वैशिष्ट्यपूर्ण धार्मिक परंपरेसाठी प्रसिद्ध धार्मिक स्थळ

गोवा म्हटले की बहुतांश लोकांच्या मनात समुद्रकिनारे आणि पर्यटनाची गजबज येते. मात्र या सगळ्यापलीकडे गोव्याची एक शांत, श्रद्धेने युक्त आणि परंपरांनी समृद्ध अशी वेगळी ओळखही आहे.

उत्तर गोव्यातील शिरगाव येथे वसलेले लईराई मंदिर हे असेच एक पवित्र स्थळ आहे. लईराई  देवीची विशिष्ट पद्धतीने केलेली प्रतिष्ठापना व अद्भुत अशी लईराईची जत्रा यामुळे हे मंदिर गोव्यात अत्यंत प्रसिद्ध आहे.

ज्यांना शांत, श्रद्धेने परिपूर्ण अशा मंदिरांचा आणि गोमंतकीय प्रथा-परंपरांचा अनुभव घ्यायचा असेल त्यांच्यासाठी हे ठिकाण एकदम योग्य आहे. 

लईराई मंदिराचे स्थान आणि पोहोचण्याचा मार्ग

हे मंदिर डिचोली तालुक्यातील शिरगाव या गावी आहे.

म्हापशाहून थिवी, अस्नोडा मार्गे शिरगावला जायचे आहे. अस्नोड्यामध्ये पोचले की उजव्याबाजूचे एक वळण शिरगावच्या दिशेने जाते. इथून पुढे रस्ता काहीसा अरुंद आहे. पुढे एक छोटाच पूल लागतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूचा सुंदर हिरवा निसर्ग पाहात आपण शिरगावला पोचतो.

मंदिराच्या दिशेने जाणारा रस्ता जिथे संपतो तिथेच मंदिर आहे. लांबून जरी तो रस्ता मंदिराकडे संपला असे वाटत असले तरी तो रस्ता तिथून उजव्या बाजूला गावामध्ये जातो.

लईराई मंदिराचे वैशिष्ट्य: मूर्तीऐवजी पवित्र कलश

इतर देवळांहून ह्या मंदिराचे वेगळेपण म्हणजे गर्भगृहामध्ये मूर्तीऐवजी इथे कलशाची केलेली स्थापना!

देवी लईराईची पूजा ही एका उपड्या ठेवलेल्या तांब्याच्या कलशाच्या स्वरूपामध्ये केली जाते. कलश पवित्र वस्त्र वगैरे ठेवून त्यावर मुकुट ठेवून फुलांनी अलंकारीत केलेला असतो. देवीचे अत्यंत प्रसिद्ध असे मनमोहक चित्र – हिरवी नऊवारी साडी, डावा पाय मांडी घातल्याप्रमाणे वळवलेला आणि उजवा पाय उंच पोटाशी दुमडलेला, त्या पायावर उजव्या हाताचे कोपर टेकवून तळवा छातीशी धरलेला- हे आपल्याला गर्भगृहात पाहायला मिळत नाही. हे देवीचे स्वरूप एका भक्ताला स्वप्नामध्ये दिसले होते.

ह्या वेगळेपणामुळे आणि लईराई देवी जागृत असल्याच्या विश्वासामुळे हे मंदिर केवळ भाविकांनाच नाही तर काही धार्मिक वृत्तीच्या पर्यटकांनाही आकर्षित करते.

देवी लईराई, शिरगांव
लईराईची जत्रा: अग्निदिव्याचा थरारक सोहळा

लईराईची जत्रा गोव्यामध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे. ह्या जत्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे अग्निदिव्याचा थरारक सोहळा.

ह्या अग्निदिव्यासाठी भल्या पहाटे साधारण तीन ते चारच्या दरम्यान प्रचंड अग्नी पेटवला जातो. अनेक धोंड म्हणजे देवीचे भाविक ह्या अग्नीच्या पेटत्या निखाऱ्यावरून चालत जातात. हे धोंड असे दिव्य का करतात त्यापाठी लईराई आणि तिच्या भावंडाची अद्भुत कथा आहे.

अग्निदिव्याचा हा विधी केवळ धाडसाचा नसून, भक्तांच्या देवीवरील नितांत श्रद्धेचे ते प्रतीक आहे.

ह्या विधीमध्ये सहभागी होणाऱ्या सगळ्या धोंडांना अग्निदिव्यापूर्वी जवळपास महिनाभर कठोर व्रताचे पालन करावे लागते. ह्या अवधीमध्ये ते घरापासून लांब राहतात, ह्याकाळात संपूर्ण शाकाहार घेतात. कठोर नियमांचे पालन करतात.

lairai temple shirgaon
मंदिराची रचना आणि साधेपणा

लईराई मंदिराची रचना गोमंतकीय मंदिरांप्रमाणेच आहे. पूर्वी छोटेच असलेले हे देऊळ साधारण चाळीस एक वर्षांपूर्वी वाढवून मोठे बांधवले गेले.

मंदिर अतिशय साधे आहे, सोन्या चांदीचे अथवा लाकडी कोरीवकाम इथे पाहायला मिळत नाही. फक्त गर्भगृहातील देवीची प्रभावळ हल्लीच सोन्याची केलेली आहे. ह्या साधेपणाचा मंदिराच्या भव्यतेत काडीमात्रही फरक पडत नाही.

मंदिराचा बाहेरील सभामंडप अतिशय भव्य आहे. जत्रेच्या वेळी ह्या सभामंडपामध्ये हजारो धोंड हातामध्ये रंगीबेरंगी फिती बांधलेला दंड घेऊन नाचतात. अर्धमंडप आणि महामंडपही तुलनेने मोठे आहेत.

गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराच्या वरच्या भिंतीवर विष्णू आणि विष्णूच्या दोन्ही बाजूला ऋषींची चित्रे आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूच्या भिंतीवर चतुर्भुज विष्णू आणि गणपतीची चित्रे आहेत. तर बाहेरील चौकटीच्या वरच्या बाजूला दोन हत्तींच्या मध्ये लक्ष्मी आहे व चौकटीच्या दोन्ही बाजूस जय-विजय आहेत. त्याशिवाय. चौकातील सज्जाच्या भिंतीवर विविध देवतांच्या मुर्त्या आहेत.

लईराईला मोगऱ्याची फुले अत्यंत प्रिय असल्याचे मानले जाते.लईराईच्या प्रसिद्ध जत्रेदरम्यान सर्व भाविक लईराईला मोगरीचे कळे अर्पण करतात. याच कळ्यांमधील एक कळी गाभाऱ्यातील कलशामध्ये ठेवली जाते. ही कळी संपूर्ण वर्षभर म्हणजे पुढच्या जत्रेपर्यंत त्या कलशामध्ये असते आणि ती वर्षभर ताजीतवानी असते.

मंदिराला भेट देण्यासाठीचा योग्य काळ

लईराई मंदिराला वर्षभरात कधीही भेट देता येते.

देवीची अभूतपूर्व जत्रा पाहायची असल्यास जत्रेच्या काळात म्हणजे वैशाख शु. पंचमीला (एप्रिल किंवा मे)मध्ये भेट द्यावी. मात्र यावेळी मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी होते आणि वातावरण अत्यंत उत्साही असते. गर्दी ऐवजी मंदिराचा शांत अनुभव घ्यायचा असल्यास पावसानंतरचा काळ अधिक योग्य ठरतो. या काळात परिसर हिरवागार आणि प्रसन्न दिसतो.

प्रवाशांसाठी उपयुक्त सूचना

मंदिराला भेट देताना साधे आणि शालीन कपडे परिधान केल्यास मंदिराचे पावित्र्य बिघडणार नाही.

उन्हाळ्यामध्ये उष्णता आणि गर्दी टाळण्यासाठी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी भेट देणे अधिक सोयीचे ठरते.

जत्रेच्या काळात जाण्याचा विचार करत असल्यास वेळेआधी पोहोचणे आवश्यक आहे, कारण गर्दीचा आवाका मोठा असतो.

स्थानिक परंपरा आणि नियमांचा आदर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. गावामध्ये चिकन मटण खाण्यावर निर्बंध आहेत, जे देवीवरील श्रद्धेमुळे पाळले जातात.

तसेच पाणी आणि आवश्यक वस्तू सोबत ठेवाव्यात, कारण गावात सुविधा मर्यादित असू शकतात.

जवळची पाहण्यासारखी ठिकाणे

शिरगावच्या भेटीबरोबरच आसपासची काही सुंदर ठिकाणेही पाहता येतात.

त्यापैकी मये तलाव हे एक निसर्गरम्य ठिकाण असून इथे नौकाविहार, बंजी जम्पिंग करता येते.

तसेच सप्तकोटेश्वर मंदिर हे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे मंदिरही अवश्य पाहण्यासारखे आहे.

गोव्याचा खरा आणि वेगळा चेहरा ज्यांना अनुभवायचा असेल त्यांनी लईराई मंदिराला जरूर भेट द्यावी.

.

कॅटेगरी Goan Temples

error: Content is protected !!