Sao Joao festival, Goa

गोव्यातील पावसाळा हा नुसताच निसर्गाचा सोहळा नसून तो एक पारंपरिक सण-उत्सवांनी भरलेला विशेष अनुभव असतो. अशाच सणांपैकी एक अनोखा आणि आनंददायी सण म्हणजे सांव जांव, जो दरवर्षी २४ जून रोजी साजरा केला जातो. हा सण सेंट जॉन बॅप्टीस्ट (Saint John the Baptist) यांच्याशी संबंधित आहे, पण गोव्यात त्याला मिळालेली खास कोकणी ओळख आणि लोकजीवनाशी असलेली नाळ त्याला एक आगळं वेगळं स्वरूप देते.

इतिहास: गोव्यात सांव जांवची सुरुवात

सांव जांवचा नेमका प्रारंभ कधी झाला याची स्पष्ट नोंद नसली, तरी इतिहास सांगतो की हा उत्सव गोव्यात ४०० हून अधिक वर्षांपासून म्हणजेच पोर्तुगीज राजवटीच्या काळापासून साजरा होत आहे. ईसवी सन १५१० साली पोर्तुगीजांनी गोवा जिंकल्यानंतर त्यांनी अनेक ख्रिस्ती धार्मिक परंपरा गोव्यात आणल्या. त्यापैकीच एक म्हणजे संत जॉन द बॅप्टिस्ट यांचा दिवस (Feast of Saint John the Baptist). ही जागतिक ख्रिश्चन परंपरा गोव्यातील स्थानिक जीवनशैली, कोकणी संस्कृती आणि पावसाळ्याच्या वातावरणाशी मिसळून सांव जांवच्या खास गोमंतकीय रूपात परिवर्तित झाली.

निसर्गाशी एकरूप होणारा उत्सव

सांव जांव हा पावसाळ्याच्या सुरूवातीला साजरा होणारा उत्सव असून तो निसर्गाच्या पुनर्जन्माचे आणि आनंदाचे प्रतीक मानला जातो. हिरवीगार शेतं, वाहणाऱ्या नद्या, फुललेली रानफुलं — हे सर्व वातावरण ह्या उत्सवाची पार्श्वभूमी बनवते.

या दिवशी लोक पावसात भिजतात, विहिरी, ओढ्यांमध्ये उड्या मारतात आणि आनंद व्यक्त करतात. ही परंपरा संत जॉन द बॅप्टिस्ट यांच्याशी संबंधित एका धार्मिक घटनेचे प्रतिकात्मक रूप आहे — जिथे त्यांनी येशूच्या जन्माची बातमी ऐकताच आपल्या आईच्या गर्भातच आनंदाने उडी मारली, असे मानले जाते.

Sao Joao jumping into well
कोपेल,सांगोड आणि परंपरेचे रंग

सांव जांवचे सर्वात वैशिष्ट्यपूर्ण भाग म्हणजे:

कोपेल: तरुण मुले मुली डोक्यावर रंगीबेरंगी फुलांची टोपी घालतात. या टोपीत रानफुलं, वेली, फळं यांचा समावेश असतो — हे निसर्गाच्या पूजनाचे आणि सजावटीचे प्रतीक आहे.

सांगोड: गावांमध्ये ओढ्यांवर किंवा नद्यांवर छोट्या बोटी सजवून किंवा केळीच्या झाडाची खोडे एकमेकांना बांधून त्यांचा तराफा करून त्यावर सजावट केली जाते. आणि या अशा सजवलेल्या बोटींमधून म्हणजे पाण्यावर जी मिरवणूक काढली जाते त्याला सांगोड म्हणतात, ह्या मिरवणुकीमध्ये  गोवन संगीत, ढोल, पारंपरिक गाणी आणि लोकनृत्य यांचा समावेश असतो. त्यामुळे सांगोड हे सांव जांव उत्सवाचे प्रमुख आकर्षण असते.

झोणें परंपरा: नवविवाहित जावयांना घरून खास भेटीची टोपली पाठवली जाते ज्यामध्ये फळे, मिठाई, फेणी यांचा समावेश असतो. ही परंपरा प्रेम आणि नात्यांची जपणूक म्हणून ओळखली जाते.

सांस्कृतिक जल्लोष आणि खाद्यपदार्थांचा मेजवानी

सांव जांवच्या निमित्ताने पारंपरिक कोकणी गाणी, नृत्य, ढोलताशा आणि जल्लोष सगळीकडे दिसतो. लोक पारंपरिक घुमट, मांडो, फुगडी, देखणी अशा लोककला सादर करतात.

खाण्याच्या बाबतीतही हा उत्सव कमी नाही. घराघरांत पातोळ्यो, सांन्न, चोणे, इ. पारंपरिक पदार्थ तयार केले जातात.  हंगामी फळं खाल्ली जातात आणि फेणी ही तर ह्या सणाची खास ओळख असते.

Sao Joao festival
शिवोलीचा प्रसिद्ध सांव जांव

गोव्यातील शिवोली(Siolim) ह्या गावातील सांव जांव उत्सव सर्वात प्रसिद्ध आहे. मोठ्या संख्येने लोक इथे ह्या उत्सवाचा आनंद घेण्यासाठी येतात. येथे दरवर्षी सांगोड मिरवणुकीची स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपरिक सादरीकरण आणि मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभाग असतो. पर्यटकही हा उत्सव पाहण्यासाठी उत्साहाने येतात.

धार्मिकतेपासून लोकपरंपरेपर्यंत

सांव जांव हा उत्सव धार्मिक आस्था, लोकपरंपरा, निसर्गाशी नातं आणि सामुदायिक स्नेह यांचा एक अद्भुत संगम आहे.

पण सध्या काही ठिकाणी याचा अति-व्यावसायिकीकरण होत आहे, अशी चिंताही व्यक्त केली जाते. त्यामुळे पारंपरिक पद्धती आणि सांस्कृतिक मुळं जपण्यासाठी गावोगावी प्रयत्न सुरू आहेत.

दुर्मिळ सण

सांव जांव हा केवळ एक सण नाही, तर तो गोव्याच्या सांस्कृतिक ओळखीचा आरसा आहे. तो पावसाचा, निसर्गाचा, गाण्याचा, नात्यांचा आणि आनंदाचा उत्सव आहे — परंपरा आणि उत्साह जिथे खऱ्या अर्थाने हातात हात घालून वाहतात — असा हा एक दुर्मिळ सण आहे.

 

Sao Joao
कॅटेगरी Goa

error: Content is protected !!