“सेर्रादुर्रा” हा एक पोर्तुगीज शब्द आहे ज्याचा अर्थ आहे, “लाकडाचा भुसा”. मारी बिस्कीटची पावडर, जी अगदी लाकडाच्या भुशासारखी दिसते तिचा वापर करून केलेल्या ह्या गोड पदार्थाला म्हणूनूच सेर्रादुर्रा हे नाव पडले. सॉ डस्ट पुडिंग म्हणूनही ओळखले जाणारे हे एक पोर्तुगीज पुडिंग आहे. जे पोर्तुगाल इतकेच गोव्यामध्येही प्रसिद्ध आहे.
विविध गोवन रेस्टॉरंट्स मध्ये मिळणारा हा पदार्थ बनवणं अतिशय सोपं आहे. हा पदार्थ बनवण्यासाठी लागणारे साहित्यही मोजके आहे.
अगदी थोड्या वेळात बनवला जाणारा हा पदार्थ कसा बनवायचा ते आता आपण पाहू.
सेर्रादुर्रा बनवण्यासाठी लागणारे साहित्य :
- मारी बिस्किट्स : १५ ते २०
- स्वीटनड् कंडेन्सड् मिल्क : ५-६ मोठे चमचे
- व्हॅनिला इसेन्स : अर्धा लहान चमचा
- व्हिपिंग क्रीम : १ कप
बनवण्यासाठी लागणार वेळ : १५ मिनिटे

कृती :
१. मारी बिस्किट्सची पावडर करून घ्या.
२. व्हिपिंग क्रीम छान मऊ आणि एकजीव होईपर्यंत फेटा.
३. यामध्ये कण्डेन्सड् मिल्क आणि व्हॅनिला इसेन्स मिसळून पुन्हा हे सर्व बऱ्यापैकी दाट होईपर्यंत फेटा.
४. एका बाउल मध्ये सर्वप्रथम मारी बिस्किट्सच्या पावडरचा थर पसरा.
५. ह्या पावडरच्या थरावर क्रीमचा एक थर करा.
६. त्याच्यावर पुन्हा मारी बिस्किट्सची पावडर पसरा. (पावडरचा थर हा क्रीमच्या थरापेक्षा पातळ असावा.)
७. हीच पद्धत आणखीन दोनदा रिपीट करा. शेवटचा थर मात्र बिस्किटाच्या पावडरीचा अतिशय पातळ थर असावा. पावडर नुसती भुरभुरली तरी चालेल.
८. तयार झालेले असे हे चार ते पाच बाउल्स साधारण पाच ते सहा तास फ्रिज मध्ये ठेवा.
खाण्यापूर्वी साधारण १५ मिनिटे फ्रिजमधून बाहेर काढून ठेवा.
छान थंड असे गोड गोड सेर्रादुर्रा खाण्यासाठी तय्यार!
गोड आणि थंड पदार्थ आवडणाऱ्यांना आणि विशेषतः लहान मुलांना, हा सोपा आणि थोड्या साहित्यामध्ये सहज बनवता येणारा पदार्थ नक्कीच आवडेल.