महाराष्ट्राच्या सिंधदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्याला बऱ्याच वर्षांपूर्वी, म्हणजे जवळ जवळ पंचवीस सव्वीस वर्षांपूर्वी भेट दिली होती ती रेडीच्या स्वयंभू गणपती आणि शिरोड्याच्या वेतोबाचे दर्शन घेण्यासाठी म्हणून गेलो होतो तेव्हा…. त्यानंतर पुन्हा रेडी आणि परिसर परत एकदा पाहण्याची संधी नुकतेच कोकण प्रवासाला गेलो असता मिळाली. तर हा वेंगुर्ला सफरनामा तुमच्यासाठी.

गणपती मंदिर, यशवंत गड, व्हर्जिन बीच आणि खाण उद्योगासाठी रेडी गाव प्रसिद्ध

गोव्यातील तेरेखोल पासून अवघे आठ दहा किलोमीटर अंतरावर असलेले महाराष्ट्राच्या वेंगुर्ला तालुक्यातील रेडी गाव हे गणपतीच्या मंदिराबरोबर खाण उद्योगासाठीही प्रसिद्ध आहे. गावात प्रवेश करताच इथली लाल माती इथल्या मायनिंग उद्योगाची जाणीव करून देते. रेडी गणेश मंदिराकडे पोचताच बाहेर असलेल्या फुले दुर्वा, नारळ, प्रसादासाठी मोदक, लाडू इत्यादींबरोबरच काही खाण्याचे जिन्नस असलेल्या दुकानाच्या महिला स्वामीनींनी दुर्वा फुले घ्या म्हणून हाकारे घालायला सुरुवात केली. त्यातल्याच एका कमी आवाज करणाऱ्या स्त्री कडून फुले, दुर्वा घेऊन आम्ही मंदिराच्या दिशेनं निघालो.

पंचवीस वर्षांपूर्वी मी बघितलेल्या मंदिरात बराच फरक झालेला दिसत होता. त्यावेळी पाहिलेले मंदिर छोटे होते आता मंदिराच्या समोर भव्य सभामंडप होता, जो भक्तगणांनी भरून गेला होता.. मंदिराच्या समोर आमचे स्वागत गायी गुरांनी केले. भक्तगण त्यांना केळी वगैरे खाऊ घालत असल्यामुळे ही गुरे बरीच धीट झाली होती. त्यातल्या काही छोट्या बहादुरानी थेट सभामंडपात प्रवेश केलेला होता. सभामंडप ओलांडून आम्ही गाभाऱ्यासमोरील छोट्या सभागृहात प्रवेश केला. गणपतीची लोभसवाणी मूर्ती मन प्रसन्न करून गेली. परंतु मन पुन्हा मागे गेले आणि त्यावेळी पाहिलेल्या गणपतीला आठवू लागले.

रेडी गणपती वेंगुर्ला

रेडीच्या गणपतीची कथा.

रेडीचा गणपती स्वयंभू. ह्या गणेश मंदिराच्या निर्मितीमागेही एक कथा आहे. रेडी गावातल्या नागोळे वाडीतील सदानंद कांबळी नामक तरुणाला एक स्वप्न पडले. त्या स्वप्नात प्रत्यक्ष गणेशाने त्यास आदेश दिला एका ठराविक ठिकाणी माझी मूर्ती आहे तिला मोकळे करावे. तेव्हा श्री कांबळी आणखीन काही लोकांना मदतीला घेऊन त्या विशिष्ट ठिकाणी गेले आणि तेथे खणण्यास सुरवात केली असता दोन दिवसात मूर्तीच्या कानाकडील भाग दिसू लागला. एक महिन्याच्या खोदकामानंतर संपूर्ण मूर्ती मोकळी करता आली.

पांडवकालीन मूळ मूर्तीत बदल

गणेशाची ही मूर्ती जांभा दगडावर कोरलेली होती आणि तिचे सारे अवयव जशास तसे होते. मूर्ती पांडवकालीन असावी असा तज्ञांचा अंदाज आहे.

ही  सारी माहिती बाहेरील सभामंडपामध्ये लिहून ठेवलेली आहे. ती वाचताच मला पूर्वी पाहिलेली मूर्ती ही अशीच मूळ स्वरूपात पाहिलेली आठवले. आता समोर जी मूर्ती होती ती मात्र मूळच्या स्वरूपाला रंग देऊन तिचे नूतनीकरण केले होते. अंगावर पितांबर, डोक्यावर सोनेरी मुकुट, एका हातात मोदक, दुसरा हात  आशीर्वादासाठी उंचावलेला अशी ती मूर्ती सुबक आणि आकर्षक दिसत होती.

कनियाळ हत्तीची सोंड

रेडी गणपतीचे दर्शन घेऊन आम्ही पुढे यशवंतगडला जाण्यासाठी निघालो असता वाटेत आम्हाला कनियाळ हत्तीची सोंड असा बोर्ड दिसला. हे नक्की काय आहे याची उत्सुकता निर्माण झाल्याने आम्ही त्या दिशेस वळलो. एका छोट्याशा रस्त्यावरून वळसे घेत आम्ही पुढे चाललो तरी कुठे काहीच दिसेना. आम्ही वाट तर चुकलो नाही ना असा विचार करत असतानाच समोर एक सेक्युरिटी गार्डाच्या वेशातील व्यक्ती बसलेली दिसली त्याच्याकडे चौकशी केली असता, “इथेच आहे, चला दाखवतो, गाडी पार्क करा” असे तो म्हणाला. आम्ही त्याच्यामागून निघालो. एक अरुंद पायवाट, पुढे काही मातीच्याच पायऱ्या, डोक्यावर येऊ लागलेला सूर्य. पाच दहा मिनिटांनी आम्ही त्या इथेच असलेल्या हत्तीच्या सोंडेकडे घामाघूम होऊन पोचलो.

हत्तीची सोंड

हत्तीची सोंड म्हणजे एक खडक होता. ज्यावर हत्तीची सोंड कोरलेली. हत्तीचे कान, डोळे, दात स्पष्ट दिसत होते. हे दृश्य एका बाजूचे होते. पलीकडच्या बाजूस जाण्यासाठी अगदी चिंचोळी जागा होती. लहानशा डोंगराच्या कड्यावर ही हत्तीची सोंड असल्याने पलीकडे खाली, दरी नाही म्हणता येणार पण खोल भाग होता. पलीकडच्या बाजूचे दर्शन घेण्यासाठी त्या हत्तीच्या सोंडेलाच घट्ट पकडून त्या चिंचोळ्या दगडावरून स्वतःला सांभाळत पलीकडे जायचे होते. बाकी मंडळींच्या मागोमाग मी ही थोडी भीत भीत हत्तीचे पलीकडचे दर्शन घेतले. मला हत्ती पेक्षा हा गणपती असावा असाच आभास होत होता.

ही हत्तीची सोंडही पांडवकालीन असल्याचे आमच्यासोबत आलेल्या व्यक्तीने सांगितले. वनवासात असताना पांडव तिथे आले होते त्यांनी ही मूर्ती कोरलेली होती, असे तो म्हणाला.  परंतु पहाट झाल्याने ती मूर्ती पूर्ण न करता ते निघून गेले. जवळच एक भले मोठे जाते होते. ते ही पांडवांचे होते अशीही माहिती आम्हास मिळाली.

यशवंत गड

इथून पुढे आम्ही यशवंत गड जो रेडीचा किल्ला म्हणून ओळखला जातो तिथे पोचलो. जैतापूर खाडीच्या उत्तरेला एका छोट्याशा डोंगरावर यशवंतगड किल्ल्याचे केवळ भग्न अवशेष आता पाहायला मिळतात.

यशवंत गड, वेंगुर्ला
यशवंत गड फोर्ट, वेंगुर्ला

 

यशवंतगडाचा इतिहास

हा किल्ला इ.स ६१०-११ मध्ये चालुक्य राजा स्वामीराजाचे प्रमुख व्यापारी केंद्र होते असा अंदाज आहे. किल्ल्याचा माहित असलेला इतिहास मात्र विजापूरच्या आदिलशहा पासून सुरु होतो. आदिलशहा कडून हा किल्ला वाडीच्या सावंतांनी जिंकला. त्यांच्याकडून तो शिवाजी महाराजांनी जिंकला व तो दुरुस्त करून मजबूत बनवला. पुढे अठराव्या शतकात तो पोर्तुगीजांनी काबीज केला.

यशवंत गडाची सद्य परिस्थती

आता किल्ल्यामध्ये फक्त झाडांचे जंगल आणि त्यांची मुळे घुसून भग्न झालेलं किल्ल्याचे अवशेष, ज्यामध्ये वरचे छप्पर उडालेल्या खोल्या, कॉरिडोर इतकेच काय ते पाहायला मिळते.. किल्ल्यावरून बाजूलाच पसरलेला पांढऱ्या शुभ्र वाळूचा व्हर्जिन बीच सुंदर दिसतो. किल्ल्यामध्ये वाढलेल्या जंगलात माकडे तसेच विविध पक्षी पाहायला मिळतात.

भारतीय पर्यटकांबरोबरच. रशियन पर्यटक ह्या किल्ल्याला भेट द्यायला येत असतात. इथे असणाऱ्या रशियन भाषेतील पाट्या किल्ला भागात रशियन पर्यटकांचा वरचष्मा असल्याचे सांगून जातात.  

 

यशवंतगड भग्नावशेष,वेंगुर्ला
यशवंत गड भग्न वाडा, वेंगुर्ला

अरवली गावचा श्री देव वेतोबा

यशवंतगडचे दर्शन झाल्यावर आम्ही पुढे वेंगुर्ला तालुक्यातील दुसरे प्रसिद्ध ठिकाण म्हणजे अतिशय जागृत असे शिरोड्याचे वेतोबा मंदिर पाहण्यास गेलो. अरवली शिरोडा गावात असणारे हे मंदिर वेंगुर्ला शहरापासून १२ किमी अंतरावर आहे. केवळ कोकणच नाही तर गोव्यातील श्रद्धाळुंची सुद्धा शिरोड्याच्या ह्या जागृत ग्रामदैवतावर नितांत श्रद्धा आहे. देव वेतोबा नवसाला पावणारा असा त्याच्या भक्तांचा प्रगाढ विश्वास. वेतोबाला चामड्याच्या चपलांचा नवस बोलला जातो. चामड्याच्या चपला घालून वेतोबा रात्रीचा राखण करायला बाहेर पडतो असे श्रद्धाळू मानतात.  चामड्याच्या भल्या मोठ्या आकाराच्या कितीतरी झिजलेल्या अवस्थेतील चपला मंदिरात पाहायला मिळतात.

श्री देव वेतोबा मंदिर

वेतोबाची द्विभुज अशी मानवाकृती भव्य मूर्ती, चेहरा आणि विशेषतः डोळे काहीसे उग्र वाटले तरी मूर्तीकडे पाहिल्यावर मन मोहून जाते. वेतोबा नक्कीच आपल्या पाठीशी आपले रक्षण करण्यासाठी उभा आहे हा विश्वास मूर्तीकडे पाहिल्यावर सहज जागृत होतो आणि पुन्हा दर्शनाला यायचे असा निश्चय केल्याशिवाय आपण तिथून मागे फिरत नाही. 

कॅटेगरी Konkan