मला गोवा विशेष कशासाठी आवडत असेल तर तो इथल्या नितांत सुंदर मंदिरांसाठी. गोव्यातील मंदिरांचे स्थापत्य जरी साधारणपणे एकसारखे वाटत असले, तरी प्रत्येक मंदिराची अनुभूती आणि तिथे मिळणारा आनंद यांची तुलना होऊ शकत नाही. अशी पाहण्यासारखी असंख्य मंदिरे गोव्यात आहेत. त्यापैकी पर्यटकांना विशेष आकर्षित करणाऱ्या मंदिरांमध्ये मंगेशी येथील श्री मंगेश मंदिर आणि कवळे येथील श्री शांतादुर्गा मंदिर यांचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल.
यापैकी श्री शांतादुर्गा देवीचे मंदिर फोंडा तालुक्यातील कवळे या गावात आहे. पणजीपासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर असलेले हे मंदिर डोंगराच्या पायथ्यावरील उतारावर वसलेले आहे. सभोवताली हिरवाईने नटलेला सुंदर निसर्ग, शांत आणि रमणीय वातावरण यामुळे हे मंदिर गोव्यातील भव्य आणि सुंदर मंदिरांमध्ये अग्रस्थानी आहे.
शांतादुर्गा मंदिराचे स्थापत्य
श्री शांतादुर्गा मंदिराच्या वास्तुशैलीचे वैशिष्ट्य म्हणजे येथे भारतीय आणि पोर्तुगीज वास्तुशैलीचा सुरेख संगम पाहायला मिळतो. मंदिराची रचना गोव्यातील इतर मंदिरांपेक्षा थोडी वेगळी असून त्यामध्ये पिरॅमिड आकाराचे शिखर, रोमन शैलीतील कमानदार खिडक्या आणि कठड्यांनी वेढलेला सपाट घुमट अशी वैशिष्ट्ये दिसून येतात.
मंदिराच्या गडद लाल आणि पांढऱ्या रंगांचे परस्परविरोधी संयोजन त्याचे स्वरूप अधिक आकर्षक बनवते. मुख्य मंदिराच्या दोन्ही बाजूंना प्रशस्त अग्रशाळा (धर्मशाळा) उभारण्यात आलेल्या आहेत.
मंदिर परिसरात सगळ्यात अधिक काय आकर्षित करत असेल तर मंदिरामध्ये प्रवेश करताना दिसणारी स्वच्छ पुष्करणी अर्थात तळी आणि मंदिरासमोरील नयनमनोहर दीपस्तंभ. मंदिरातील विविध उत्सवांच्या वेळी हा दीपस्तंभ उजळलेल्या असंख्य दिव्यांमुळे इतका मोहक दिसतो की दर्शनाला आलेले भाविक मंत्रमुग्ध झाल्याशिवाय राहत नाहीत.
आदिमाया शांतादुर्गेची पौराणिक कथा
देवी शांतादुर्गा ही आदिमाया दुर्गेचे एक शांततामय स्वरूप मानले जाते. याबद्दल अशी पौराणिक कथा सांगितली जाते की, एकदा भगवान शिव आणि भगवान विष्णू यांच्यामध्ये भीषण युद्ध सुरू झाले. ह्या महाभयंकर युद्धामुळे संपूर्ण सृष्टी संकटात सापडली. तेव्हा भगवान ब्रह्मदेवांनी आदिमाया दुर्गेची प्रार्थना केली आणि हे युद्ध थांबविण्याची विनंती केली.
देवीने आपल्या एका हातात भगवान शिव आणि दुसऱ्या हातात भगवान विष्णू यांना धरून दोघांमध्ये समेट घडवून आणला. त्यामुळे युद्ध थांबले आणि पुन्हा जगात शांतता प्रस्थापित झाली.
याच कारणामुळे आदिमाया दुर्गेच्या या स्वरूपाला ‘शांतादुर्गा’ असे नाव प्राप्त झाले.
ह्या पौराणिक घटनेचे स्मरण म्हणून शांतादुर्गा मंदिराच्या गाभाऱ्यात देवीच्या सुंदर मूर्तीच्या दोन्ही बाजूंना भगवान शिव आणि भगवान विष्णू यांच्या छोट्या मूर्ती स्थापित केलेल्या आहेत.
देवी शांतादुर्गा ही भगवान शिवाची पत्नी असल्याने देवीच्या पूजेसोबत भगवान शिवांचीही पूजा करणे आवश्यक मानले जाते. याच कारणामुळे गाभाऱ्यात देवीच्या मूर्तीशेजारी काळ्या दगडातील साधारण सहा इंच उंचीचे शिवलिंग स्थापित केलेले आहे. अभिषेकाच्या वेळी देवी आणि शिवलिंग या दोन्हींची एकत्रित पूजा केली जाते.
श्री शांतादुर्गा देवीच्या मूर्तीचा इतिहास
आज मंदिराच्या गाभाऱ्यात जी मूर्ती पाहायला मिळते, तिचा इतिहासही अतिशय रोचक आहे.
मंदिरातील मूळ मूर्ती इ.स. १८९८ मध्ये पठाणांनी चोरून नेली. त्यानंतर श्री लक्ष्मण कृष्णाजी गायतोंडे यांनी देवीची नवीन मूर्ती घडवली. या नव्या मूर्तीची १९ मार्च १९०२ रोजी, म्हणजेच शके १८२३, फाल्गुन शुक्ल दशमी या दिवशी विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली.
परंतु नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना होईपर्यंत कवळे मठाच्या गौडपादाचार्यांच्या अधिपत्याखाली श्री भवानीशंकर यांच्या मूर्तीसह श्री शांतादुर्गेची पूजा केली जात असे. नव्या मूर्तीच्या स्थापनेनंतर ही पूर्वीची मूर्ती देवीच्या मूर्तीच्या मागे असलेल्या कपाटातील मंदिरात ठेवण्यात आली. आजही या मूर्तीची नित्यपूजा केली जाते.
श्री शांतादुर्गा मंदिराचा इतिहास
शांतादुर्गा देवीचे मूळ मंदिर केळोशी (Quelossim) येथे होते. त्या काळी देवीची शांतेरी देवी या नावाने पूजा केली जात असे.
गोव्यात पोर्तुगीजांचे राज्य आल्यानंतर वाढत्या धार्मिक छळामुळे हिंदूंना आपल्या मंदिरांची आणि देवी-देवतांच्या मूर्तींच्या सुरक्षिततेची चिंता वाटू लागली. तेव्हा श्री शांतादुर्गा आणि श्री मंगेश यांच्या भक्तांनी एका अमावस्येच्या रात्री आपली घरे सोडली. देवीची मूर्ती आणि शिवलिंग डोक्यावर घेऊन त्यांनी जुवारी नदी ओलांडली आणि आदिलशहाच्या राज्याच्या हद्दीत प्रवेश केला.
दांडीमार्गे ते फोंडा तालुक्यातील कवळे येथे पोहोचले. तेथील निसर्गसुंदर परिसर पाहून त्यांनी श्री शांतादुर्गा देवीची मूर्ती येथे स्थापित केली. केळोशीप्रमाणेच रमणीय आणि निसर्गरम्य असलेले हे स्थान भक्तांना लाभले.
सध्याच्या शांतादुर्गा मंदिराची उभारणी
सध्याच्या भव्य मंदिराच्या उभारणीची प्रेरणा श्री शांतादुर्गा देवीने नारोराम मंत्री यांना दिली, अशी श्रद्धा आहे.
नारोराम मंत्री यांचे पूर्ण नाव नारोराम शेणवी रेगे होते. ते वेंगुर्ला परिसरातील कोचर गावचे मूळ रहिवासी होते. छत्रपती शाहू महाराजांच्या दरबारात मंत्री म्हणून कार्यरत असल्यामुळे त्यांना नारोराम मंत्री म्हणून ओळखले जात असे.
देवीच्या कृपेमुळेच आपल्याला मान, कीर्ती आणि वैभव प्राप्त झाले, अशी त्यांची गाढ श्रद्धा होती. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या खर्चाने देवीसाठी भव्य मंदिर उभारण्याचा संकल्प केला.
इ.स. १७३० च्या सुमारास मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली. इतर महाजनांच्या सहकार्याने हे भव्य मंदिर पूर्णत्वास गेले आणि इ.स. १७३८ मध्ये मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले.
नारोराम मंत्री यांच्या प्रयत्नांमुळे इ.स. १७३९ मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी कवळे गाव मंदिराला इनाम म्हणून प्रदान केले. त्यांनी मंदिराला अनेक देणग्याही दिल्या.
नारोराम मंत्री यांच्या अतुलनीय योगदानामुळे मंदिरात त्यांच्या कुटुंबाला विशेष मान दिला जातो. धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या वेळी त्यांच्या वंशजांचा विशेष सन्मान केला जातो.
शांतादुर्गा मंदिरातील प्रमुख उत्सव
शांतादुर्गा मंदिरात दरवर्षी, माघ महिन्यात म्हणजे साधारण जानेवारी किंवा फेब्रुवारी मध्ये वार्षिक जत्रा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरी केली जाते. या जत्रेदरम्यान देवीची सुवर्ण पालखीतून भव्य मिरवणूक काढली जाते. या सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक मंदिरात उपस्थित राहतात.
याशिवाय मंदिरात खालील प्रमुख धार्मिक उत्सवही साजरे केले जातात:
- लालखी उत्सव
- मुक्ताभरणी उत्सव
- तुळशी विवाह
- काला उत्सव
शांतादुर्गा मंदिर दर्शनाची वेळ
श्री शांतादुर्गा मंदिरातील दर्शनाची वेळ:
- सकाळी: ५:३० ते दुपारी १२:३०
- दुपारची विश्रांती: १२:३० ते १:३०
- दुपारनंतर: १:३० ते रात्री ८:३०
शांत, प्रसन्न वातावरण, निसर्गरम्य परिसर, वैशिष्ट्यपूर्ण वास्तुकला आणि श्री शांतादुर्गा देवीचे जागृत देवस्थान यामुळे कवळे येथील श्री शांतादुर्गा मंदिर हे गोव्यातील आवर्जून भेट द्यावे असे मंदिर आहे.
गोव्याच्या मंदिरांचा इतिहास, धार्मिक परंपरा आणि स्थापत्य अनुभवण्याची इच्छा असेल, तर या मंदिराला आपल्या गोवा प्रवासाच्या यादीत नक्कीच स्थान द्यावे.
श्री शांतादुर्गा मंदिराच्या जवळ पाहण्यासारखी गोव्यातील इतर मुख्य मंदिरे
- नागेश देवस्थान: अवघ्या दीड कि. मी. असणारे नागेशी बांदोडा येथील भगवान शंकरांचे सुंदर मंदिर.
- महालक्ष्मी मंदिर: नागेशी पासून जवळच बांदोडा येथे असलेले देवी लक्ष्मीचे मंदिर.
- रामनाथ मंदिर: शांतादुर्गा मंदिरापासून साधारण दीड कि. मी. अंतरावर असणारे प्रशस्त असे सुंदर मंदिर.
- मंगेश देवस्थान: साधारण सहा कि. मी. अंतरावर मंगेशी, प्रियोळ येथे असणारे अत्यंत प्रसिद्ध शिवमंदिर.
- महालसा नारायणी मंदिर: मंगेशी पासून अवघ्या दीड दोन कि. मी. अंतरावर असणारे विष्णूचा अवतार मोहिनी अथवा नारायणीचे प्रख्यात मंदिर.
- लक्ष्मी नरसिंह मंदिर: म्हार्दोळहून साधारण दोन कि. मी. अंतरावरील भगवान नरसिंहाना समर्पित निसर्ग सुंदर मंदिर.