फाल्गुन महिना येतो तसा गोव्याला वेध लागतात शिगमोत्सवाचे! सगळे लोक आतुरतेने ह्या शिगमोत्सव (शिमगा) अर्थात होळी सणाची वाट पाहत असतात. आपापल्या भागात कुठल्या तारखेला शिगमोत्सव मिरवणूक आणि चित्ररथ असणार याची लोकांमध्ये उत्सुकतेने चर्चा सुरु होते. ह्यावर्षीचा होळी सण अवघा चार दिवसावर येऊन ठेपलेला आहे. उत्साहाचं उधाण असलेल्या ह्या शिगमोत्सव मिरवणुकीचे वेळापत्रकही आलेले आहे. साधारण पंधरा दिवस सुरु असणाऱ्या ह्या उत्सवाची सुरुवात १५ मार्च पासून होईल. ज्या ज्या ठिकाणी ह्या शिगमोत्सवाच्या मिरवणुका होतील त्या ठिकाणांची नावे आणि तारखा पुढील प्रमाणे..
शिगमोत्सवाच्या तारखा आणि स्थळे :
- मार्च १५ – फोंडा
- मार्च १६ -मडगाव
- मार्च १७ – केपे
- मार्च १८ – कुडचडे
- मार्च १९ – शिरोडा
- मार्च २० – कळंगुट आणि डिचोली
- मार्च २१ – वास्को
- मार्च २२ – पणजी
- मार्च २३ – म्हापसा आणि सांगे
- मार्च २४ – कुंकळ्ळी
- मार्च २५ – पेडणे आणि काणकोण
- मार्च २६ – धारबांदोडा
- मार्च २७ – वाळपई
- मार्च २८ – साखळी
- मार्च २९ – मांद्रे


होळीपूर्वीच लागतात शिगमोत्सवाचे वेध :
उत्साही तरुणांना शिगमोत्सवाचे वेध खरे तर प्रत्यक्ष होळी सुरु होण्यापूर्वीपासूनच लागलेले असतात. विविध रोमटा मेळ होळीपूर्वीच स्थानिक देवतांचे आशीर्वाद घेण्यासाठी देवालयातून जातात.
अंत्रुज महाल अर्थात फोंडा हे ह्या उत्सवाचे केंद्र आहे असे म्हणायला हरकत नाही. फोंड्याच्या आजूबाजूचे लहान मोठे रोमटामेळ होळीच्या काही दिवस आधी, रंगीबेरंगी कपडे घालून ‘ओस्सय ओस्सय’ चा गजर करत, महालसा मंदिर म्हार्दोळ येथे महालसेचा आशीर्वाद घेण्यासाठी जमतात.
रोमटा मेळचा शाब्दिक अर्थ एका गावातून दुसऱ्या गावात जाणे. एक शिस्तबद्ध आणि ठराविक पारंपरिक गणवेश परिधान केलेला समूह पारंपरिक गाणी गात, ‘ओस्सय ओस्सय’ असा गजर करत आणि ठराविक तालबद्ध पदन्यास करत पुढे चालत असतो. सोबत ढोल, ताशे आदि वाद्यांचा ‘घुमचे कटर घूम’ चा ठेका असतो.
शिगमोत्सवाची भव्यता :
शिगमोत्सवाच्या मिरवणुकीत ह्या रोमटा मेळाबरोबर, विविध पारंपरिक गोमंतकीय लोकनृत्यांचेही सादरीकरण केले जाते. ज्यामध्ये फुगडी, धनगर नृत्य, गोफ, मोरूला, घोडे मोडणी इ. अनेक नृत्यांचे त्या त्या पारंपरिक वेशात पारंपरिक गाणी म्हणत प्रदर्शन केले जाते. मिरवणुकीत असणारे विविध पौराणिक चित्ररथ हे ह्या शिगमोत्सवाचे खास आकर्षण असते. याचबरोबर वेगवेगळ्या वेशभूषा करून लोक ह्या मिरवणुकीमध्ये सामील होतात. रोमटामेळ, लोकनृत्ये, चित्ररथ आणि फॅन्सी ड्रेस यांच्या राज्यस्तरीय स्पर्धा असल्याने अनेक मंडळे ह्या मिरवणुकीत उत्साहाने भाग घेतात. हा अप्रतिम सोहळा पाहण्यासाठी लोक प्रचंड संख्येने उपस्थतीत असतात. अनेक देशी विदेशी पर्यटकही हा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी उत्साहाने विविध ठिकाणी उपस्थित राहतात.
आनंदसोहळ्याचे साक्षी बना :
गोव्याचा हा अप्रतिम शिगमोत्सव पाहण्याची तुमची इच्छा असेल तर लगेच गोव्याची टूर प्लॅन करा. १५ मार्च ते २९ मार्च मध्ये तुमच्या सोयीप्रमाणे कुठेही तुम्ही ह्या आनंद सोहळ्याचे साक्षी बनू शकता.