गाव कसे गाठावे?
पणजीहून साधारण ४५ कि.मी. अंतरावर असलेले केरी गाव महाराष्ट्र सीमेवर, वेंगुर्ल्याकडे जाण्याच्या मार्गावर आहे. पणजीहून पेडण्याच्या दिशेने NH ६६ हा मार्ग धरावा. केरी पर्यंत ह्याच मार्गाने जावे. स्वतःच्या वाहनाने येथे जाण्याचा प्रवास म्हणजे एक सुंदर अनुभव आहे. हिरवीगार झाडे, लहान गावे आणि कोकणातील निसर्गसौंदर्यामुळे प्रवास अत्यंत आनंददायी होतो. देव आजोबा मंदिर केरी-तेरेखोल फेरी क्रॉसिंगहून जवळच आहे.
पणजीहून बसने जाण्यासाठी पणजी पेडणे बस पकडून जाता येते.
नदीच्या दुसऱ्या बाजूने म्हणजे तेरेखोल फोर्ट पाहून तुम्ही येत असाल तर फेरी बोटीने इथे पोचता येते.
केरी बीच हा विदेशी पर्यटकांचा आवडता बीच असल्याने अनेक विदेशी पर्यटक बाईकने केरीच्या दिशेने जाताना अथवा येताना दिसू शकतात.
देव आजोबा मंदिर – केरी गावचे वैभव
केरी गावातील सर्वात महत्त्वाचे आकर्षण म्हणजे येथील देव आजोबा मंदिर.
केरीच्या सुंदर सागरी किनाऱ्याबरोबरच, जागृत देव आजोबा देवस्थानामुळे हे गाव विशेष प्रसिद्ध आहे. देव आजोबावर स्थानिक लोकांची अनन्य श्रद्धा आहे. देव आजोबा म्हणजे रक्षणकर्ता, हाक मारली की तो पाठराखण करणारच यावर भक्तांचा नितांत विश्वास आहे.
दरवर्षी साधारण फेब्रुवारी महिन्यात देव आजोबाची मोठी जत्रा भरते, ज्यासाठी अनेक भक्त इथे येतात.
देव आजोबा मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण रचना
चारीही बाजूनी भिंत नसलेले हे उघडे देवस्थान खांबांवर उभे आहे. खांबांवरती छप्पर आणि त्यावर कळसआहे. शिवाय या छप्पराच्या वर छोट्याशा घुमटीसदृश्य रचनेमध्ये असणाऱ्या विविध ऋषीमुनींच्या मुर्त्या ह्या वास्तूच्या सौन्दर्यात भर घालतात.
देवळाच्या मधोमध एक खडक आहे तोच देव आजोबा. देवळाच्या मधोमध असणाऱ्या त्या खडकावर देव आजोबांचे वास्तव्य असते असा श्रद्धाळूंचा विश्वास आहे. आपण घरातील जाणत्या वृद्ध व्यक्तीला आजोबा म्हणतो. घरातले मोठे आजोबा कसे आपल्याला सांभाळून घेतात, आपल्यावर प्रेम करतात, मोलाचे मार्गदर्शन करतात; तसाच भाव ह्या देवाबद्दल असल्याने त्याला आजोबा म्हणतात असे तिथे असणाऱ्या एका भाविकाने सांगितले.
ह्या मूळ देवाच्या सभोवतालीहीआठ खांब उभे आहेत आणि त्या खांबांवर गणपती, शंकर, विष्णू आदि देवांच्या सुबक मुर्त्या कोरलेल्या आहेत.
रचनेचे वेगळेपण असलेले हे मंदिर केरी किनाऱ्याची शोभा वाढवते.
देवळाच्या पलीकडे असणारा हिरवागार, वृक्षांनी समृद्ध डोंगर देवळाच्या सौंदर्यात आणखीन भर घालतो.
केरी बीच – स्वच्छ आणि शांत समुद्रकिनारा
मंदिराच्या अगदी शेजारीच केरी बीच आहे, जो गोव्यातील सर्वात शांत आणि स्वच्छ बीचपैकी एक मानला जातो.
केरी बीचची वैशिष्ट्ये:
- कमी गर्दी असलेला स्वच्छ समुद्रकिनारा
- परदेशी पर्यटकांमध्ये लोकप्रिय
- बीच शॅक्स आणि आरामदायक वातावरण
- शांत आणिआरामदायी अनुभव
बीचला लागून अनेक शॅक्स आहेत. जिथे खाण्या पिण्याच्या वस्तू, खास गोमंतकीय मत्स्यस्वाद असलेले जेवण मिळते. शिवाय आराम करण्यासाठी किंवा सूर्यस्नान करण्यासाठी येथे सनबेड्सचीही सोय असते. समुद्र स्नान आणि सूर्यस्नान करण्यासाठी विदेशी पर्यटक इथे गर्दी करतात.
अतिशय स्वच्छ अशा या बीचचे शांत आणि आरामदायी वातावरण अनुभवण्यासारखे आहे.
मंदिर परिसराचे पावित्र्य राखून ठेवण्यासाठी मंदिरापासून जवळच्या शॅक्समध्ये मद्याची विक्री होत नसल्याचे समजते. त्यामुळे परिसराचे पावित्र्य आणि स्वच्छता अबाधित राहते.
भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ:
ऑक्टोबर ते मार्च – पर्यटनासाठी सर्वोत्तम वेळ
फेब्रुवारी – जत्रेचा अनुभव घेण्यासाठी उत्तम
जवळील पर्यटन स्थळे
केरीला भेट देताना तुम्ही ही ठिकाणे देखील पाहू शकता:
- हरमल (Arambol)बीच: पॅराग्लाइडिंग आणि सूर्यास्त दर्शनासाठी प्रसिद्ध
- तेरेखोल फोर्ट: निसर्गरम्य आणि ऐतिहासिक महत्व असलेला किल्ला
- वेंगुर्ला: महाराष्ट्रातील समुद्रतटावरील सुंदर शहर
केरी गावाला का भेट द्यावी?
केरी हे अशा लोकांसाठी उत्तम ठिकाण आहे जे:
- शांत आणि कमी गर्दीचे बीच शोधत आहेत.
- गोव्याच्या पारंपरिक आणि धार्मिक स्थळांचा अनुभव घ्यायचा आहे.
- निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवू इच्छितात.
अशा पर्यटकांसाठी केरी गाव म्हणजे निसर्ग, अध्यात्म आणि शांतता यांचा सुंदर मिलाफ आहे.
पर्यटकांसाठी सूचना
- मंदिर परिसरात स्वच्छता राखा.
- स्थानिक परंपरांचा आदर करा.
- मंदिरात साधे आणि शालीन कपडे परिधान करा.
- सकाळी किंवा संध्याकाळी भेट द्या.