समस्त गोवेकरांचं श्रद्धास्थान!
शांतादुर्गा देवी म्हणजे समस्त गोवेकरांचं श्रद्धास्थान! संपूर्ण गोव्यामध्ये अनेक गावांमधून त्या त्या गावाच्या नावाने शांतादुर्गा देवीची मंदिरे आहेत. असंच एक अत्यंत प्रसिद्ध मंदिर जे लाखो भाविकांचं अतुल्य श्रद्धास्थान आहे ते म्हणजे फातर्प्याचे शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण देवीचे मंदिर. गोव्यातील अनेक प्रसिद्ध मंदिरांमध्ये फातर्पा येथील शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण मंदिराला विशेष स्थान आहे.
असंख्य गोमंतकीयांसाठी शांतादुर्गा ही केवळ देवी नसून संकटसमयी आधार देणारी, संरक्षण करणारी आणि मार्गदर्शन करणारी शक्ती आहे.
शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण देवीची रंजक इतिहासकथा
अनेक भाविकांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो की मंदिर फातर्पा येथे असताना देवीला “कुंकळ्ळीकरीण” का म्हटले जाते?
यामागे गोव्याच्या इतिहासाशी जोडलेली एक महत्त्वाची कथा आहे.
मूलतः शांतादुर्गा देवीचे वास्तव्य कुंकळ्ळी येथे होते. परंतु पोर्तुगीज राजवटीत ज्या अनेक मंदिरांवर संकट ओढवले त्यापैकी एक असलेल्या कुंकळ्ळीच्या मंदिरातून काही भक्तानी तिला फातर्प्याला आणले. इथल्या मूळच्या शांतादुर्गा फातर्पेकरीणीच्या मंदिराच्या जवळच काही अंतरावर शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
फातर्प्याची ही शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण अतिशय जागृत देवता. त्यामुळे हिचा भक्त परिवारही खूप मोठा आहे. नवसाला पावणाऱ्या या देवीचे दरवाजे न केवळ हिंदूंनीच तर इतर धर्मियांनीही संकट समयी ठोठावले आहेत.
मंदिराला दिलेली माझी पहिली भेट
मी ह्या मंदिरात पहिल्यांदा पोचले ते माझ्या लग्नानंतर. कुलदैवत आणि श्रद्धेय देवतांचे दर्शन घ्यायला आम्ही गेलो तेंव्हा मी प्रथमच या मंदिरात आले. त्यापूर्वी मला फातर्पा गावाबद्दल किंवा या देवीबद्दल फारशी माहिती नव्हती.
माझ्या घरचे, विशेषतः पतीचे हे अत्यंत श्रद्धेचे स्थान आहे. पौष महिन्यात शांतादुर्गेचा जत्रोत्सव असतो त्यावेळी अनेक भाविक देवीला पड अर्पण करतात. पड म्हणजे, ठराविक मापाचे तांदूळ आणि एक नारळ. मागणीनुसार ते देवीला अर्पण करावे लागतात. जत्रेला इतकी अलोट गर्दी असल्याने जत्रेच्या दिवशी आम्ही घरीच देवीला पड अर्पण करतो आणि नंतर सवडीनुसार आम्ही तो पड देवीला अर्पण करून देवीचे दर्शन घेऊन येतो.
आशियातील सर्वात उंच दीपस्तंभ
जशी देवी दिव्य आणि पूजनीय आहे, तसेच तिचे मंदिरही अत्यंत भव्य आहे.
मंदिरासमोर उभा असलेला दीपस्तंभ हे येथील सर्वात मोठे आकर्षण आहे. आशियातील सर्वात उंच आणि भव्य दीपस्तंभ म्हणून त्याची ओळख आहे.
मंदिराकडे जाण्यासाठी असलेल्या पायऱ्या उतरून तिथे पोहोचण्यापूर्वीच हा दीपस्तंभ आपले लक्ष वेधून घेतो. पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर त्याची भव्यता आणखीनच लक्षात येते.
हा दीपस्तंभ एखाद्या खोलीएवढा रुंद असून त्याला सुंदर लाकडी दरवाजा आहे, जो बहुतेक वेळा बंद असतो. दीपस्तंभाच्या चारी बाजूनी अनेक देवदेवतांच्या आणि संतांच्या पाहात राहाव्या अशा सुबक मुर्त्या आहेत. दीपस्तंभाच्या समोरच एक मोठे तुळशीवृंदावन आहे जे परिसराच्या सौंदर्यात भर घालते.
गोमंतकीय मंदिर वास्तुकलेचा सुंदर नमुना
शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण मंदिराचा बाह्य प्रवेशभाग इतर बहुतेक गोमंतकीय मंदिरांपेक्षा थोडासा वेगळा आहे. साधारणपणे गोव्यातील मंदिरांच्या बाहेर सभामंडप असतो. ह्या सभामंडपातून मध्य मंडपात प्रवेश होतो आणि त्यानंतर महा मंडप किंवा मुख्य मंडप असतो, ज्याला सामान्यतः चौक असे म्हटले जाते. मात्र, शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण मंदिरात सभामंडप नाही. त्याऐवजी, एका लहान प्रवेश कक्ष आहे जिथून थेट तुलनेने लहान अशा मध्य मंडपात प्रवेश करता येतो. ह्या मध्यमंडपामध्ये शांतादुर्गेचे मखर ठेवलेले असते.
त्यानंतर पुढे प्रशस्त मुख्य मंडप आहे. हा चौक अथवा मुख्य मंडप वर्षभर भक्तांनी गजबजलेला असतो. विशेषतः रविवारी, जो देवीचा वार मानला जातो, तेव्हा येथे मोठी गर्दी असते. वार्षिक जत्रेनंतर तर दर्शनासाठी आणखी लांब रांगा लागतात.
शांतादुर्गेच्या दिव्य दर्शनाचा अनुभव
मुख्य मंडपात प्रवेश करून जसे गाभाऱ्याच्या दिशेने जाऊ तशी देवीची तेजस्वी मूर्ती आपले लक्ष वेधून घेते.
तिच्या काहीशा उग्र परंतु तेजस्वी मुखमुद्रेचे दर्शन घेताच मनाला विलक्षण शांती आणि समाधान लाभते. देवीचे दर्शन हे अनेक भाविकांसाठी आध्यात्मिक अनुभव ठरते.
गर्भगृहाचे दरवाजे, कमानी, चांदीच्या पत्र्यावरील कलाकुसरीने सुशोभित केलेले आहेत. गाभाऱ्याच्या मुख्य द्वारावर असणारी, हस्तकलेचे कौशल्य दाखवणारी लोकरीची तोरणे लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाहीत.
ह्या मुख्य द्वारावर वरच्या बाजूला एक मोठे वर्तुळ आहे ज्याच्यामध्ये एक फुल आणि फुलाच्या सर्व बाजूनी बारा राशींची चित्रे आहेत. बाकी ह्या चौकातील दोन्ही बाजूच्या खिडक्या, तिन्ही बाजूला असणारा सज्जा, दोन्ही बाजूची खांबांची रांग हे साधारण गोव्यातील इतर मंदिरांप्रमाणेच आहे. मात्र इथे लाकडी बांधकामाचा वापर दिसून येत नाही.
सज्जाच्या खालच्या बाजूस भिंतीवर असणाऱ्या देवीच्या विविध मुर्त्या सुबक कोरीव आहेत. ह्या देवळाच्या छताची आतील बाजूही अतिशय उंच कोनाकृती आहे.
खंडेरायापासून शंकर मंदिरापर्यंत : शांतादुर्गा मंदिरातील वैशिष्ट्ये
गाभाऱ्यामध्ये देवीच्या उजव्या बाजूला खंडेरायाची उभी मूर्ती आहे. खंडेरायाने शांतादुर्गेला कुंकळ्ळीला आणले असाही एक समज आहे.
अनेक भक्त आपले नवस पूर्ण करण्यासाठी आणि मनोकामना व्यक्त करण्यासाठी येथे येतात. अनेक लोक देवीचा कौल प्रसादही घेत असतात. चौक नेहमीच नवस फेडणाऱ्या आणि देवीला पड अर्पण करणाऱ्या भक्तांनी भरलेला असतो.
देवीला पडाच्या स्वरूपात येणारे तांदूळ इतके असतात की तांदुळाचा खच पडलेला असतो. ते आणि इतस्ततः पडलेले तांदूळ टिपण्यासाठी चिमण्या मंदिरामध्ये बिनधास्त वावरत असतात.
मंदिराच्या एका बाजूला भगवान शंकरांचे एक छोटे मंदिर आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात मधोमध शंकराची पिंडी आहे आणि पिंडीच्या मागच्या भिंतीवर शंकराचा एक सुंदर बोलका फोटो आहे.
शांतादुर्गेच्या भव्य मंदिराच्या बाहेरील भिंतींवर विविध देवतांच्या तसेच नवग्रहांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. मंदिराचा कळस देखील सुंदर मूर्तींनी सजवलेला आहे.
विशेष म्हणजे मंदिराला बंदिस्त असे आवार नाही. मंदिराच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या रस्त्याच्या पलीकडे, मंदिराचे कार्यालय, सभागृह इत्यादी इमारती आहेत.
प्रसिद्ध जत्रा आणि धार्मिक उत्सव
शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण मंदिरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम आणि उत्सव आयोजित केले जातात.
दर रविवारी देवीची पालखी मिरवणूक काढली जाते आणि त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले जाते.
मात्र सर्वांत प्रसिद्ध उत्सव म्हणजे फातर्पा जत्रा. गोव्यातील सर्वात मोठ्या आणि प्रसिद्ध जत्रांपैकी ही एक असून ह्या जत्रेचा रथ अत्यंत प्रसिद्ध आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक या उत्सवासाठी येथे येतात.
शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण मंदिर फातर्पा येथे कसे पोहोचाल?
फातर्पा हे गाव दक्षिण गोव्यातील केपे (Quepem) तालुक्यात वसलेले आहे. हे गाव मडगावपासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर आहे.
NH ६६ या महामार्गाने येथे सहज पोहोचता येते.
शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण मंदिराला भेट का द्यावी?
तुम्ही गोव्यातील शांतादुर्गा देवीचे भक्त असाल किंवा गोव्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाबद्दल जाणून घेण्याची आवड असेल, तर शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण मंदिराला भेट देणे हा एक अविस्मरणीय अनुभव ठरेल.
समृद्ध इतिहास, भव्य वास्तुकला, आशियातील सर्वात उंच दीपस्तंभ आणि आजही जपल्या जाणाऱ्या धार्मिक परंपरा यांमुळे हे मंदिर गोव्यातील सर्वात महत्त्वाच्या हिंदू मंदिरांपैकी एक मानले जाते.
या पवित्र स्थळाला दिलेली भेट प्रत्येक भाविकाच्या मनात श्रद्धा, शांती आणि आध्यात्मिक समाधानाची अनुभूती कायमची कोरून ठेवते.