गोव्याची पांढऱ्या वाटाण्याची उसळ (चण्याची उसळ)
गोव्यामध्ये विशेषतः दिवाळीच्या सणाला पांढऱ्या वाटाण्याची उसळ केली जाते. तसेच काही देवळांमध्ये प्रसाद म्हणूनही ही उसळ तयार केली जाते.
दिवाळीमध्ये निरनिराळ्या प्रकारच्या पोह्यांसोबत खाल्ली जाणारी ही पारंपारिक गोमंतकीय उसळ अतिशय चविष्ट आणि करायला सोपी आहे. पांढरे वाटाणे, ताजे ओले खोबरे आणि खोबरेल तेलातली साधी फोडणी यांपासून तयार होणारी ही उसळ गोव्याच्या पारंपारिक खाद्यसंस्कृतीचा एक स्वादिष्ट पदार्थ आहे.
दिवाळीच्या फराळाचा भाग म्हणून, रोजच्या जेवणात तोंडी लावण्यासाठी किंवा नुसतीच खाण्यासाठीसुद्धा ही उसळ उत्तम लागते.
गोव्याची पांढऱ्या वाटाण्याची उसळ करण्यासाठी लागणारे साहित्य
– पांढरे वाटाणे: २०० ग्रॅम
– ओले खोबरे: १ वाटी
– सुक्या मिरच्या: ७–८
– खोबरेल तेल अथवा कुठलेही तेल: १ मोठा चमचा
– मोहरी: १ चमचा
– जिरे: १ चमचा
– कढीपत्ता: १०–१५ पाने
– हिंग: ¼ लहान चमचा
– गरम मसाला: ½ चमचा
– मीठ: चवीनुसार
पांढऱ्या वाटाण्याची उसळ करण्याची कृती
- पांढरे वाटाणे साधारण ६ ते ७ तास पाण्यात भिजत ठेवावेत.
- कुकरमध्ये तेल गरम करावे.
- गरम तेलात मोहरी घालावी. मोहरी तडतडली की त्यात जिरे, कढीपत्ता आणि हिंग घालावे. सुक्या मिरच्यांचे तुकडे करून तेही फोडणीत घालावेत.
- तयार फोडणीत भिजवलेले पांढरे वाटाणे घालून व्यवस्थित हलवून घ्यावेत.
- आता त्यात भरपूर ओले खोबरे घालून सर्व साहित्य एकत्र मिक्स करून घ्यावे.
- त्यानंतर गरम मसाला आणि मीठ घालून पुन्हा सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावे.
- वाटाणे व्यवस्थित भिजतील इतपत पाणी घालून कुकरचे झाकण बंद करावे आणि तीन ते चार शिट्या काढाव्यात.
- कुकर थंड झाल्यावर त्याचे झाकण उघडावे. उसळीमध्ये जास्तीचे पाणी राहिले असल्यास कुकर मध्यम आचेवर ठेवून ते आटवून घ्यावे.
पारंपारिक गोमंतकीय पांढऱ्या वाटाण्याची उसळ तयार!
गरमागरम आणि चविष्ट पांढऱ्या वाटाण्याची उसळ तयार आहे!
ही उसळ नुसती खाल्ली तरी अतिशय छान लागते. तुम्हाला हवी असल्यास जेवताना तोंडी लावण्यासाठी किंवा चपातीबरोबरही ती खाऊ शकता.
विशेषतः दिवाळीच्या फराळामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या पोह्यांसोबत ही पारंपारिक गोमंतकीय उसळ खाण्याची मजा काही औरच असते.