म्हार्दोळ येथील महालसा नारायणी मंदिराच्या मुख्य प्रवेश द्वाराच्या समोरील रस्त्यावर, मंदिरातून बाहेर पडताच उजव्या बाजूला असणारे, हॉटेल महालसा. छोटेसेच हॉटेल, पण तिथे असणारी गर्दी त्या हॉटेलमध्ये मिळणाऱ्या पदार्थांचे वेगळेपण सांगून जाते. तिथे मिळणारे पदार्थ नॉर्मली गोव्यात इतर हॉटेलात मिळणारेच. पण ह्या पदार्थांना असलेली त्या हॉटेलच्या कूक सौ. सुपर्ता राजू नाईक यांच्या हातची चव हे इथल्या पदार्थांचे वेगळेपण.

साधारण १९८७-८८ मध्ये श्री. राजू नाईक यांचे वडील गोपीनाथ नाईक यांनी सुरु केलेले हे लहानसे दुकान. जिथे सुरुवातीला; लिंबू सोडा, कोकम सोडा इत्यादी मिळत असे. पुढे श्री राजू नाईक यांनी हळू हळू चहा, कॉफी, दूध,आणि सोबत चण्याची भाजी, बटाटयाची भाजी, आणि पाव देण्यास सुरुवात केली व त्या दुकानाचे हॉटेलमध्ये रूपांतर केले.

हॉटेलमध्ये पदार्थ बनवण्यासाठी जागेचा अभाव असल्यामुळे, शिवाय मुलेही लहान असल्याने सुरुवातीच्या ह्या काळात सौ नाईक हे सर्व पदार्थ घरामध्ये बनवून पाठवत असत. पुढे मुले मोठी झाल्यावर म्हणजे साधारण दहा वर्षांपुवी हॉटेल वाढवून किचन बनवण्यात आले व त्या इथे येऊन पदार्थ बनवू लागल्या. नंतर सुरुवातीच्या तीन चार भाज्या व पाव इ. पदार्थांच्या मध्ये ह्या हॉटेल्सची स्पेशालिटी असलेल्या बन्स आणि मिसळ यांची भर पडली. गरम गरम मिरची तळून मिळू लागली. लॉकडाउनच्या काळात ग्राहक कमी झाल्याने त्या थोडे थोडे बन्स घरातून तळून पाठवत असत. हे बन्सच पुढे त्यांची स्पेशालिटी झाले.

लॉक डाउन संपल्यानंतर त्यांनी परत जेव्हा इथे येण्यास सुरुवात केली तेव्हा रोजच्या दोन तीन भाज्यांबरोबर आता प्रत्येक दिवशी एक स्पेशल भाजी ही करण्यात येऊ लागली ज्यामध्ये मूग, मसूर, सलाड भाजी त्याचबरोबर सिझन प्रमाणे आळसांद्याची भाजीसुद्धा मिळू लागली

महालसा मंदिराच्या बाहेरील मोक्याची जागा आणि सौ. नाईक यांच्या हातची चव यामुळे हळू हळू हॉटेल मधील गर्दी वाढू लागली. इथे येणारा बराचसा ग्राहक हा महालसेच्या दर्शनाला येणारा भक्त परिवार असतो. परंतु लॉक डाउन नंतर गावातील लोकही इथे येऊ लागले. पुढे ह्या पदार्थात पुरी भाजीची भर पडली. इथे येणाऱ्या अधिकाधिक ग्राहकांची मिसळ, बटाटावडा आणि बन्सला विशेष मागणी असते. तर कर्नाटकातील ग्राहकांची मिसळीलाअधिक पसंती असते.

देव दर्शनासाठी येणाऱ्या इथल्या काही ग्राहकांना बिन कांद्याची भाजी हवी असते, त्यामुळे इथल्या बटाट्याच्या भाजीमध्ये आणि बटाटेवड्यांमध्ये कांदा नसतो. पण तरीही ह्या वड्याची आणि भाजीची चव अप्रतिम असते. 

संध्याकाळी पाच साडेपाच नंतर; कांद्याची भजी, बटाट्याची कापा बनवली जातात. मात्र ही कांदा भाजी स्वतंत्र तेलात तळली जातात. बटाटेवडे व इतर बिनकांद्याचे पदार्थ वेगळ्या तेलात तळले जातात. पुन्हा तेल जेवढ्यास तेवढे घेऊन हे सर्व पदार्थ तळले जातात व कुठल्याही कृत्रिम रंगांचा आणि प्रिझर्वेटिव्हचा इथल्या पदार्थामध्ये वापर केला जात नाही.

हॉटेल महालसा सकाळी सात वाजल्यापासून सुरु असते. स्वतः राजू नाईक सकाळचा चहा व भाजी बनवतात. त्यानंतर सकाळी ९ पासून रात्री आठ-साडेआठ पर्यंत हे संपूर्ण कुटुंब, म्हणजे श्री व सौ. नाईक, त्यांच्या दोन मुली आणि एक मुलगा असे सर्व जण ह्या हॉटेलमध्ये कार्यरत असतात. हॉटेलमधील पदार्थ बनवणे, ते सर्व्ह करणे, गल्ला सांभाळणे, स्वच्छता करणे अशी सर्वच कामे ह्या कुटुंबाने वाटून घेतलेली आहेत.

जर तुम्ही कधी महालसा नारायणीच्या दर्शनासाठी म्हार्दोळला येत असाल तर श्री राजू नाईक यांच्या हातचे कोकम सोडा आणि कोकम सरबत व सौ. सुपर्ता नाईक यांच्या हातची खास चव असणारे सर्वच पदार्थ आणि ग्राहकांच्या विशेष पसंतीचे बन्स आणि मिसळ चाखण्यासाठी हॉटेल महालसाला भेट द्यायला विसरू नका. 

कॅटेगरी Goan Food chains