समस्त गोवेकरांचं श्रद्धास्थान!

शांतादुर्गा देवी म्हणजे समस्त गोवेकरांचं श्रद्धास्थान! संपूर्ण गोव्यामध्ये अनेक गावांमधून त्या त्या गावाच्या नावाने शांतादुर्गा देवीची मंदिरे आहेत.

असंच एक अत्यंत प्रसिद्ध मंदिर जे लाखो भाविकांचं अतुल्य श्रद्धास्थान आहे ते म्हणजे फातर्प्याचे शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण देवीचे मंदिर. आता गावाचे नाव तर फातर्पा आणि देवी कुंकळ्ळीकरीण कशी असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर ही शांतादुर्गा मूळची कुंकळ्ळीची. परंतु पोर्तुगीज राजवटीत ज्या अनेक मंदिरांवर संकट ओढवले त्यापैकी एक असलेल्या कुंकळ्ळीच्या मंदिरातून काही भक्तानी तिला फातर्प्याला आणले. इथल्या मूळच्या शांतादुर्गा फातर्पेकरीणीच्या मंदिराच्या जवळच काही अंतरावर शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीणीची स्थापना केली गेली.

फातर्प्याची ही शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण अतिशय जागृत देवता. त्यामुळे हिचा भक्त परिवारही खूप मोठा आहे. नवसाला पावणाऱ्या या देवीचे दरवाजे न केवळ हिंदूंनीच तर इतर धर्मियांनीही संकट समयी ठोठावले आहेत.

शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण मंदिर, फातर्पे

मी ह्या मंदिरात पहिल्यांदा पोचले ते माझ्या लग्नानंतर. कुलदैवत आणि श्रद्धेय देवतांचे दर्शन घ्यायला आम्ही गेलो तेंव्हा.. त्यापूर्वी मी ह्या गावाबद्दल अन् ह्या देवीबद्दल काहीही ऐकलेले नव्हते.

माझ्या घरचे, विशेषतः पतीचे हे अत्यंत श्रद्धेचे स्थान. पौष महिन्यात शांतादुर्गेचा जत्रोत्सव असतो त्यावेळी माझ्या घरी एक पतीचा आणि एक माझ्या धाकट्या मुलाचा असे दोन पड ठेवावे लागतात. पड म्हणजे, ठराविक मापाचे तांदूळ आणि एक नारळ देवीची मागणी असलेल्याना देवीला अपर्ण करावे लागतात. आमच्या सवडीनुसार आम्ही तो पड मग देवीला अर्पण करायला जातो.

भव्य दीपस्तंभ

शांतादुर्गा देवीप्रमाणेच तिचे मंदिरही अतिशय देखणे आहे. मंदिरासमोर असलेला दीपस्तंभ हा आशियातील   सर्वात उंच आणि भव्य दीपस्तंभ आहे. मंदिराकडे जाण्यासाठी असलेल्या पायऱ्या उतरून तिथे पोहोचण्यापूर्वीच हा दीपस्तंभ आपले लक्ष वेधून घेतो. पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर त्याची भव्यता आणखीनच लक्षात येते. एका खोलीएवढ्या रुंद असलेल्या ह्या दीपस्तंभाला एक सुरेख लाकडी दरवाजा आहे. तो काही भाविकांसाठी खुला नसतो, तो कधी उघडतो हे माहित नसल्याने आतमध्ये काय आहे त्याची काही कल्पना आली नाही. दीपस्तंभाच्या चारी बाजूनी अनेक देवदेवतांच्या आणि संतांच्या पाहात राहाव्या अशा सुबक मुर्त्या आहेत. दीपस्तंभाच्या समोर एक मोठे तुळशी वृंदावन आहे.

शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण दीपस्तंभ

मंदिराच्या पायऱ्या चढून आत गेल्यावर एक छोटासा हॉल आहे. देवीच्या गाभाऱ्याच्या समोर असलेल्या चौकातील   सज्जात जाण्यासाठी ह्या हॉल मध्ये दोन जिने आहेत. बाहेरील ह्या हॉलच्या दरवाजातून आत जाताच आणखीन एक खोली आहे जिथे देवीचे मखर ठेवलेले आहे. ही खोली ओलांडून जाताच भव्य चौक आहे. इतर देवळांमध्ये सर्व साधारणपणे असतो तसा सभामंडप इथे नाही. इथे येणाऱ्या भाविकांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे हा चौक इतर देवालयांच्या तुलनेत थोडा अधिक मोठा असावा. हा चौक भाविकांनी सदैव भरलेला असतो. रविवार हा देवीचा वार; त्यावेळी तर मंदिरात गर्दी अधिकच असते. विशेषतः जत्रेनंतर मंदिरात गेल्यास तास तास रांगेमध्ये उभे राहावे लागते.

तेजःपुंज शांतादुर्गा

या चौकात शिरून आपण जसे पुढे जाऊ लागतो तशी देवीची तेजाने तळपणारी उभी मूर्ती जणू काही आपल्याला स्वतःकडे खेचून घेते. काही क्षण तिच्याकडे पाहत तिच्या प्रसन्न मुद्रेतील शांती आपल्यामध्ये सामावून घ्यायची आणि चौकातील एक जागा पकडून डोळे मिटून ती शांती शरीरमनभर मुरू द्यायची, आणखी काय हवे असते आपल्याला देवाकडून?

शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण
मंदिराचे स्वरूप

शांतादुर्गेच्या गर्भगृहाचे दरवाजे, कमानी, चांदीच्या पत्र्यावरील कलाकुसरीने सुशोभित केलेले आहेत. गाभाऱ्याच्या मुख्य द्वारावर असणारी, हस्तकलेचे कौशल्य दाखवणारी लोकरीची तोरणे लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाहीत.

ह्या मुख्य द्वारावर वरच्या बाजूला एक मोठे वर्तुळ आहे ज्याच्यामध्ये एक फुल आणि फुलाच्या सर्व बाजूनी बारा राशींची चित्रे आहेत. बाकी ह्या चौकातील दोन्ही बाजूच्या खिडक्या, तिन्ही बाजूला असणारा सज्जा, दोन्ही बाजूची खांबांची रांग हे साधारण गोव्यातील इतर मंदिरांप्रमाणेच आहे. फक्त इथे लाकडाचा वापर केला नाही. सज्जाच्या खालच्या बाजूस भिंतीवर असणाऱ्या देवीच्या विविध मुर्त्या सुबक कोरीव आहेत. ह्या देवळाच्या छताची आतील बाजूही वेगळीच अशी म्हणजे कोनाकृती आणि अतिशय उंच आहे. देवीला पडाच्या स्वरूपात येणारे तांदूळ इतके असतात की तांदुळाचा खच पडलेला असतो. ते आणि इतस्ततः पडलेले तांदूळ खाण्यासाठी चिमण्या मंदिरामध्ये बिनधास्त वावरत असतात.

गाभाऱ्यामध्ये देवीच्या उजव्या बाजूला खंडेरायाची उभी मूर्ती आहे. खंडेरायाने शांतादुर्गेला कुंकळ्ळीला आणले असाही एक समज आहे. देवीचा कौलप्रसादही अनेक लोक घेत असतात. त्यामुळे गर्भगृहाच्या बाहेरील दाराच्या एका बाजूला देवीच्या मूर्तीला कौल लावून घेणारे लोक पाहायला मिळतात. मंदिराच्या डाव्या बाजूला शंकराचे एक छोटे मंदिर आहे. गाभाऱ्यात मधोमध शंकराची पिंडी आणि पिंडीच्या मागच्या भिंतीवर शंकराचा एक सुंदर बोलका फोटो आहे. मंदिराच्या बाहेरूनही तीनही भिंतीवर देवादिकांच्या, नवग्रहांच्या सुंदर कोरीव मूर्ती आहेत. कळसावरही मुर्त्यांचे सुंदर कोरीव काम आहे.

मंदिराला बंदिस्त असे आवार नाही. मंदिराच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या रस्त्याच्या पलीकडे, ऑफिस, सभागृह इत्यादी इमारती आहेत.

.

मंदिरातील धार्मिक कार्यक्रम

दर रविवारी शांतादुर्गेची पालखी असते व त्यानंतर महाप्रसाद असतो. याशिवाय वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम असतात. त्यात सर्वात प्रसिद्ध असते ती शांतादुर्गेची जत्रा. फातर्प्याची जत्रा म्हणून संपूर्ण गोव्यात अतिशय प्रसिद्ध असलेल्या ह्या जत्रेचा रथ अत्यंत प्रसिद्ध आहे. तो पाहण्यासाठी व शांतादुर्गेचे दर्शन घेण्यासाठी भक्तगण गोव्याच्या विविध भागातून लाखोंच्या संख्येने फातर्प्याच्या जत्रेसाठी येतात.

मंदिराचे ठिकाण

शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण देवीचे हे फातर्पा गाव केपे(Quepem) तालुक्यात असून मडगाव पासून साधारण वीस कि. मी. अंतरावर आहे.

गोव्यातील अनेक लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या शांतादुर्गेचे फातर्प्याचे हे मंदिर एकदा तरी भेट द्यावी असे आहे. 

कॅटेगरी Goan Temples