गणपतीपुळेच्या सभोवतालची आकर्षणे

गणपतीपुळे मंदिर आणि बीच पाहिल्यानंतर जवळपासची आणखी ठिकाणे पाहणे ओघाने आलेच. जयगड फोर्ट, आरेवारे बीच, प्राचीन कोकण म्युझियम, आणि मालगुंड येथे असलेले कवी केशवसुत यांचे निवासस्थान अशी काही पाहण्यासारखी स्थळे जवळच असल्याचे समजले. आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कवी केशवसुतांच्या, शाळेत शिकलेल्या अनेक कविता मनात घोळू लागल्या. तुतारी, सतारीचे बोल, आम्ही कोण इ. कविता आठवू लागल्या आणि मी सर्वप्रथम मालगुंडचा जायचे ठरवले.

गणपतीपुळे येथील गणेश मंदिरापासून अवघ्या २ कि. मी अंतरावर असणारे मालगुंड गाव! कुठल्याही कोकणातील गावाला लाभलेले सौंदर्य मालगुंड गावालाही लाभलेले आहे. अरुंद रस्ते, सभोवताली पसरलेला हिरवा निसर्ग, उतरत्या छपराची सुंदर कोकणी घरे असलेल्या ह्या गावाला कवी केशवसुतांच्या स्मारकामुळे विशेष महत्व प्राप्त झालेले आहे. महाराष्ट्राची कविता राजधानी म्हणून ते ओळखले जाते. अशा ह्या अलौकिक स्थानाला भेट द्यायला मिळणे हे माझे भाग्यच!

Tutari, Keshavsut
कवी केशवसुत : जीवन आणि साहित्यवारसा

कृष्णाजी केशव दामले उर्फ कवी केशवसुत यांचा जन्म १५ मार्च १८६६ रोजी झाला. व्यवसायाने शिक्षक असलेल्या कवी केशवसुतांचे पहिले प्रेम मात्र कविता होते. त्यांच्या काव्यरचना सर्व स्तरातील लोकांना विशेषतः साहित्य रसिक आणि काव्य प्रेमींना प्रेरणा देतात.

१९०५ मध्ये अवघ्या ३९ व्या वर्षाच्या तरुण वयात केशवसुतांचे निधन झाले. त्यांच्या अल्पायुष्यात त्यांनी १३२ कविता लिहिल्या. ह्या कवितांचे मराठी साहित्यात मोठे योगदान आहे. एकोणीसाव्या शतकातल्या त्या कठीण काळात, स्वतंत्र भारताबद्दल मजबूत दृष्टिकोन बाळगून अत्यंत निर्भयपणे लेखन केलेल्या ह्या महान कवीला समर्पित केलेले असे हे पहिलेच स्मारक आहे.

कवी केशवसुतांचे वडिलोपार्जित घर आणि आजूबाजूची जमीन मालगुंड शिक्षण संस्थेच्या ताब्यात होते. त्यांनी कवी केशवसुत स्मारक बांधण्यासाठी ते कोंकण मराठी साहित्य परिषदेला देण्याचा निर्णय घेतला. या स्मारकाचे उदघाटन १९९४ मध्ये कवी कुसुमाग्रजांच्या हस्ते झाले. पुढे पर्यटनाच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने स्मारकाचा विस्तार आणि सुशोभीकरणासाठी कोमसाप निधी मंजूर केला. पद्मश्री पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक श्री. मधू मंगेश कर्णिक यांच्या प्रेरणेने आणि समर्पणाने हे स्मारक प्रत्यक्षात उभे राहिले. त्यासाठी मधू मंगेश कर्णिकांचे आभार मानावे तेवढे थोडेच.

केशवसुत यांचे घर
स्मारकात प्रवेश करताना

हे स्मारक सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत साहित्यप्रेमी आणि पर्यटकांसाठी खुले असते. प्रवेश शुल्क केवळ १० रुपये असून इथे पर्यटकांना माहिती पुस्तिकाही दिली जाते.

फाटकातून आत प्रवेश करताच उजव्या बाजूला असलेल्या तिकीट काउंटर मधून तिकीट घेऊन आम्ही हे अत्यंत अविस्मरणीय स्मारक पाहण्यास निघालो. आवारातून आत जाताच पुढेच केशवसुतांचे घर आपल्याला दिसते. कोकणी शैलीचे हे कौलारू ग्रामीण घर सुरेख, स्वच्छ आणि प्रसन्न आहे. स्मारकाच्या सभोवतालचा परिसरही अत्यंत शांत आहे. घराच्या समोर सुंदर दगडी तुळशी वृंदावन आहे.  ह्या  वृंदावनाच्या दोन्ही बाजूला दोन दगडी दीपस्तंभ उभे आहेत. आधीच पवित्र असलेल्या त्या परिसराला समोरील तुळशी वृंदावन आणि दोन दीपस्तंभांमुळे मंदिराचे पावित्र्य प्राप्त झालेले आहे. केशवसुतांचे हे घर म्हणजे नुसते घर नसून ह्या महान कवीच्या काव्यप्रतिभेचे मंदिरच आहे नाही का? 

केशवसुतांच्या घराचा अंतर्भाग

केशवसुतांचे सामान पुनर्संचयित करून घरामध्ये योग्य जागी सुव्यवस्थितपणे मांडले आहे. त्यामुळे घरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपण भान हरपून केशवसुतांच्या काळामध्ये पोहोचतो. सामान्यपणे कोंकणी घरामध्ये असतात तशा; पडवी (व्हरांडा), माजघर, ओटा, स्वयंपाकघर, न्हाणीघर अशा विविध खोल्या घरामध्ये पाहायला मिळतात. बैठकीच्या खोलीमध्ये त्यांचे लेखनासाठीचे बैठे टेबल ठेवलेले आहे. त्यांचा जन्म ज्या खोलीमध्ये झाला त्या खोलीमध्ये त्यांची प्रसिद्ध कविता “नवा शिपाई” प्रदर्शित केलेली आपल्याला दिसते. पूर्वीच्या काळात वापरला जाणारा कंदील भिंतीवर लटकवून ठेवल्यामुळे जुन्या काळाचा स्पर्श वास्तूला झालेला आहे.

Malgund parisar
दगडावर कोरलेल्या कविता

मागील दारातून जेव्हा आपण घराच्या बाहेर येतो तेव्हा आपल्याला आकर्षित करतात त्या ग्रॅनाईट दगडावर कोरलेल्या कवी केशवसुतांच्या कविता. आम्ही कोण, तुतारी, सतारीचे बोल, इ अनेक कवितांचे ग्रॅनाईटवर कोरलेले प्रदर्शन हे मला इथे सर्वात आवडले. कितीतरी वेळ मी ह्या कविता वाचत इथे रेंगाळत होते. माझ्या सारखे इतरही काही मराठी काव्यप्रेमी इथे हरखून जाताना दिसत होते. जुन्या जाणत्या लोकांच्या चेहऱ्यावर इथे आल्यानंतर आणि शाळेत शिकलेल्या आपल्या ओळखीच्या व आवडीच्या कविता वाचल्यानंतर दिसलेला आनंद, त्यानंतर शालेय दिनात हरवलेले त्यांचे डोळे हे सारे शब्दामध्ये सांगण्याच्या पलीकडचे आहे.

सुंदर बाग आणि उभारी देणाऱ्या ओळी

इथून बाजूला एक सुंदर बाग आहे आहे व जरासे पुढे गेल्यावर कमळाचे एक तळे आहे. तळ्याच्या मागील भिंतीवर तुतारी ह्या अत्यंत नावाजलेल्या कवितेतील “प्राप्तकाल हा विशाल भूधर, सुंदर लेणी तयात खोदा” ह्या प्रेरणादायी ओळी कोरलेल्या आपणास पाहायला मिळतात. त्या दोन ओळी वाचल्यानंतर नकळत माझे मन

निजनामे त्यावरती नोंदा

बसुनी का वाढविता मेदा?

विक्रम काही करा, चला तर! 

ह्या पुढच्या ओळी गुणगुणू लागले.

हा प्राप्तकाळ म्हणजे एक मोठी संधी आहे. काहीतरी अर्थपूर्ण कार्य करून त्या संधीचे सोने करा. तुमच्या कार्याने, तुमच्या कर्तृत्वाने तुमची ओळख त्यावर नोंदा.. नुसता बसून वेळ का घालवता? काहीतरी पराक्रम करा, काहीतरी करून दाखवा, त्वरा करा.—

अशा अर्थाच्या आत्यंतिक प्रेरणादायी ओळी गुणगुणत मी आजूबाजूचा  भरपूर झाडे असलेला सुंदर परिसर न्याहाळत होते. झाडांवर बागडणाऱ्या पक्षांच्या किलबिलाटाने माझी तंद्री भंग झाली. तर समोर सांस्कृतिक आणि साहित्यिक कार्यक्रमासाठी, निसर्गाच्या सानिध्यात असलेला खुला रंगमंच दिसला. परिसराचे साहित्यिक वातावरण हा रंगमंच आणखीन खुलवत होता

Stage, malgund
पुतळा, ग्रंथालय आणि साहित्यसंपदा

तिथेच आवारात कवी केशवसुतांचा एक आकर्षक पुतळा आहे. त्याच्या डाव्या बाजूला एक ग्रंथालय आहे ज्यामध्ये मराठी साहित्यातील विविध प्रकारचे साहित्य आपल्याला पाहायला मिळते. पुस्तके आणि वर्तमानपत्रे वाचण्यासाठी इथे बसण्याची सोयही आहे. ग्रंथालयाच्या उजव्या बाजूला एक छायाचित्र आहे व ग्रंथालयाच्या ह्या भागामध्ये; स्वातंत्र्यवीर सावरकर, कवी कुसुमाग्रज, कवी अनिल, विंदा करंदीकर अशा अनेक नामांकित कवींचे काव्य साहित्य आपल्याला इथे पाहायला मिळते. काव्य प्रेमी रसिकांसाठी हे काव्य ग्रंथालय म्हणजे एक पर्वणीच आहे.

तुतारी, कवी केशवसुत
‘तुतारी’चा पुतळा – स्मारकाचे मुख्य आकर्षण

तुतारी धरलेल्या माणसाचा पुतळा आणि तो पुतळा ज्या पादपीठावर उभा आहे त्यावर केशवसुत यांच्या  तुतारी कवितेच्या ग्रॅनाईट वर कोरलेल्या हस्तलिखित ओळी  हे ह्या स्मारक परिसरातील मुख्य आकर्षण आहे.

एक अविस्मरणीय भेट

पूर्व कल्पना नसताना मी या जागेला दिलेली भेट माझ्यासाठी अत्यंत सुखद होती. माझ्यासारख्या मराठी साहित्य-काव्य प्रेमींना हे स्मारक असाच सुखद आनंद देणारे असेल हे निश्चित.

कॅटेगरी Konkan

error: Content is protected !!