गोवा आपल्या समृद्ध सीफूड परंपरेसाठी प्रसिद्ध आहे. इथे असंख्य प्रकारचे मासे मिळतात. प्रत्येकाची चव अनोखी! छोट्या माशांमध्ये जे अनेक प्रकार मिळतात त्यातला एक प्रकार म्हणजे वेल्ली/वेर्ली (Silver fish). चंदेरी रंगाच्या ह्या छोट्या रुचकर माशाचे जे विविध प्रकार गोव्यामध्ये बनवले जातात, त्यातीलच एक प्रकार म्हणजे वेल्ल्याचे सुके.

वेल्ल्याचे सुके बनवायची पद्धत अत्यंत सोपी. आणि हा पदार्थ करायला वेळही थोडा लागतो. मासे हा गोवन जेवणाचा आत्मा. माशाचे कालवण, भात आणि तळलेल्या माशांसोबत वेल्ल्याचे अथवा कुठल्याही माशाचे सुके असले तर अस्सल मासेबहाद्दराच्या परमानंदी टाळी लागायला वेळ लागणार नाही.

हे सुके बनवायची पद्धतही माशाबरहुकूम बदलते. म्हणजे वेल्ली, सुंगटे असतील तर पद्धत वेगळी आणि तार्लीचे किंवा बांगडुल्यांचे म्हणजे छोट्या बांगड्यांचे सुके असेल तर पद्धत वेगळी.

पारंपारिक गोवन जेवणात मासे हा अविभाज्य भाग मानला जातो. गरमागरम भात, फिश करी आणि तळलेल्या माशांसोबत वाढलेले वेल्लयाचे सुके हे कोणत्याही मासेप्रेमीचे जेवण अधिक स्वादिष्ट आणि परिपूर्ण बनवते.

वेल्ल्याचे सुके कसे करायचे ते आता पाहू.

वेल्ली मासा
पारंपारिक गोवन वेल्ल्याचे सुके बनवण्यासाठी लागणारे साहित्य
  • वेल्ली मासे: २० ते २५
  • खोबरेल तेल: १ टेबलस्पून
  • हळद: ½ टीस्पून
  • हिरव्या मिरच्या: २ (बारीक चिरलेल्या)
  • कोकम (आमसूल): ३ ते ४
  • लाल तिखट: १ टीस्पून
  • कांदा: १ मध्यम आकाराचा (बारीक चिरलेला)
  • ताजे किसलेले खोबरे: १ कप
  • बारीक चिरलेली कोथिंबीर: १ छोटी वाटी
  • मीठ: चवीनुसार 
Velliche Suke
पारंपारिक गोवन वेल्ल्याचे सुके बनवण्याची सोपी कृती
  1. प्रथम वेल्ल्यांची डोकी कट करून खवले काढून टाकावेत. मासा आतून व बाहेरून स्वच्छ करून, दोन तीनदा स्वच्छ पाण्यात धुवून घ्यावा. मासे स्वच्छ धुतले की त्यांना हळद आणि मीठ लावून काही वेळ मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्यावे.
  2. हळद मीठ माश्यांमध्ये मुरेपर्यंत कांदा बारीक चिरून घ्यावा. मिरच्यांचे बारीक तुकडे करावेत.
  3. एका जाड बुडाच्या पातेल्यात थोडे खोबरेल (किंवा तुमच्याजवळ उपलब्ध असलेले कोणतेही तेल) घालावे.
  4. तेल गरम झाले की त्यामध्ये मिरच्यांचे तुकडे, बारीक चिरलेला कांदा घालून थोडे परतून घ्यावे.
  5. कांदा परतल्यावर त्यामध्ये ओल्या नारळाचा किस घालावा. त्यात हळद, तिखटाची पूड आणि मीठ घालून हलवावे आणि थोडेसे पाणी घालून झाकण ठेवून चार पाच मिनिटे शिजू द्यावे.
  6. नंतर त्यामध्ये हळद मीठ लावलेले मासे आणि आमसुले टाकून ढवळून पुन्हा झाकण बंद करावे व आणखीन चार पाच मिनिटे शिजू द्यावे.
  7. पाच मिनिटानंतर झाकण काढून मासे शिजलेत का पाहावे. माशांच्या बदलेल्या रंगावरून मासे शिजल्याचा अंदाज येतो. तसे जर लक्षात येत नसेल तर टूथ पीक किंवा काट्याच्या चमच्याने अलगद टोचून पाहावे. डावाने पुन्हा पुन्हा ढवळू नये. त्यामुळे मासे तुटून सुक्यामध्ये काटे मिक्स होतात.
  8. शिजल्यानंतर त्यावर कोथिंबीर पेरावी आणि गॅस बंद करावा. काही मिनिटे झाकण ठेवून मग गरमागरम वाढावे.

पारंपारिक गोवन वेल्ल्याचे सुके गरमागरम भात आणि माशाच्या करी बरोबर फर्मास लागते. इतर कोणत्याही पारंपारिक गोमंतकीय मांसाहारी जेवणाबरोबर हे वेल्ल्याचे सुके साइड डिश म्हणूनही वाढता येते.

कॅटेगरी Goan Food

error: Content is protected !!