हिरव्यागार निसर्गाच्या सान्निध्यात लपलेले कमळेश्वर मंदिर
गोमंतक भूमी ही मंदिरांची भूमी. छोटी आणि मोठी अशी हजारो मंदिरे येथे आहेत. अशाच एका दाट निसर्गामध्ये लपलेल्या मंदिराबद्दल हल्लीच कळले होते. तेव्हाच हे मंदिर पाहायला जाण्याचा निश्चय केला होता. फोंड्यातील ढवळी येथे, वरची ढवळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागामध्ये, डोंगराच्या छोटाशा कपारीत लपलेले हे मंदिर म्हणजे कमळेश्वर मंदिर! छोटेसेच असे हे भगवान शिवाचे मंदिर खूप पवित्र आहे.
मंदिर शोधण्याचा प्रवास
जेव्हा आम्ही हे मंदिर पाहायला निघालो तेव्हा हे मंदिर ढवळीमध्ये आहे इतकेच आम्हाला माहित होते. मंदिर नक्की कुठे आहे? तिथे कसे पोचायचे? याची काहीच माहिती नसल्याने गुगल मॅपचा सहारा घेत आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो.
दोन्ही बाजूला दाट वृक्षराजी असलेल्या आणि अरुंद वेडी वाकडी वळणे असलेल्या रस्त्याने आम्ही चाललो होतो. निसर्ग खरोखरच मन मोहून टाकणारा होता. गावातील घरे आणि निसर्ग पाहात आम्ही अशा ठिकाणी पोचलो जिथे रस्ता संपला होता, समोर टेकडी सारखा उंचवटा होता. रस्ता चुकलो की काय असे मनात आले इतक्यात रस्त्याच्या डाव्या उतारावर एक व्यक्ती दिसली. तिच्याकडे चौकशी केली आणि समोर दिसणाऱ्या पायऱ्या उतरून आम्ही मंदिरात पोचलो.
मंदिराची पहिली झलक
नीट नेटक्या बांधलेल्या पंचवीस तीस पायऱ्या उतरून जाताच समोर मंदिर दिसते. एखादे जुने घर असावे असे हे छोटेसे कौलारू मंदिर अतिशय शांत वाटले. पाऊस पडत होता. त्यामुळे मंदिर आणि आजूबाजूचा निसर्ग पावसात न्हावून आणखीन प्रसन्न दिसत होते.
शांत गाभारा आणि आकर्षक मूर्ती
मंदिरामध्ये गाभाऱ्यातील दिव्याचा मंद प्रकाश तेवत होता. त्या मंद प्रकाशात समोरील महादेवाची मूर्ती फारच आकर्षक दिसत होती. गाभाऱ्याबाहेर असणारा नंदी सुद्धा एका पिंडीवर विराजमान होता.
कमळेश्वर मंदिराचा आजूबाजूचा परिसरही अतिशय शांत प्रसन्न आहे. एका बाजूला डोंगर, दुसऱ्या बाजूला कुळागर, डोंगरावरची घनदाट वनराई, मंदिराच्या बाजूच्या भिंतींवर कोरलेली शिव, गणपती यांची चित्रे. मंदिराच्या समोरच पायऱ्या उतरताच एका नंदीच्या मुखातून खाली कोसळणारे झरीचे पाणी असं सारं दृश्य विलोभनीय होतं.
अध्यात्मिक साधकांसाठी एक परिपूर्ण स्थळ
अध्यात्मिक वृत्तीच्या माणसासाठी हे मंदिर म्हणजे एक परिपूर्ण स्थळ आहे. लोकांची वर्दळ नाही, बाहेर निसर्ग देवता आणि मंदिरातील मंद प्रकाशातील महादेव यांच्या सानिध्यात ध्यान करत बसण्याचा संपूर्ण अध्यात्मिक आनंद मिळवण्यासाठी ह्या मंदिरासारखे दुसरे ठिकाण नाही.