गोव्यामध्ये असंख्य प्रकारचे मासे मिळतात. प्रत्येकाची चव अनोखी! छोट्या माशांमध्ये जे अनेक प्रकार मिळतात त्यातला एक प्रकार म्हणजे वेर्ली (कोंकणी उच्चार वेल्ली). चंदेरी रंगाच्या ह्या छोट्या रुचकर माशाचे जे विविध प्रकार गोव्यामध्ये बनवले जातात, त्यातीलच एक प्रकार म्हणजे वेर्लीचे सुके.
वेर्लीचे सुके बनवायची पद्धत अत्यंत सोपी. आणि हा पदार्थ करायला वेळही थोडा लागतो. मासे हा गोवन जेवणाचा आत्मा. माशाची आमटी, भात आणि तळलेल्या माशांसोबत वेर्लीचे अथवा कुठल्याही माशाचे सुके असले तर अस्सल मासेबहाद्दराच्या परमानंदी टाळी लागायला वेळ लागणार नाही.
हे सुके बनवायची पद्धतही माशाबरहुकूम बदलते. म्हणजे वेर्ली, सुंगटे असतील तर पद्धत वेगळी आणि तारलीचे किंवा बांगडुल्यांचे म्हणजे छोट्या बांगड्यांचे सुके असेल तर पद्धत वेगळी.
तर आज आपण वेर्लीचे सुके कसे करायचे ते पाहू.
साहित्य:
पंधरा ते वीस वेर्ल्या
एक चमचा हळद
दोन हिरव्या मिरच्या
तीन ते चार आमसुले
एक चमचा लाल तिखट
एक मध्यम आकाराचा कांदा
एक मोठी वाटी ओल्या नारळाचा चव
एक लहान वाटी कोथिंबीर
चवीप्रमाणे मीठ
कृती
प्रथम वेर्ल्याचे डोके कट करावे आणि खवले काढून टाकावेत. मासा आतून व बाहेरून स्वच्छ करून, दोन तीनदा स्वच्छ पाण्यात धुवून घ्यावा. मासे स्वच्छ धुतले की त्यांना हळद आणि मीठ लावून बाजूला ठेवून द्यावे. हळद मीठ माश्यांमध्ये मुरेपर्यंत कांदा बारीक चिरून घ्यावा. मिरच्यांचे बारीक तुकडे करावेत.
एका जाड बुडाच्या पातेल्यात थोडे गावठी खोबरेल (किंवा तुमच्याजवळ उपलब्ध असलेले कोणतेही तेल) घालावे. तेल गरम झाले की त्यामध्ये मिरच्यांचे तुकडे, बारीक चिरलेला कांदा घालून थोडे परतून घ्यावे. कांदा परतल्यावर त्यामध्ये ओल्या नारळाचा किस घालावा. त्यात हळद, तिखटाची पूड आणि मीठ घालून हलवावे आणि थोडेसे पाणी घालून झाकण ठेवून दोन चार मिनिटे शिजू द्यावे. त्यानंतर यामध्ये धुतलेले मासे आणि आमसुले टाकून ढवळून पुन्हा झाकण बंद करावे व आणखीन चार पाच मिनिटे मंद आंचेवर शिजू द्यावे.
पाच मिनिटानंतर झाकण काढून मासे शिजलेत का पाहावे. माशांच्या बदलेल्या रंगावरून मासे शिजल्याचा अंदाज येतो. तसे जर लक्षात येत नसेल तर टूथ पीक किंवा काट्याच्या चमच्याने अलगद टोचून पाहावे. डावाने पुन्हा पुन्हा ढवळू नये. त्यामुळे मासे तुटून सुक्यामध्ये काटे मिक्स होतात. शिजल्यानंतर त्यावर कोथिंबीर पेरावी आणि गॅस बंद करावा. वरती झाकण ठेवून थोडा वेळ तसेच ठेवून द्यावे.
गरमागरम भात आणि माशाच्या करी बरोबर हे वेर्ल्याचे सुके फर्मास लागते.