कोकणी भाषेत पोह्यांना फोव म्हटले जाते आणि रोस म्हणजे रस. नारळाचे दूध अथवा रसामध्ये केलेल्या ह्या पोह्यांना म्हणूनच रोसातले फोव म्हणतात.
गोव्यामध्ये दिवाळीला पोह्यांना विशेष महत्व असते. पोह्याशिवाय दिवाळीची कल्पना इथे करताच येत नाही. विविध तऱ्हेने बनवलेल्या पोह्यांनी दिवाळीचे ताट सजलेले असते. पोह्याचे प्रकार तर किती म्हणता? दुधातले फोव, बटाटे पोहे, रोसातले फोव, दह्यातले फोव, त्याच्याशिवाय आंबाड्याची करम असे इतर काही पदार्थ असतात ते वेगळेच. पण मुख्य मान असतो पोह्यांचा. पोहे मात्र लाल हातसडीचेच हवेत.
तर ही नारळाच्या दुधामध्ये, गूळ घालून बनवलेली चविष्ट अशी पोहे घालून केलेली खीरअर्थात रोसातले फोव कसे बनवायचे ते आता आपण पाहू.

साहित्य
- एक नारळ
- पाव कि. गावठी लाल पोहे
- १/२ वाटी गूळ (आवडीनुसार कमी जास्त)
- अर्धा लहान चमचा वेलची पूड
- सुका मेवा (काजूचे तुकडे, बदामाचे काप, बेदाणे इ.)

कृती
- पोहे आधी पाखडून नीट करून घ्यावेत. कारण ह्या पोह्यामध्ये कोंडा आणि भाताची साले असू शकतात.
- नंतर पोहे दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यावेत.
- एका चाळणीमध्ये हे पोहे ओतून थोडा वेळ तसेच ठेवावेत. चाळणीतून निथळून काढलेल्या पोह्यामध्ये थोडा पाण्याचा अंश राहू द्यावा. त्यामुळे जरा जास्त जाड असलेले हे पोहे न सुकता मऊ राहतात.
- नारळ खवून घ्यावा आणि मिक्सरमध्ये साधारण एक ते दीड कप पाणी घालून त्याचे वाटण तयार करावे.
- नंतर एका चाळणीमधून अथवा स्वच्छ कपड्यामधून वाटलेला नारळ पिळून जाडसर रस काढून घ्यावा.
- उरलेल्या चोथ्यामध्ये आणखीन एक कप पाणी घालून पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे आणि ह्याचाही पिळून रस काढावा.
- अशाच प्रकारे आणखीन एकदा निघालेल्या चोथ्यामध्ये एक कप पाणी घालून रस काढून घ्यावा.
- चोथ्यातून दोनदा पिळून काढलेल्या ह्या पातळ रसामध्ये गूळ मिक्स करावा व मंद आंचेवर गूळ विरघळेपर्यंत शिजू द्यावा.
- गूळ विरघळला की त्यामध्ये भिजवलेले पोहे घालावे आणि दहा मिनिटे छान शिजू द्यावे.
- त्यानंतर सुरुवातीला काढलेले जाड दूध ह्या पोह्यांमध्ये हळू हळू मिक्स करावे व पोहे व्यवस्थित ढवळून घ्यावे.
- रसातल्या पोह्यांना शिजून थोडा जाङसरपणा आला की त्यामध्ये वेलची पूड आणि काजू बदामाचे काप घालावे आणि गॅस बंद करावा.
नारळ गुळाच्या चवीने युक्त रुचकर अशा रोसातले फोव म्हणजेच नारळाच्या दुधातील पोह्यांचा आस्वाद घेत दिवाळीचा आनंद लुटावा.