गोव्याचा पारंपारिक खाद्य पदार्थ, मुगागाठी

गोव्यामध्ये कुठल्याही धार्मिक, पारंपारिक समारंभाच्या जेवणामधील मुख्य पदार्थ म्हणजे मुगागाठी. अर्थात मुगाची पातळसर उसळह्या उसळीचं वैशिष्ट्य हे की मूग हे मोड आलेले, त्यांची सालं काढलेले असले पाहिजेत.

मुगागाठींसाठी लागणारे साहित्य

  • मोड आलेले मूग: एक  वाटी
  • ओल्या खोबऱ्याचा किस: एक वाटी 
  • ओल्या मिरच्या: दोन-तीन 
  • टोमॅटो: एक मोठा 
  • ओल्या नारळाची कातली(काप): एक मोठा चमचा 
  • सुक्या मिरच्या: ५-६  (आपल्या आवडीनुसार कमी जास्त कराव्यात)
  • धणे: एक मोठा चमचा 
  • मिरीचे दाणे: अर्धा छोटा चमचा
  • लवंग: २-३
  • हळद: 1/4 चमचा 
  •  चिंच: लहान लिंबाएवढी
  • बारीक केलेला गूळ: एक मोठा चमचा

फोडणीचे साहित्य 

  • हिंग: पाव छोटा चमचा 
  • मोहरी: एक लहान चमचा 
  • कढीपत्त्याची पाने: आठ दहा 
  • खोबरेल तेल: एक मोठा चमचा 
  • काश्मिरी सुक्या मिरच्या: २-३ 
मुगागाठी

कृती

  • मुगागाठी करायच्या असतील तर सर्व प्रथम मूग दोन दिवस आधी पाण्यात भिजवून ठेवावेत.
  • जर तुम्हाला रविवारी मुगागाठी करायच्या असतील तर शुक्रवारी रात्री मूग भिजवून ठेवावेत. शनिवारी सकाळी हे मूग पाण्यातून उपसून एक चाळणीमध्ये घालून झाकून ठेवावेत अथवा एका पंच्यामध्ये घट्ट बांधून ठेवावेत. रात्रीपर्यंत त्यांना छान मोड (कोंब) येतात.
  • मग हे मोड आलेले मूग रात्रभर पाण्यामध्ये घालून ठेवावेत म्हणजे सकाळपर्यंत त्यांची बऱ्यापैकी साले सुटून वर आलेली असतात.
  • ही सगळी साले काढून टाकावीत. आणखीन एक दोनदा मूग पाण्यातून उपसून जास्तीत जास्त साले काढून टाकावीत. थोडी साले उरलीच तर ती मूग शिजताना उकळी बरोबर वरती येतात त्यावेळी काढून टाकावीत
  • एका पातेल्यात हे साली काढलेले मूग आवश्यक तितके पाणी घालून शिजवावयास ठेवावे. मुगागाठी सोबत मुगाचे सार करणार असाल तर पाणी थोडे जास्त घ्यावे.
  • मूग अर्धे शिजले की त्यामध्ये मोठा चिरलेला टोमॅटो, (तुम्हाला हवे असल्यास यामध्ये बटाट्याचे, सुरणाचे, अथवा बांबूंच्या कोंबाचे (bamboo shoots) तुकडेही घालू शकता). ओल्या मिरचीचे लांब तुकडे टाकावेत. नारळाच्या कातलीचे तुकडे घालावेत आणि मूग आणखीन थोडे शिजू द्यावेत.
  • ओल्या नारळाच्या किसामध्ये सुक्या मिरच्या, धणे, मिरी, लवंग, हळद, चिंच, घालून मिक्सरमधून बारीक बाटून घ्यावे.
  • शिजत आलेल्या मूगांमध्ये हे वाटण  घालावे, चवीप्रमाणे मीठ घालावे, गूळ घालावा  आणि छान शिजवून घ्यावे.
  • मूग शिजले की फोडणीच्या वाटीत खोबरेल तेल घालून त्यात एक चमचा मोहरी घालावी. मोहरी तडतडली की दोन तीन सुक्या मिरच्यांचे तुकडे, कडीपत्ता आणि हिंग घालून शिजलेल्या मुगांवरती फोडणी टाकावी.

ह्या मुगागाठी तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता, भातासोबत तोंडीलावणे म्हणून खाऊ शकता किंवा नुसत्याच बाऊलमध्ये घेऊन खाऊ शकता.

कॅटेगरी Goan Food

error: Content is protected !!