शिरवळ्यो हा तांदळाच्या पिठापासून बनवला जाणारा एक गोमंतकीय पारंपारिक पदार्थ आहे. नारळाच्या गोड दुधासोबत शिरवळ्यो खाण्याची पद्धत आहे. कोकणात हाच पदार्थ शिरवाळे या नावाने ओळखला जातो. तांदळाचे पीठ, नारळाचे दूध, गूळ आणि वेलची यांच्या एकत्रित चवीमुळे या पारंपारिक गोमंतकीय पदार्थाला एक वेगळीच चव प्राप्त होते.
आजकाल मुलांच्या बदलत्या खाद्यपसंतीमुळे शिरवळ्योसारखे अनेक पारंपारिक पदार्थ घरांमध्ये क्वचितच बनवले जातात. त्यामुळे मुलांना या अस्सल पारंपारिक चवींचा अनुभव घेता येत नाही. मुलांना एखादा पदार्थ आवडत नाही म्हणून तो बनवणे टाळण्याऐवजी असे पदार्थ अधूनमधून त्यांच्या आहारात समाविष्ट करावेत आणि त्यांचे पौष्टिक महत्त्वही त्यांना समजावून सांगावे. यामुळे मुलांना आरोग्यदायी खाण्याच्या सवयी लागण्यास मदत होईल आणि आपल्या पारंपारिक पाककृतींचा वारसाही पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचेल.
शिरवळ्यो बनवण्याच्या दोन पद्धती आहेत. पारंपारिक पद्धतीत तांदळाच्या पिठाचे छोटे गोळे उकळत्या पाण्यात शिजवून घेतले जातात किंवा चाळणीवर वाफवून घेतले जातात. त्यानंतर साच्याच्या साहाय्याने त्याच्या शेवया पाडल्या जातात. दुसऱ्या पद्धतीत प्रथम शिरवळ्यो तयार केल्या जातात आणि नंतर त्या वाफवून शिजवल्या जातात.
यापैकी कुठल्याही पद्धतीने तयार केलेल्या मऊ, घरगुती शिरवळ्यो गोड नारळाच्या दुधासोबत अतिशय चविष्ट लागतात.
शिरवळ्यो बनवण्यासाठी लागणारे साहित्य
तांदळाचे पीठ: २ वाट्या
पाणी: २ वाट्या
तूप किंवा तेल: एक चमचा
मीठ: चवीनुसार
शिरवळ्यांसाठी गोड नारळाचे दूध बनवण्याचे साहित्य
-
खवलेला नारळ: १ पूर्ण नारळ
-
गूळ: २५० ग्रॅम
-
वेलची पूड: पाव चमचा
-
हळद: पाव चमचा
-
मीठ: पाव चमचा
पारंपारिक गोवन शिरवळ्यो बनवण्याची पद्धत
१. एका पातेल्यामध्ये तूप आणि मीठ घालून पाणी चांगले गरम करून घ्या.
२. तांदळाचे पीठ ह्या पाण्याने छान मळून घ्या
३. या पिठाचे छोटे गोळे करा आणि चाळणीमध्ये ठेवून वाफवून घ्या किंवा उकळत्या पाण्यात टाकून उकडून घ्या.
५. चकलीच्या साच्यात शेवेची चकती घालून त्यामध्ये हे गोळे घाला आणि शिरवळ्यो पाडून घ्या. ही शिरवळ्यो बनवण्याची पारंपारिक पद्धत आहे.
शिरवळ्यो बनवण्याची पर्यायी पद्धत
शिरवळ्यो बनवण्याची ही दुसरी माझ्या पसंतीची पद्धत.
एका पातेल्यात दोन वाट्या पाणी उकळायला ठेवा. त्यात तूप किंवा तेल आणि मीठ घाला.
- पाण्याला उकळी आल्यावर त्यात तांदळाचे पीठ घालून व्यवस्थित उकड काढून घ्या. त्यानंतर गॅस बंद करून पातेल्यावर झाकण ठेवा
मिश्रण हाताळण्याइतपत कोमट झाल्यावर ते चांगले मळून मऊसर पीठ तयार करा.
- या पिठाचे छोटे गोळे करा आणि शेवेच्या साच्यातून त्याच्या शिरवळ्यो पाडून घ्या.
- आता ह्या शिरवळ्यो इडली पात्रामध्ये किंवा स्टीमर मध्ये ठेऊन वाफवून घ्या.
शिरवळ्यांसाठी गुळाचे गोड नारळाचे दूध कसे बनवावे?
शिरवळ्यो या पारंपारिक गोमंतकीय पदार्थाची चव खुलवण्यात गोड नारळाच्या दुधाचा महत्त्वाचा वाटा असतो. नारळ, गूळ, वेलची आणि हळदीचा किंचित स्वाद यांमुळे या दुधाला वैशिष्ट्यपूर्ण चव मिळते.
१. नारळ खवून घ्या. त्यात हळद घालून मिक्सरमध्ये वाटून घ्या.
२. या मिश्रणातून नारळाचे घट्ट दूध काढून घ्या.
३. त्यात किसलेला गूळ घालून तो पूर्णपणे विरघळेपर्यंत ढवळा.
४. शेवटी वेलची पूड आणि मीठ घालून सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करा.
तयार शिरवळ्यो गोड नारळाच्या दुधासोबत गरमागरम वाढाव्यात. मऊ शिरवळ्यो, नारळाचे घट्ट दूध आणि गुळाचा गोडवा यांचा मिलाफ या पारंपारिक पदार्थाला एक खास चव देतो.
ही अस्सल गोवन शिरवळ्यो पाककृती नक्की करून पाहा. गोवा आणि कोकणातील पारंपारिक खाद्यसंस्कृतीतील या साध्या, रुचकर पदार्थाचा आस्वाद घ्या आणि आपल्या पाकपरंपरेतील हा अनमोल ठेवा पुढील पिढ्यांसाठी जतन करा.