मुगाची उसळ हा गोवन शाकाहारी जेवणातील आणखी एक पारंपरिक पदार्थ. पण हे मूग मात्र मोड काढलेले हवेत. मोड आलेले मूग हे गोवन शाकाहारी जेवणात इतर कडधान्यांच्या तुलनेत जास्त महत्वाचे आहेत. मुगाची उसळ, मुगागाठी, मुगाचे सार असे विविध पदार्थ मोड आलेल्या मुगांपासून बनवले जातात.

मोड आलेल्या मुगाची ही सुकी उसळ विशेष करून दिवाळीला बनवली जाते.

ही उसळ बनवताना मुगागाठी बनवताना जसे मोड काढले जातात त्याच पद्धतीने मोड काढून मुगाची साले काढून घ्यायची.  आणि ह्या साले काढलेल्या शुभ्र पांढऱ्या मुगांची उसळ करायची.

मुगाच्या उसळीसाठी लागणारे साहित्य

मोड काढलेले मूग: एक मोठी वाटी

ओली मिरची: ३ ते ४

ओले खोबरे: एक लहान वाटी.

गूळ: आवडीनुसार

मीठ: चवीप्रमाणे

फोडणीसाठी साहित्य:

गावठी खोबरेल: एक मोठा चमचा

मोहरी: एक चमचा

कढीपत्ता: ८-१० पाने

हिंग: चिमूटभर

हळद: १/४ चमचा

कृती

एका जाड बुडाच्या पातेल्यात अथवा कढईत तेल तापत ठेवावे. तेल गरम झाले की त्यात मोहरी टाकावी. मोहरी तडतडली की ओल्या मिरच्यांचे तुकडे, कढीपत्त्याची पाने, हळद आणि हिंग घालून त्यामध्ये मोड आलेले, साले काढलेले मूग घालावेत. मूग भिजतील इतपत पाणी घालून वर झाकण ठेवून माध्यम आचेवर शिजू द्यावेत. मूग अर्धे शिजले की त्यामध्ये मीठ, गूळ आणि खवलेला नारळ घालून चांगले शिजू द्यावे. उसळी मध्ये पाणी राहणार नाही याची काळजी घ्यावी. वरून कोथिंबीर पेरून गरमागरम वाढावी.

 

ही उसळ चपातीबरोबर खावी. किंवा नाश्त्याला नुसतीच उसळ खाल्ली तरी झक्कास लागते.

कॅटेगरी Goan Food