देवी लईराई म्हणजे कोण?

गोव्याच्या प्रसिद्ध शिरगाव जत्रा आणि अग्निदिव्याची रोचक कथा

गोव्यातील अनेक पूजनीय देवतांपैकी एक देवता म्हणजे देवी लईराई! देवी लईराईला एक शक्तिशाली ग्रामदेवता मानले जाते त्यामुळे तिचा भक्तगणही मोठा आहे. देवी लईराईचे प्रसिद्ध मंदिर शिरगाव येथे आहे, जे अनेक भाविकांना आणि पर्यटकांना आकर्षित करते. लईराई देवीची जत्रा अग्निदिव्य प्रथेमुळे अत्यंत प्रसिद्ध आहे.

गोव्यातील स्थानिक लोकांची लईराईवर अपार श्रद्धा आहे. परंतु गोव्यामध्ये नव्याने आलेले आणि पर्यटक यांना मात्र, “लईराई कोण?” याबद्दल उत्सुकुता दिसून येते. त्यासाठी  देवी लईराई आणि तिच्या सात भावंडांची कथा जाणून घेतली पाहिजे, जी अतिशय अद्भुत आहे.

lairai devi

देवी लईराई आणि तिच्या  भावंडांची कथा

काशीतून गोव्यापर्यंतचा प्रवास – मये गावाशी जोडलेली गोष्ट

सुमारे ७००–८०० वर्षांपूर्वी, आठ भावंडे — सात बहिणी आणि एक भाऊ — पवित्र काशी तीर्थक्षेत्राहून प्रवास करत दक्षिणेकडे आली. दक्षिणेतील घाटमाथ्यावरून ही भावंडे गोव्यातील डिचोली येथे आली व तिथल्या देवी श्री शांतादुर्गेकडे पाहुणचारासाठी थांबली. 

शांतादुर्गेने आपल्या दिव्य शक्तीने ही आठ भावंडे देव देवता असल्याचे ओळखले व त्यांना मये येथे जाण्याचा सल्ला दिला.

शांतादुर्गेच्या सांगण्यावरून ही भावंडे; आज ‘सात मायेची वसका’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मये येथील प्रसिद्ध वडणे या ठिकाणी विश्रांती साठी थांबली.

निसर्गाने नटलेल्या ह्या गावात सात बहिणी आणि एक भाऊ अशी ही आठही सुंदर भावंडे लोकांचे लक्ष वेधून घेत होती. पण ह्या सुंदर भावंडांच्या प्रेमळ कथेला एक वेगळेच वळण लागायचे होते. ह्या भावंडामधील प्रेमाच्या बंधाची जणू नशीब परीक्षा घेत होते.

अशाप्रकारे नियती, विभक्तता आणि प्रायश्चित याभोवती ही कथा गुंफली गेली.

khetoba
अग्निदिव्याची कथा

ह्या सात भावंडात थोरली असणारी केळबाई एकदा जेवणाची सोय करण्याकरता गावातून अग्नी आणण्यासाठी धाकट्या खेतोबास पाठवते. गावात गेलेला बालवयातील खेतोबा, तिथे खेळत असणाऱ्या काही मुलांचा खेळ पाहण्यात रमून जातो .

बराच वेळ झाला तरी खेतोबा परतत नाही म्हणून केळबाई लईराईस त्याला पाहण्यासाठी पाठवते. लईराई गावात पोहोचते तो तिला आपला भाऊ खेळ पाहण्यात रमलेला दिसतो. हे पाहून लईराई रागावते आणि त्याच्या कंबरेत लाथ मारते. त्यामुळे रागावलेला खेतोबा परतण्यास नकार देतो व तो वाइंगीनी येथे निघून जातो.

लईराई एकटीच मागे फिरते. थोड्या वेळाने राग शमल्यानंतर तिला आपल्या कृत्याचे वाईट वाटते आणि ती तिथून शिरगावला निघून जाते. आपल्या कृतीचे प्रायश्चित म्हणून ती अग्नी वरून चालण्याचे अग्निदिव्य करते. म्हणून लईराई देवीचे हजारो धोंड आजही निखाऱ्यावरून चालण्याचे अग्निदिव्य करतात. 

kelbai of mulgaon
मुळगावातील केळबाईचा अग्निविधी

हे सगळे घडण्यास केळबाई स्वतःला जबाबदार धरते आणि मुळगाव येथे निघून जाते.

प्रायश्चित करण्यासाठी ती आपल्या डोक्यावर अग्नीचे आगटे म्हणजे अग्नीने भरलेला माठ घेऊन अग्निदिव्य करते. म्हणून मुळगावच्या जत्रेत आजही केळबाईचे धोंड डोक्यावर माले घेऊन नाचतात. हा अनुभव अत्यंत भावनिक आणि अद्भुत असतो.

आठही भावंडांची आठ स्थाने

ह्या बहिणींना गोव्यातील लोक ग्रामदेवता म्हणून पूजतात. त्यांना माया म्हणजे प्रथम माता मानतात.

थोरल्या बहिणीच्या केळबाईच्या आज्ञेने इतर भावंडे पुढे वेगवेगळ्या ठिकाणी स्थायिक झाली. ती ठिकाणे पुढीलप्रमाणे:

  • लईराई: शिरगांव
  • केळबाई: मुळगांव
  • महामाई: मये
  • मीराबाई (मिलाग्रेस): म्हापसा
  • मोरजाई: मोरजी
  • आजादीपा: अंजदीप द्वीप, कारवार
  • शीतलाई: अरबी समुद्र तटावर
  • देव खेतोबा: वायंगिनी

अशा आठ ठिकाणी ह्या आठ भावंडांची मंदिरे आहेत. 

ही भावंडे वर्षातून एकदा भेटवस्तू घेऊन एकमेकांना भेटतात असे गोव्यातील सर्व भाविक मानतात.

our lady of Miracles, milagres

अवर लेडी ऑफ मिरॅकल्समध्ये रूपांतर झालेली मीराबाई

या कथेमधील एक विशेष भाग म्हणजे मिराबाईचे रूपांतर.

मीराबाई ही ह्या सात बहिणीतील एक, सध्याची म्हापसा येथील आवर लेडी ऑफ मिरॅकल्स अर्थात मिलाग्रेस! पोर्तुगीजांच्या कारकिर्दीत ह्या मीराबाईचे मंदिर नष्ट करण्यात आले तेव्हा मीराबाईने मिलाग्रेसचे रूप धारण केले असे मानले जाते. 

गोव्यातील धार्मिक ऐक्याचे प्रतीक

आजही दोन वेगवेगळ्या धार्मिक श्रद्धांमध्ये एक सुंदर परंपरा आहे:

मिलाग्रेस सायबिणीचे फेस्त असते तेव्हा शिरगांव येथील लईराईच्या देवस्थानातून तिला तेल अर्पण करण्यात येते.  तर शिरगांवच्या जत्रेच्या वेळी मिलाग्रेस देवीच्या चर्च मधून लईराई देवीला प्रिय असलेली मोगऱ्याची फुले अर्पण केली जातात.

परंपरेनुसार ईस्टर नंतरच्या तिसऱ्या सोमवारी मिलाग्रेसचे फेस्त साजरे केले जाते, तर देवी लईराईची जत्रा वैशाख शुद्ध पंचमीला असते.

हे दोन्ही उत्सव एकाच वेळी येण्याचा योग बऱ्याच वर्षातून कधीतरी जुळून येतो. अशावेळी हिंदू आणि कॅथलिक दोघेही देवीचे आणि सायबिणीचे अत्यंत श्रद्धेने आणि उत्साहाने दर्शन घेतात.

दोन वेगवेगळ्या संस्कृतींचा सुंदर मिलाफ ह्या दोन देवतांच्या रूपाने पाहायला मिळतो.

अशी आहे देवी लईराई आणि तिच्या भावंडांची अद्भुत कथा.

ही कथा परंपरा, श्रद्धा आणि ऐक्य यांचे सुंदर उदाहरण आहे. आजही ही कथा भाविकांच्या मनात तितकीच जिवंत आहे.

कॅटेगरी Goa

error: Content is protected !!