उड्डमेथी ही अत्यंत प्रसिद्ध आणि रुचकर गोमंतकीय पाककृती आहे. कालवणाचा हा गोमंतकीय प्रकार, शाकाहारी आणि मत्स्याहारीसुद्धा आहे. शाकाहारामध्ये आमलीची उड्डमेथी तसेच आंबाडे व बिमलें ह्या आंबट फळांचीही उड्डमेथी बनवली जाते. तर माशाच्या पाककृतींमध्ये बांगड्याची उड्डमेथी अत्यंत रुचकर लागते.

आज आपण बांगड्याची उड्डमेथी कशी करायची ते पाहूया. करायला सोपी आणि अत्यंत चविष्ट अशी ही उड्डमेथी तुम्हाला नक्कीच आवडेल.

बांगड्याची उड्डमेथी
उड्डमेथीसाठी लागणारे साहित्य
  • बांगडे: २ मध्यम आकाराचे
  • ओले खोबरे: दोन वाट्या किंवा मध्यम नारळाचे एक वळे 
  • कांदा: एक मोठा
  • सुक्या मिरच्या: ४ ते ५
  • तांदूळ: एक चमचा
  • उडीद डाळ: एक चमचा
  • मेथी दाणे: १/४ चमचा
  • धणे: एक चमचा
  • मिरी: १/२ चमचा 
  • लवंग: २-३
  • हळद: पाऊण चमचा
  • तेल: एक मोठा चमचा (शक्यतो खायचे खोबरेल तेल)
  • चिंच: लहान आवळ्याएवढी
  • मीठ: चवीपुरते
masala for bangda uddamethi
पूर्व तयारी:

. बांगड्याचे खवले काढून ते स्वच्छ धुवून घ्यावे. एका बांगड्याचे तीन किंवा चार तुकडे करावे.

२.स्वच्छ धुवून चिरलेल्या माशांच्या तुकड्यांना १/२ चमचा हळद, मीठ व हवे असल्यास थोडे लाल तिखट लावून ठेवावे.

३.अर्धा कांदा उभा चिरून घ्यावा. उरलेला अर्धा कांदा बारीक चिरून ठेवावा. नारळाचे एक वळे किसून घ्यावे.

४.एक कढई गरम करून आधी एक चमचा उडीद डाळ, तांदूळ आणि मेथीचे दाणे हलके तांबूस भाजून घ्यावे.

.थोड्याशा तेलामध्ये धणे, मिरी, लवंग आणि सुक्या मिरच्या व्यवस्थित भाजून घ्याव्यात.

६. धणे, मिरी, सुक्या मिरच्या भाजल्या की त्या बाजूला काढून त्याच तेलामध्ये उभा चिरलेला कांदा बदामी रंगावर भाजून घ्यावा.

७. कांदा भाजल्यानंतर किसलेले खोबरे हलकेसे तांबूस भाजून घ्यावे.

मुख्य कृती:

१. भाजलेला हा सर्व मसाला चिंच आणि १/४ चमचा हळद घालून बारीक वाटून घ्यावा.

२. गॅस वर पातेले गरम करत ठेवावे. त्यामध्ये एक चमचा तेल घालावे.

३. तेल तापले की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून हलका तांबूस होऊ द्यावा.

४. कांद्याचा रंग बदलला व तो थोडा शिजल्यासारखा वाटला की त्यामध्ये वाटून बारीक केलेला मसाला घालावा.

५. मसाला चांगला हलवून त्यामध्ये दीड ते दोन वाट्या पाणी घालावे.

६. वाटणाला चांगली उकळी आली की त्यामध्ये बांगड्याचे तुकडे टाकावे आणि शिजू द्यावे.

७. तीन-चार मिनिटात मासे शिजले की त्यामध्ये मीठ घालावे. एक उकळी आली की गॅस बंद करावा.

Bangdyachi uddamethi
काही सूचना:
  • बांगडे घातल्यानंतर परत परत हलवू नये. त्यामुळे मासे मोडण्याची शक्यता असते.
  • मासे जास्त शिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. जास्त शिजले तर काटे बाहेर येतात.
  • वाटणामध्ये उडीद डाळ आणि तांदूळ भाजून घातलेले असल्याने थंड झाल्यानंतर उड्डमेथी आळून जाड होते. त्यामुळे शिजताना पाणी थोडे जास्तच घालावे.
बांगड्याची उड्डमेथी

वाफाळलेला उकडीच्या तांदळाचा भात, गरम गरम उड्डमेथी आणि मस्त चुरचुरीत तळलेले बांगडे इतकेच जेवण मस्त फर्मास लागते. भाताऐवजी गोवन पाव किंवा चपाती उड्डमेथीला लावून खाल्ली तरी मस्त लागते.

कॅटेगरी Goan Food

error: Content is protected !!