
सहा वर्षांनंतर वेर्ण्यातील महालसा मंदिराला पुन्हा भेट
एका लग्नाच्या निमित्ताने पाच-सहा वर्षानंतर वेर्ण्याच्या महालसा मंदिराला भेट देण्याचा योग आला. सहा वर्षांपूर्वी पाहिले त्याहून महालसा मंदिरआणि मंदिर परिसर अधिक सुंदर दिसत होते. मंदिराच्या आवारातील महालसा नारायणी विद्यालयही आता बांधून पूर्ण झालेले आहे. मंदिराच्या वास्तूला साजेशी ह्या विद्यामंदिराची इमारत संपूर्ण मंदिर प्रांगणाच्या सौंदर्यात भर घालते.

निसर्ग, दिव्यता आणि शांततेचा संगम असलेले मंदिर
भव्य मंदिर, मंदिराचे अद्भुत वास्तुशिल्प, मंदिराच्या एका बाजूला मंदिराचा हॉल, दुसऱ्या बाजूला ऑफिस, खोल्या, समोरच्या बाजूला असणारी महालसा विद्यालयाची इमारत आणि मंदिराच्या विस्तृत आवारातील वड, पिंपळ, औदुंबर, आपटा अशी पवित्र झाडे, झाडांवर बागडणाऱ्या खारी, पक्षी आणि मंदिराची तळी. हे सारे कितीही पाहत राहिले अनुभवले तरी मन भरत नाही.

मंदिराची पौराणिक उत्पत्ती
महालसा नारायणी देवीचे वेर्ण्याचे हे मंदिर, एक प्राचीन मंदिरआहे. पोर्तुगीज राजवटीच्या आगमनापूर्वीच सासष्टी तालुक्यातील वेर्ण्याच्या हिरवळीने नटलेल्या पठारावर महालसा मंदिर अभिमानाने उभे होते. पुराणकाळात वेर्णा वरेण्यपूर अथवा वरुणपूर या नावाने ओळखले जात असे. ह्या मंदिराची स्थापना नेमकी कधी झाली याचा मात्र ठोस पुरावा उपलब्ध नाही. मात्र ह्या स्थळाचा उल्लेख सर्वात प्राचीन असलेल्या स्कंद पुराणात आढळतो. स्कंद पुराण इसवी सनाच्या सातव्या ते नवव्या शतकात लिहिले गेले असे मानले जाते. म्हणजे ह्या मंदिराची स्थापना सातव्या किंवा नवव्या शतकात किंवा त्यापूर्वी झालेली असावी.


स्कंद पुराणातील महालसा देवीची कथा
स्कंद पुराणातील सह्याद्री खंडात, “वरुणपूर माहात्म्य”नावाचे दोन अध्याय आहेत, ज्यामध्ये वरुणपूरातील श्री महालसा देवीची दैवी कथा सांगितली आहे. या कथेनुसार, वरुणपूर हे एक समृद्ध, सुंदर आणि मौल्यवान रत्नांनी भरलेले ठिकाण होते. तेथील लोकांनी एकदा ज्योतिष्टोम यज्ञ करून देवतांची कृपा मिळवण्यासाठी प्रार्थना केली. त्या यज्ञादरम्यान भगवान परशुराम तेथे प्रकट झाले आणि त्यांचे दर्शन घडल्याने भक्त आनंदित झाले. त्यानंतर परशुरामांनी वरुणाला त्या ठिकाणी एक सुंदर मंदिर बांधण्याचा आदेश दिला. त्यांच्या आदेशाप्रमाणे तिथे एक भव्य मंदिर उभारण्यात आले— वरुणपूरातील श्री महालसा देवी मंदिराच्या उत्पत्तीची साक्ष ह्या कथेतून आपल्याला मिळते.


पोर्तुगीज काळातील विध्वंस आणि मूर्तीचे म्हार्दोळ येथे स्थलांतर
पोर्तुगीज राजवटीत अनेक हिंदू देवदेवतांची मंदिरे नष्ट करण्यात आली त्यामध्ये महालसा देवीचे हे मंदिरही उध्वस्त करण्यात आले. अनेक वर्षे देवीच्या मूळ मंदिराचा केवळ पायाभूत भाग आणि अवशेष उरले होते. देवीची मूर्ती मात्र म्हार्दोळ येथे सुरक्षित हलवण्यात आली आणि तेथील नवीन मंदिरामध्ये तिची प्रतिष्ठापना करण्यात आली.
आधुनिक काळातील मंदिराचा पुनरुज्जीवन प्रवास
पुढे बऱ्याच वर्षानंतर म्हणजे १९७५ च्या सुमारास मंदिराच्या मूळ स्थळी नव्याने बांधकाम सुरु झाले. ह्या पुनर्बांधणीचा शुभारंभ श्रींगेरी शारदा पीठाचे ३५ वे श्री अभिनव विद्यातीर्थ महास्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांनीच या पवित्र स्थळी मंदिराचा पाया रचला. परंतु या घटनेनंतर मंदिराच्या पुनर्बांधणीच्या कार्याने वेग घेतला नाही. पुढे काही दशकानंतर मंदिर उभे करण्याचे कार्य पुन्हा सुरु झाले.
या नव्याने उभारलेल्या मंदिराच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा २००५ मध्ये गाठला गेला, जेव्हा श्री भारती तीर्थ महास्वामीजी (३६वे शंकराचार्य) यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा कुंभाभिषेक सोहळा पार पडला. यानंतर, २०१४ मध्ये त्यांनीच मंदिर संकुलातील ध्यान मंडपाचे उद्घाटन केले. या नव्या ध्यान मंडपामुळे भक्तांसाठी ध्यानधारणा आणि साधनेसाठी एक शांत, आध्यात्मिक जागा निर्माण झाली.

पारंपरिक आणि आधुनिक स्थापत्यशैलीचा अनोखा संगम
वेर्णा येथील श्री महालसा नारायणी मंदिराची वास्तूशैली ही पारंपरिक गोमंतकीय मंदिर स्थापत्यशैली (Goan Temple Architecture) आणि आधुनिक पुनर्बांधणीचे एक सुंदर मिश्रण आहे. कोंकणी-हिंदू स्थापत्यशैलीने उभारलेल्या ह्या मंदिराचा मुख्य ढाचा जरी गोव्यातील इतर मंदिरासारखा असला तरी मंदिराला बाहेरून दिलेला वैशिष्ट्यपूर्ण आधुनिक स्पर्श मंदिराला विशेष सौंदर्य प्राप्त करून देतो. मंदिराच्या वास्तूमध्ये पारंपरिक दीपस्तंभ, सभामंडप, मुख्य गर्भगृह, आणि अर्धमंडप यांचा समावेश आहे.
संपूर्ण मंदिर परिसराला हिरवळ, पायवाटा, पारंपरिक कमानी आणि खोल्यांची रचना हे सारे भक्तांना अध्यात्माशी जोडणारे आणि शांततेचा अनुभव देणारे ठरते. मंदिराच्या आतील भिंती आणि सभामंडप नाजूक कोरीवकाम, रंगीबेरंगी मूर्ती व पारंपरिक अलंकरणाने सजलेले आहेत. मंदिरामध्ये मुख्य महालसा मातेच्या गर्भगृहाच्या दोन्ही बाजूला गणपती, शांतेरी, नागदेवता आणि महालक्ष्मी यांची मंदिरे आहेत. बाहेर सभामंडपातून अंतराळामध्ये प्रवेश करताना, प्रवेशाच्या दोन्ही बाजूला सुद्धा शारदाम्बा आणि शंकराचार्य यांची छोटी मंदिरे आहेत. भव्य सभामंडप, सभामंडपाचे उंच घुमटाकार छत, सभामंडपाच्या चारीबाजूंच्या भिंतीवरील विविध देव देवतांच्या मुर्त्या हे सर्वच फार सुंदर आहे. येथे ध्यानधारणा आणि व्यक्तिगत साधनेसाठी शांत आणि प्राचीन वास्तूशैलीशी सुसंगत वातावरण राखले गेले आहे.

चालू विकास प्रकल्प आणि सरकारी पाठबळ
मंदिर आता नियमित धार्मिक विधी, पूजापाठ, उत्सव इत्यादींसाठी कार्यरत असून, सौंदर्यीकरण व विकासकार्य अजूनही सुरू आहे. डिसेंबर २०२२ मध्ये, गोवा सरकारच्या पुरातत्त्व आणि संग्रहालय खात्याने श्री महालसा नारायणी ट्रस्टसोबत एक करार (MoU) केला. या करारामुळे मंदिराच्या सुमारे ७५,००० चौरस मीटर क्षेत्रफळावर ट्रस्टकडून अधिक विकास व संवर्धन शक्य झाले आहे.
गोव्याच्या वारशाचे एक जिवंत प्रतीक
वेर्णा येथील हे श्री महालसा देवीचे मंदिर गोव्याच्या सांस्कृतिक, पौराणिक, धार्मिक आणि ऐतिहासिक वारशाचे जिवंत प्रतीक आहे. जरी आज म्हार्दोळ येथील महालसा नारायणी मंदिर अधिक प्रसिद्ध असले, तरी वेर्णा येथील मंदिर हा देवीच्या उपासनेचा एक पुरातन आणि महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे.. येथे देवीच्या मूळ मंदिराचा उगम असल्याने, हे स्थान एक ऐतिहासिक तीर्थक्षेत्र मानले जाते. ही जागा श्रद्धाळूंना आणि पर्यटकांना एक पवित्र, शांत आणि इतिहासाशी जोडलेली अनुभूती देते.
