दक्षिण गोव्यामधील धारबांदोडा तालुक्यातील किर्लपाल दाभाळ येथील निसर्ग (nature) आणि साहस (adventure) यांचं एक अनोखं मिश्रण असलेले इको फार्म, एन् व्ही इको फार्म! सुट्टीचे क्षण आनंदात घालवण्यासाठीचे हे एक उत्तम ठिकाण आहे.
आधुनिक कृषी विज्ञानाला पारंपरिक ज्ञानाची जोड देऊन उभे केलेले हे इको फार्म गोव्याच्या मध्यभागी वसलेले आहे.
एकूण ६० एकर एरिया असलेल्या ह्या फार्ममध्ये; फलोत्पादन, मसाल्याच्या वनस्पती आणि भाज्यांची शेती पाहायला मिळते. विविध प्रकारचे अनेक वृक्ष; ज्यामध्ये नारळ, काजू, सुपारी, निरफणस इ. वृक्षांबरोबर, मुख्य आकर्षण असणारा २०० वर्षे जुना वटवृक्ष पाहण्यासारखा आहे.
अशा सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात पर्यटकांना इथे रोमांचकारी साहसी खेळ आणि मनमुराद पोहण्याचा आनंदही घेता येतो. पक्षी प्रेमींसाठी, पक्षी निरीक्षण; पदभ्रमंतीची आवड असणाऱ्यांसाठी सकाळचे ट्रेकिंग असे उपक्रमही इथे राबवले जातात. नक्षत्र वन आणि फुलपाखरांचे उद्यान ही इथली आणखीन विशेष आकर्षणे आहेत.
संकल्पना आणि सुरुवात
कृषी आणि साहस यांना एकत्रित करून हा इको फार्म निर्माण करण्याची कल्पना सौ स्मिता पाटील यांची आहे. त्यांना ह्या कल्पनेसाठी त्यांच्या कुटुंबीयांचा संपूर्ण पाठिंबा मिळाला. त्यांचे सासरे श्री. कृष्णा जगन्नाथ पाटील आणि श्री. विनायक जगन्नाथ पाटील, ह्या प्रगतीशील शेतकऱ्यांनी 60 वर्षांपूर्वी पश्चिम घाटाच्या शिखरावर असलेली ही जमीन आधुनिक शेतीमध्ये विकसित केली. शेती विकसित करताना त्यांनी जैवविविधता राखली आणि कृषी लागवडीसोबत स्थानिक प्रजातींचे पालनपोषण केले.त्यांच्या ह्या कष्टाची फलनिष्पत्ती आज आपल्याला ह्या फार्मचे दर्शन घेताना दिसून येते. फाटकापाशी जवळजवळ २०० वर्षे जुना वड आपल्या स्वागताला उभा आहेच पण त्याबरोबर जवळ जवळ १२५ तऱ्हेच्या विविध वनस्पतींच्या प्रजाती इथे आपल्याला पाहायला मिळतात.
आपल्या कुटुंबियांच्या प्रगतिशील दृष्टिकोनाने प्रभावित झालेल्या सौ. स्मिता पाटील यांनी ह्या संपूर्ण फार्मला एका इको फार्म मध्ये विकसित करण्याचे ठरवले. परंतु हे फार्म केवळ कृषी पद्धतीच्या प्रदर्शनापुरते मर्यादित न राहता, एक निसर्ग शिक्षण आणि संवर्धन केंद्र म्हणूनही काम करेल याचीही त्यांनी काळजी घेतली; त्यामुळे आधुनिक कृषी पद्धत शिकण्यास उत्सुक स्थानिक तरुणांना ते शिकण्याची इथे संधी मिळावी जेणेकरून रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासही वाव मिळेल.
अशा प्रकारे कुटुंबातील सदस्य, मित्र आणि तज्ञ यांच्याशी सल्लामसलत करून शेती आणि पर्यटनाची संकल्पना विकसित झाली. ज्यामध्ये विद्यमान संसाधने ओळखणे, विकसित करणे आणि त्याचा विवेकपूर्ण वापर करणे ही योजना होती. हे करताना पारंपरिक पद्धत जपून त्यामध्ये आधुनिक तंत्रे समाविष्ट केली गेली; जी उत्पादनक्षमता वाढवणारी असेल आणि कमी संसाधने वापरून पर्यावरणाचे नुकसानही करणार नाही याचा विचार केला गेला.


स्पाईस फार्म आणि कृषी दौरा
एन् व्ही इको फार्म मधील स्पाईस फार्म आणि कृषी दौरा अत्यंत लक्षणीय असा आहे.
फुलपाखरांचे उद्यान
फुलपाखरांना आकर्षित करणारी विविध प्रकारची झाडे ( host Plants) इथे रोवली गेली आहेत. जिथे असंख्य फुलपाखरे आकर्षित होऊन उडत असतात. इतक्या असंख्य फुलपाखरांमधून फिरताना, आणि एखाद्या झाडावर त्या झाडाला लागलेली रंगीबेरंगी फुलेच असावीत असे वाटणाऱ्या फुलपाखरांना पाहतानाचा आनंद अवर्णनीय आहे.
गणपती पत्री गार्डन
गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या एकवीस तऱ्हेच्या पत्री इथे एकत्रितपणे पाहायला मिळतात.
नक्षत्र वन
सर्व बारा राशी, प्रत्येक राशीची वैयक्तिक नक्षत्रे; यांची विशिष्ट झाडे वर्तुळाकार आकारात लावलेली आहेत. त्या प्रत्येक राशीचा देव, राशीसाठी असणारे पवित्र झाड, त्या झाडाचे वैज्ञानिक नाव; त्याचप्रमाणे प्रत्येक राशीच्या अधिपत्याखाली येणाऱ्या नक्षत्रांवर अधिकार गाजवणारी देवता, त्या देवतेचा मंत्र, त्या नक्षत्रासाठीचे पवित्र झाड आणि त्या झाडाचे वैज्ञानिक नाव ही सर्व माहिती प्रत्येक झाडाजवळ एक फलकावर लिहून ठेवली आहे.
२०० वर्षे जुना विस्तारलेला वड छान दृष्टी सुख देऊन जातो. ह्या वडाच्या फांद्यांना बांधण्यात आलेल्या झोपाळ्यावर बसून झोके घेण्याचा आनंद व वडाच्या पारंब्यांना लटकण्याचा आनंद आपल्याला आपल्या बालपणात घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही.
संपूर्ण स्पाईस फार्म, विविध भाज्यांची शेती, केळीच्या बागा, नारळी-पोफळी, काजू, निरफणस हे सारे वृक्ष फिरून पाहताना सर्व निसर्ग प्रेमी सुखावून जातात.
संपूर्ण वर्षभर उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा ह्या तिन्ही ऋतूंमध्ये, त्या त्या ऋतूत बहरणाऱ्या वृक्षांना पाहत त्यांच्या सान्निध्यात वेळ घालवण्याची अपूर्व संधी इथे निसर्गप्रेमींना मिळते.


निवास आणि आदरातिथ्य
फार्मच्या भेटीला आल्यानंतर सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि संध्याकाळी चहा मिळतो. सकाळी नाश्त्याला चहाबरोबर खास असे गोवन भाजी आणि पाव मिळते. दुपारी अप्रतिम चवीचे, पोट भरले तरी मन न भरणारे शाकाहारी आणि मांसाहारी जेवण आणि संध्याकाळी ४ च्या दरम्यान गवती चहा आणि मसाले घालून केलेल्या बिन दुधाच्या फर्मास चहाने पर्यटकांचे आदरातिथ्य केले जाते.
ज्यांना इथे एखादा अथवा अधिक दिवस निवांत राहायचे असेल त्यांच्यासाठी उत्तम कॉटेजेसची सोय आहे. ह्यामध्ये २ लाकडी व दोन दगडी कॉटेजेस आणि एक तंबू आहे.
फार्म मालकांचे पारंपारिक गोवन घर
सुंदर अशा ह्या पारंपरिक घराचे दर्शनही इच्छुकांना दिले जाते. ज्यांना ह्या घरात राहून फार्म स्टेचा आनंद घ्यायचा आहे ते तो आनंदही घेऊ शकतात. इथे राहण्याचा आणखीन एक फायदा म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी पक्षी निरीक्षण करता येते. पदभ्रमंती करण्याची हौस असणाऱ्यांना सकाळी ट्रेकिंगही करता येते. ग्रुप मध्ये सहलीचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी डॉर्मिटरीची पण सोय आहे.


पोहण्यासाठी तलाव
पोहण्याचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी इथे ३ तलाव आहेत. त्यातील एक नैसर्गिक तलाव आहे. वाहत्या पाण्याच्या ओहोळाला अडवून हा तलाव केलेला आहे. त्याशिवाय दोन कृत्रिम तलाव आहेत.
साहसी खेळ
साहसी खेळांमध्ये सात साहसी खेळांचा आनंद इथे घेता येतो ज्यामध्ये; वॉल क्लायम्बिंग, रॅपलिंग, झिप लाईन, बर्मा ब्रिज, कमांडो ब्रिज, मॉंकिंग ब्रिज, जम्पिंग जॅक आदी खेळांचा आनंद लुटता येतो.
इथे राहिले तर, कॅश्यू रोस्टिंग, संगीतमय कॅम्प फायर आणि ट्रेकिंग यांचाही आनंद घेता येतो.
जवळची ठिकाणे
इथून १५ ते ५० कि. मी. अंतरावर इतर प्रेक्षणीय स्थळेही आहेत. त्यामध्ये दूधसागर (१४कि. मी.), तांबडी सुर्ल (३३ कि. मी.), बोन्डला झू (२६ कि. मी.), साळावली डॅम (२५ कि. मी.), बबलिंग लेक (५० कि. मी.), नेत्रावळी धबधबा (५० कि. मी.), भूतनाथ मंदिर (३१ कि. मी.) हे ही पाहता येईल
नैसर्गिक असलेल्या वाहत्या ओहोळाच्या बाजूला शांतपणे पहुडावे, वरती उंच डुलणारी नारळी पोफळी पाहावी, मधूनच उडणारी फुलपाखरे, पतंग न्याहाळावे, डोळे मिटून निसर्गाचे संगीत ऐकावे. झाडातून येणाऱ्या एखाद्या भारद्वाजाची साद, अथवा खारीचा कलरव, मधूनच येणारे चिमुकल्या पक्षांचे कूजन, ओहोळात उडी घेणाऱ्या पाण्याचे मधुर गीत आणि नृत्य… स्वर्गीय सुख म्हणतात ते आणखी दुसरे काय असते?
निसर्ग, साहस, भटकंती, आणि रुचकर जेवण ह्या सर्वांचा एकत्रित आनंद घेत हे असे स्वर्गीय सुख मिळवण्याचे एन् व्ही इको फार्म हे एक उत्तम असे ठिकाण आहे.
