Alu Vadi

अळू वडी हा लहान थोर सगळ्यांचा आवडता पदार्थ! लहान मुले अळूची पातळ भाजी किंवा अळूचे फतफते खाणार नाहीत पण अळूची वडी खाण्यास त्यांचा कधीही नकार नसतो. आज मी तुम्हाला गोव्यात बनवली जाणारी अळू वडी कशी करायची ते सांगणार आहे. सहसा बेसन मध्ये बनवली जाणारी ही अळूची वडी; गोव्यामध्ये, भिजवलेल्या तांदुळाची आणि मुगाची पेस्ट बनवून त्यापासून केली जाते.

पावसाळा सुरु झाला की गोव्यामध्ये मोठ्या पानाचे आणि लांब देठाचे अळू मिळायला सुरुवात होते. अळूची विविध प्रकारे पातळ भाजी गोवेकर महिला बनवत असतातच परंतु सर्वात जास्त मागणी असते ती अळुवडीला.

तर आता आपण ही अळू वडी कशी करायची ते पाहू.

अळू वडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

*अळूची पाने: ४-५

* मूग: १ वाटी

* तांदूळ: १ वाटी

* चणा डाळ: १/२ वाटी

* किसलेले खोबरे: १ वाटी

* सुकी मिरची: ५-६

* मिरी: १/२ लहान चमचा

* बारीक चिरलेली कोथिंबीर: १ वाटी

* आले: एक इंच

* चिंच: लिंबाएवढा

* गूळ: १ मोठा चमचा  

* हळद: अर्धा चमचा

* मीठ: चवीपुरते

अळू वडी बनवण्याची कृती

1 मूग, तांदूळ आणि चणा डाळ ५-६ तास, किंवा सकाळी करत असल्यास आदल्या रात्री भिजत घालावे.

2 अळूचे देठ वेगळे करून, पाने स्वच्छ धुवून घ्यावी.

3 भिजवलेले तांदूळ, मूग, चणा डाळ, ओले खोबरे, सुकी मिरची, मिरी, कोथिंबीर, आले, चिंच, मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे.

4 ह्या वाटपामध्ये हळद, मीठ आणि गूळ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे.

5 आता अळूचे एक पान पसरावे आणि त्यावर ही पेस्ट चमच्याने एक सारखी पसरून घ्यावी.

6 त्यावर दुसरे पान पसरावे व पुन्हा एकसारखी पेस्ट पसरून घ्यावी.

7 ह्याच प्रकारे आणखी दोन पाने, पसरून घ्यावी. पान आणि त्यावर पेस्ट असे असे चार ते पाच पानांचे थर करावे.

8 सगळ्यात शेवटच्या पानावर पेस्ट पसरली की ह्या पानांची सुरळी करावी.

9 एका पातेल्यामध्ये थोडे पाणी घालून त्यावर चाळण ठेवावी.

10 चाळणीला तेल लावून पातेले गॅसवर ठेवून आधी पाणी थोडे गरम होऊ द्यावे.

11 ह्या चाळणीवर अळूच्या पानांची पेस्ट लावून तयार केलेली सुरळी ठेवावी व पातेले झाकण लावून बंद करावे.

12 १५ मिनिटे ही अळूच्या पानांची सुरळी वाफवून घ्यावी व गॅस बंद करावा.

Crispy Alu Vadi

13 अळूच्या पानांची ही सुरळी थंड झाली की त्याचे काप करावेत.

14 हे काप तव्यावर थोड्या तेलामध्ये शॅलो फ्राय करावेत.

अत्यंत चविष्ट, थोडीशी क्रिस्पी अळूवडी तयार. ही गरमागरम अळूवडी तुम्ही तुमच्या आवडीनुसार नुसतीच खाऊ शकता किंवा टोमॅटो केचअप, सॉस किंवा चटणी सोबतही खाऊ शकता.

कॅटेगरी Goan Food

error: Content is protected !!