शिंपले, ज्यांना गोव्यामध्ये तिसरे म्हणतात. ह्या शिंपले अर्थात तिसऱ्याचे वेगवेगळे पदार्थ गोव्यामध्ये केले जातात. ह्या तिसऱ्यांची चव लाजवाब असते. आपल्या विशेष चवीने गोमंतकीय मत्स्यस्वादामध्ये तिसऱ्याचे एक विशेष स्थान निर्माण झालेले आहे. तिसऱ्याचे सुके, तिसऱ्याचे दबदबीत, तिसऱ्याचे डांगर असे  सर्वच पदार्थ रुचकर लागतात.

तिसरे, समुद्री आणि गोड्या पाण्यातही मिळतात. समुद्री पाण्यात मिळणाऱ्या तिसऱ्याची चव ही गोड्या पाण्यातील तिसऱ्यांपेक्षा अधिक रुचकर असते.

तिसऱ्याचे सुके करण्याची पद्धत अतिशय सोपी मात्र पदार्थ चवीला अत्यंत चविष्ट असतो.

तिसऱ्याचे सुके कसे करायचे ते आपण आता पाहू.

तिसऱ्याचे सुके करण्यासाठी लागणारे साहित्य
  • तिसरे: दोन वाट्या
  • किसलेले ओले खोबरे: २ वाट्या
  • कांदा: एक 
  • ओली मिरची: दोन
  • लाल तिखट: एक लहान चमचा
  • हळद: पाव लहान चमचा
  • गरम मसाला: अर्धा लहान चमचा
  • आमसुले: २ ते ३
  • खोबरेल: दोन मोठे चमचे  
  • मीठ: चवीपुरते
तिसऱ्याचे सुके बनवण्याची कृती 
  1. तिसरे विळीवरती मधून अशा तऱ्हेने उघडावे की त्याच्या एका बाजूला शिंपला राहील. दुसरी रिकामी बाजू टाकून द्यावी.
  2. शिंपले पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत ठेवावेत, आणि नंतर दोन तीनदा धुवून घ्यावेत. त्यामुळे शिंपल्यामध्ये असेलेली वाळू पूर्णपणे निघून जाईल.
  3. कांदा, ओली मिरची बारीक चिरून घ्यावी.
  4. एका पॅनमध्ये दोन चमचे तेल घालावे. तेल तापले की त्यामध्ये मिरचीचे बारीक तुकडे, कोथिंबीरीचे देठ असतील तर बारीक चिरलेले कोथिंबीरीचे देठ घालून परतून घ्यावे.
  5. मिरची परतली की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालावा. कांदा चांगला परतून घ्यावा आणि मंद आंचेवर दोन तीन मिनिटे शिजू द्यावा.
  6. परतलेल्या कांद्यामध्ये लाल मिरची पूड, हळद, गरम मसाला, आणि मीठ घालून सगळे एकजीव करावे.
  7. मीठ मसाला घातलेल्या कांद्यामध्ये आता किसलेले ओले खोबरे घालावे. दोन तीन आमसुलेही टाकावीत. त्यामध्ये एक वाटी अथवा खोबरे भिजेल इतके पाणी घालून पॅनवर झाकण ठेवावे. गॅसची आंच मध्यम ठेवावी.
  8. दोन चार मिनिटानंतर त्यामध्ये स्वच्छ धुतलेले तिसरे घालावे. आवश्यक वाटल्यास आणखी थोडे पाणी घालावे. आणि पॅन बंद करून दहा मिनिटे अथवा तिसरे चांगले मऊ होई पर्यंत शिजू द्यावे.
  9. दहा मिनिटानंतर तिसरे शिजले का पाहावे, शिजले असल्यास जर त्यामध्ये पाणी राहिलेले असेल मध्यम आंचेवर पाणी आटेपर्यंत पॅनवर झाकण न ठेवता शिजू द्यावे.
  10. सगळे पाणी आटले की गॅस बंद करावा.

हा अस्सल गोमंतकीय चवीचा समुद्री मेवा पारंपरिक गोवन शीत-हुमण म्हणजेच वाफाळलेल्या भात आणि माशाच्या कालवणासोबत तोंडी लावण्यासाठी वाढा आणि प्रत्येक घासाबरोबर खऱ्या गोमंतकीय चवीचा आनंद घ्या.

कॅटेगरी Goan Food

error: Content is protected !!