गोमंतकीय परंपरांचा नवा अनुभव
लग्न होऊन गोव्यामध्ये आल्यानंतर गोव्याची नव्याने ओळख होऊ लागली होती. इथल्या विविध परंपरा, अनेक देवस्थाने, तिथले उत्सव, हे सारं काही पहिल्यांदाच अनुभवत होते. सांगोड ह्या उत्सवाबद्दलही कळलं आणि पहिलावहिला सांगोडचा अविस्मरणीय अनुभव म्हार्दोळ येथील महालसा नारायणी मंदिराच्या जत्रोत्सवावेळी घेतला होता. त्यानंतर किती तरी वेळा सांगोड पाहिला, प्रत्येकवेळचा अनुभव हा नित्य नवीन असायचा.

सांगोड म्हणजे काय?
सांगोड हा गोव्यातील वैशिष्ट्यपूर्ण असा जलोत्सव आहे. जो हिंदूच नाही तर ख्रिस्ती समाजामध्येही उत्साहाने साजरा केला जातो.
सांगोड म्हणजे नौकाविहार. सांगोडचा हा उत्सव विशेषतः देवळांशी संबंधित आहे. ह्या उत्सवामध्ये देव-देवता नौकाविहाराला जातात. देवळाच्या परिसरामध्ये असलेल्या तळीमध्ये हा नौकाविहार केला जातो. या नौकाविहारासाठी खास नौका तयार केली जाते. जी दोन किंवा अधिक होड्या एकमेकांना जोडून तराफ्याप्रमाणे बनवली जाते. देवतेचे आगमन होडीवर झाले की आधी पूजा आरती करून मग नौकाविहारास सुरुवात होते. हाच सांगोड उत्सव.

सांगोडची मंत्रमुग्ध करणारी रात्र
बहुतेक देवस्थानांच्या वार्षिक जत्रोत्सवामध्ये एक दिवस सांगोडचा हा नयनमनोहर सोहळा असतो. देवस्थानातील हा उत्सव विशेषतः रात्रीचा असतो. तलावाच्या चारीबाजूनी दिव्यांची रोषणाई केलेली असते. बाजूला ढोल ताशांचा घोष चालू असतो. फटाक्यांची आतषबाजी होत असते. नौकेतील देवतेसमोर पुरोहित आपल्या हातातील घंटेने अखंड घंटानाद करत असतो. संपूर्ण वातावरण मनाला एक वेगळ्याच प्रसन्न विश्वात घेऊन जाते. त्यामुळे मोठ्या संख्येने भक्त गण ह्या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी एकत्र येतात.

कुंभारजुवेचा प्रसिद्ध सांगोड उत्सव
परंतु गोव्यामध्ये सांगोड म्हटलं की सर्वाना सर्वात प्रथम आठवतो तो कुंभारजुवे ह्या गावातील सांगोड उत्सव. गोव्यामध्ये अत्यंत प्रसिद्ध असलेला हा उत्सव गणेश चतुर्थीच्या वेळी साजरा करतात. गणेशचतुर्थीच्या सातव्या दिवशी कुंभारजुवे येथील कालव्यामध्ये साजरा होणारा वैशिष्ट्यपूर्ण असा हा विसर्जन सोहळा अत्यंत प्रसिद्ध आहे.
ह्या सोहळ्यामध्ये एकमेकांना बांधलेले साधारण १५ सांगोड म्हणजे होड्या ठरलेल्या मार्गावरून सात फेरे मारतात. ह्या होड्या फुलांनी सजवलेल्या असतात. एकमेकांना जोडलेल्या ह्या होड्यांवर एक व्यासपीठ तयार केले जाते. त्या व्यासपीठावर उत्साहाने साजरी होणारी वेशभूषा स्पर्धा हे या सांगोडचे आणखीन एक वैशिष्ट्य. पुराणातील विविध प्रसंगातील पात्रे ह्यावेळी कलाकार रंगवतात. गावकरी आपल्या आवडत्या पात्रांच्या वेशामध्ये ह्या तरंगत्या होड्यावरील रंगमंचावर नाट्यप्रयोग साजरा करतात. त्यांच्या उत्साहाला जल्लोषपूर्ण संगीताची आणि नृत्याचीही साथ लाभलेली असते.

सांगोड परंपरेमागची सहाशे वर्षांपूर्वीची कथा
ही परंपरा कशी सुरु झाली यापाठीमागे एक कथा सांगितली जाते.
ही कथा आहे पंधराव्या शतकातली. कुंभारजुवे येथील वोडेकर कुटुंबीय दरवर्षी भक्तिभावाने गणपती पूजत होते. परंतु एके वर्षी आर्थिक अडचणीमुळे त्यांनी गणपती शांतादुर्गा कुंभारजुवेकरीणीच्या मंदिरात प्रतिष्ठापित केला. ह्या गणपतीचे सातव्या दिवशी कुंभारजुवे येथील कालव्यामध्ये विसर्जन करण्यात आले, त्यावेळी होड्यांचा वापर करण्यात आला. आणि तेव्हापासून कुंभारजुवेतील हा प्रसिद्ध उत्सव सुरु झाला.
शांतादुर्गा देवीला अर्पण केलेला उत्सव
असा हा आगळा वेगळा जलोत्सव कुंभारजुवेच्या शांतादुर्गा देवीला अर्पण करण्यात आलेला आहे. हा उत्सव साजरा केल्याने शांतादुर्गा देवी प्रसन्न होते असा गाढ विश्वास येथील ग्रामस्थांचा आहे. वरील कथेनुसार सहाशे वर्षांपूर्वी सुरु झालेली ही प्रथा म्हणूनच आजही तितक्याच उत्साहाने साजरी होते.

ख्रिस्ती समाजातील सांगोड
सांगोड ही प्रथा जशी हिंदूंच्या मंदिरांशी आणि गणेशोत्सवाशी संबंधित आहे. तशीच ती ख्रिश्चन समाजाशीही जोडलेली आहे. ख्रिश्चन बांधवांमधील कोळी समुदाय हा जलोत्सव साजरा करतो. साओ पेद्रो, कांदोळी, शिवोली, रायबंदर, आगशी ह्या गावातील मासेमार हा उत्सव सेंट पीटर ह्यांना अर्पण करतात.
सेंट पीटर हे मासेमाऱ्यांचे संरक्षक संत मानले जातात. हा उत्सव दरवर्षी २९ जूनला साजरा केला जातो. कुंभारजुवेतील सांगोड प्रमाणेच इथेही रंगीबेरंगी सजवलेल्या होड्या एकमेकांना जोडलेल्या असतात. ह्या होड्यावर चर्चच्या प्रतिकृती ठेवल्या जातात व संगीत नृत्याच्या जल्लोषात नाटक आणि वेशभूषा स्पर्धा आयोजित केल्या जातात. ह्या दिवशी आपली मासेमारी बाजूला ठेवून संपूर्ण कोळी समाज ह्या जल्लोषात आनंदाने सामावून जातो.
श्रद्धा, उत्साह आणि एकोप्याचा जलोत्सव
एक पावसाळी उत्सव आणि विविध मंदिरांच्या जत्रोत्सवाशीही निगडित असलेला; श्रद्धा, उत्साह आणि आनंद यांना एकत्र जोडणारी अशी आहे गोव्यातील अमूल्य सांस्कृतिक परंपरा- सांगोड.