तोर्डा गावाचा परिचय
हिरव्यागार निसर्गामध्ये लपलेली गोव्यातील सुंदर छोटी गावे आणि त्या गावामधली, जांबा दगडांनी बांधलेली, मंगलोरी छपरांच्या उतरत्या छताची खास गोवन घरे पाहणे हा माझा आवडता छंद. असेच एक माझे आवडते गाव म्हणजे तोर्डा. माझ्या राहत्या घरापासून अवघ्या एक ते दीड कि. मी. अंतरावरील हे गाव मला विशेष आवडण्याचे कारण म्हणजे; येथील छोटेसे पण सुंदर गणपतीचे देऊळ, तोर्ड्याची खाडी आणि येथील कुटुंबासोबत भेट देण्यासारखे एक प्रसिद्ध ठिकाण हाऊसेस ऑफ गोवा म्युझियम.
गोव्यातील पारंपरिक आणि भव्य घरे
गोव्यातील पारंपारिक घरांची स्वतःची अशी वैशिष्ट्यपूर्ण शैली आहे. गोव्याच्या ह्या घरांचे हे विशेष सौंदर्य मला नेहमीच आकर्षित करते. गावामधली छोटी घरे ही बहुतेक अशाच पद्धतीची असतात. ह्या घरांमुळे गोव्याचा निसर्ग आणखीन खुलतो की हा निसर्ग ह्या घरांचे सौंदर्य वाढवतो असा प्रश्न मला नेहमी पडतो. सध्याच्या इमारतींच्या जगात अशी घरे हळूहळू लुप्त होऊ लागलेली असली तरी अजूनही गावातल्या लोंकानी आपली पारंपरिक घरे सुव्यवस्थितपणे सांभाळलेली आहेत.
अशा छोट्या घरांप्रमाणेच काही अत्यंत मोठी वाड्यासारखी खास गोवन घरे आपल्याला गोव्याच्या विविध भागात पाहायला मिळतात. काही पोर्तुगीज आणि हिंदू वास्तुशैलीचा मिलाफ असलेली, काही संपूर्ण पोर्तुगीज पद्धतीची तर काही पारंपारिक हिंदू शैलीची अशी ही मोजकी घरे गोव्यातील गावांमध्ये आजही दिमाखाने उभी आहेत.
हाऊसेस ऑफ गोवा म्युझियम माहिती
ह्या अशा क्वचित पाहायला मिळणाऱ्या पारंपरिक गोवन घरांची माहिती, फोटो आणि चित्रे असेलेले संग्रहालय म्हणजे हाऊसेस ऑफ गोवा म्युझियम. ह्या म्युझियमचे जहाजाच्या आकारातील वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्य आणि त्याचा तसाच पाहत राहावा असा सुंदर परिसर केवळ पर्यटकांनाच नाही तर स्थानिक लोकांनाही भुरळ घालतो.
या संग्रहालयात; गोव्यातील घरांची वास्तुशैली, बांधकामासाठी वापरली जाणारी सामग्री आणि स्थापत्य परंपरा यांचा सखोल आणि अभ्यासपूर्ण मागोवा घेतला आहे.
जुन्या गोवन घरातील पारंपरिक वस्तू
संपूर्ण संग्रहालयात मारिओ मिरांडांच्या चित्रांचे वर्चस्व आपलयाला दिसते. त्याचबरोबर जुन्या गोवन घरांमधील आगळ्या-वेगळ्या आणि अस्सल वस्तूही लक्ष वेधून घेतात—छत्रीसारखे उघडणारे लाकडी कपड्यांचे हँगर्स, आरशांच्या फ्रेमसाठी वापरली जाणारी लाकडी हातांची जोडी, घरांच्या छपरांवर बसवले जाणारे कोंबडे, तसेच पवित्र क्रॉस, तुळशी वृंदावन, देव्हारे यांसारख्या; हिंदू आणि ख्रिश्चन धार्मिक प्रतीकांची एकत्रित उपस्थिती.
याशिवाय दोन व्यक्तींना समोरासमोर बसवून हाताने उचलून नेले जाणारे ‘माचिला’ हे जुने वाहतूक साधनही इथे ठेवलेले आहे.
जहाजाच्या आकाराचे म्युझियम
जहाजाच्या आकारातील म्युझियमचे बांधकाम जेरार्ड द कुन्हा यांनी अतिशय कलात्मकरीत्या केलेले आहे. ही इमारत तीन खांबांवर उभी केलेली आहे. मधल्या दंडगोलाकृती खांबामधूनच संग्रहालयामध्ये प्रवेश करायचा आहे. त्यासाठी नागमोडी वळणाचे जिने आहेत जे आपल्याला वरच्या मजल्यांवर घेऊन जातात.
हाऊसेस ऑफ गोवा म्युझियममधील पाहण्यासारख्या गोष्टी
पहिल्या मजल्यावर इ.स.पू. १३०० पासूनचा गोव्याचा इतिहास प्रसिद्ध व्यंगचित्रकार मारियो मिरांडा यांच्या रेखाटनांच्या माध्यमातून प्रदर्शित केलेला आहे. यामध्ये पोर्तुगीजांच्या आगमनानंतर गोव्याच्या स्थापत्यावर झालेल्या खोल आणि अपरिवर्तनीय प्रभावावर विशेष भर दिलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर इथे गोव्यातील आठ घरांचे फोटो आणि माहितीसहित प्रदर्शन केलेले आहे. ती आठ घरे आहेत.
- सोलर लोयोला फुर्तादो – चिंचणी
- कासा दोस मिरांडाज – लोटली
- द राणे हाऊस -साखळी
- कासा दो गुदिन्हो जॅक्स – माजोर्डा
- देशप्रभू कासा दो होस्पेडेस, पेडणे
- द नाईक हाऊस – मडगाव
- पॅलेसिओ सांताना द सिल्वा – मडगांव
- द फिगरेडो हाऊस – लोटली
दुसऱ्या मजल्यावर गोवन घरांमधील पारंपरिक वस्तू —ज्यामध्ये पेंटिंग्ज, अलंकार तसेच जुन्या घरांच्या वास्तूंचे काही भाग; जसे संपूर्ण कठडे, दरवाजांच्या चौकटी, मंगलोर टाईल्स, जांबा दगड, फर्निचर आदी पाहता येते.
तिसरा मजला, खुल्या सभागृहाच्या स्वरूपाचा आहे. इथे पोर्तुगीज बाल्कोआ, तुळशी वृंदावन, पारंपरिक गोवन दालने, लाकडी फर्निचर यांचे फोटो आणि माहिती पाहायला मिळते. बंद गच्चीप्रमाणे असलेल्या ह्या मजल्यावरून आणि दुसऱ्या मजल्यावर असलेल्या बाल्कनीमधून खालील रस्ता व सभोवतालचा निसर्गसुंदर परिसर न्याहाळता येतो.
म्युझियमचे खांब: वास्तूकौशल्याचा देखणा आविष्कार
ही जहाजाकृती इमारत उभी असलेले दोन्ही बाजूचे खांब तर खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहेत. पूर्वीच्या काळी मसाला वाटण्यासाठी दगडी ग्राइंडर असायचा ज्याला रगडा म्हटले जायचे. गोल आकाराच्या ह्या खोलगट रगड्यामध्ये, लंब गोलाकृती दगडाने मसाला वाटला जाई. बाजूचे हे दोन्ही खांब ह्या अशा मोठ्या दगडी रगड्यावर उभारलेले आहेत.
ही संपूर्ण इमारत आपल्या वैशिष्ट्यपूर्ण वास्तूकौशल्यामुळे अत्यंत लोभसवाणी दिसते.
म्युझियम परिसरातील इतर आकर्षणे
प्रसिद्ध वास्तुविशारद जेरार्ड द कुन्हा ह्यांच्या कल्पकतेतून हा म्युझियम आणि आजूबाजूच्या परिसराची निर्मिती झालेली आहे. म्युझियमच्या परिसरात आपल्याला पाहायला मिळते.
- जेरार्ड कुन्हा यांचे पाहताक्षणीच लक्ष वेधून घेणारे राहते घर
- शिक्षा निकेतन आणि निशा’ज प्ले स्कूल ह्या स्थानिक परंपरेशी नाळ जोडलेल्या दोन आगळ्या वेगळ्या शाळा
- संगीत आणि नृत्य वर्गाची इमारत
- शाळेच्या बाहेरील ऍम्पिथिएटर
- सपनोंका पूल हा झुलता पूल
- मिरांडा आर्ट गॅलरी
सपनोंका पूल, मिरांडा टच पुतळे आणि परिसर
प्ले स्कूल जेरार्ड पत्नी निशा यांच्या नावे उभी आहे तर संगीत आणि नृत्य वर्ग जेरार्ड यांच्या आई मेरी यांच्या नावे चालते.
सगळ्यात वैशिष्टपूर्ण असलेल्या ऍम्पिथिएटरच्या भिंती रिसायकल केलेल्या बिअरच्या बाटल्यांच्या साहाय्याने उभ्या केल्या आहेत.
सपनोंका पूल हे पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे. ह्या पुलाच्या बाजूचा निसर्ग आणि ऍम्पिथिएटरजवळ उभे असणारे खास मिरांडा टच पुतळे, हे सारेच पर्यटकांची गर्दी खेचत असते.
मिरांडा आर्ट गॅलरी
म्युझियमच्या विरुद्ध दिशेला, म्हणजे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या मिरांडा गॅलरीमध्ये प्रसिद्ध कार्टूनिस्ट मारिओ मिरांडा यांची मूळ कार्टून्स व पुनर्निर्मित कार्टून्स विक्रीसाठी आहेत. त्याचबरोबर त्यांची कार्टून्स प्रिंट केलेल्या अनेक वस्तूही इथे विकत मिळतात.
हाऊसेस ऑफ गोवा म्युझियमपर्यंत पोहोचण्याचा मार्ग
पर्वरी या गोव्यातील गजबजलेल्या शहराजवळील तोर्डा गावात हे म्युझियम आहे. तोर्डा गाव साल्वादोर द मुंदो या पंचायत क्षेत्रात येते. पणजीहून म्हापशाकडे जाताना कोकेरो सर्कलवरून उजवीकडे वळल्यावर साधारण दोन कि.मी. अंतरावर हाऊसेस ऑफ गोवा म्युझियम आहे. पणजी बस स्थानकापासून म्युझियमचे अंतर सुमारे ८ कि.मी. आहे. कार किंवा दुचाकीने येथे पोहोचण्यासाठी अर्धा तास पुरेसा आहे.
वेळ आणि प्रवेश फी
प्रवेशाची वेळ: मंगळवार ते रविवार सकाळी १० ते ७:३०
हाऊसेस ऑफ गोवा साठी प्रवेश फी: Rs १५०/-
झुलत्या पुलासाठी प्रवेश फी: Rs. ५०/-
जवळपासची आकर्षणे
मांडवी पुलाने पणजीला जोडलेल्या पर्वरी पासून म्युझियम अगदी जवळ आहे. देशी विदेशी पर्यटक आणि स्थानिक लोकांचेही आवडते, मॉल द गोवा इथून जवळ आहे. म्युझियम गावात असल्यामुळे सुंदर निसर्ग, तोर्ड्याची खाडी हे ही इथे गेल्यावर पाहायला मिळते. पोंबुर्पा झरी जवळच १०-१५ मिनिटाच्या अंतरावर आहे. पणजी शहरसुद्धा अवघ्या ७-८ कि.मी. अंतरावर असल्याने पणजीतील फोंतेन्हास, मिरामार बीच, दोना-पावला हे सुद्धा पाहता येते. कळंगुट बीच आणि ओल्ड गोवा सुद्धा इथून साधारण १५ कि. मी. अंतरावर आहे.





