गोव्यामध्ये आंब्याचे विविध प्रकार पाहायला मिळतात.  माणकूराद आंबा हा तर गोव्यातील आंब्यांचा राजा आहे. तर मुसर्राद नावाचा तांबूस हिरव्या रंगाचा आंबा हा विशेषतः हलवा बनवण्यासाठी वापरला जातो. अत्यंत अप्रतिम चवीचा असा हा गोमंतकीय गोड पदार्थ आहे.  फक्त दोन प्रकारचे साहित्य आणि अत्यंत सोपी पद्धत असलेला हा आंब्यांचा हलवा कसा करायचा ते आता पाहू.

Musrad Mango

आंब्याचा हलवा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • मुसर्राद आंब्याचा गर: चार वाट्या (साधारण तीन आंबे)
  • साखर: तीन वाट्या
  • वेलची पावडर: अर्धा चमचा

आंब्याचा हलवा बनवण्याची कृती

१. मुसर्राद आंब्याची साले काढून त्याचा किसणीने किसून गर काढून घ्यावा.

. हा गर एका कढईमध्ये ओतून त्यामध्ये साखर घालावी.

३. आंब्याचा गर आणि साखर मध्यम आंचेवर शिजवण्यास ठेवावी.

४. मध्ये मध्ये हलवत हा गर आटून एकजीव होईपर्यंत म्हणजे साधारण तीस ते चाळीस मिनिटे शिजू द्यावा.

५. हलवा तयार होत आला कि आंब्याच्या रसाचा मूळ पिवळसर केशरी रंग, तांबूस केशरी होऊ लागेल.

६. हलवा होत आला असे वाटले की  त्यामध्ये वेलची पूड मिक्स करावी आणि गॅस बंद करावा.

७. थंड झाला की हलवा एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवावा.

फ्रिजमध्ये ठेवल्यास हा हलवा महिनाभर आरामात राहू शकतो.

चपातीसोबत हा हलवा मुलांना जॅम म्हणून देता येतो. बाहेरून विकत आणलेल्या आंब्याच्या जॅम पेक्षा हा घरगुती हलवा अत्यंत रुचकर लागतो.

Amyacho Halwo/Mango Halwa

सूचना

जर तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये हलवा करायचा असेल तर एक किलो आंब्याचा गर आणि पाऊण किलो साखर या प्रमाणात तुम्ही हा हलवा करू शकता. खूप दिवस टिकवायचा असेल आणि तुम्ही जास्त गोड खाऊ शकत असाल तर एक किलो साखर घालावी.

कॅटेगरी Goan Food

error: Content is protected !!