वेंगुर्ला शहर

वेंगुर्ला तालुक्यातील रेडी, अरवली इत्यादी ठिकाणे पाहिल्यानंतर आम्ही वेंगुर्ला शहराच्या दिशेने निघालो. वेंगुर्ला शहर पाहण्याचा हा पहिलाच प्रसंग. दुपारचे साधारण साडे तीन होऊन गेले होते. आधी एखादे हॉटेल बुक करावे, जेवावे आणि नंतर इथे पाहण्यासारखे काय आहे त्याची चौकशी करून बाहेर पडावे असा आम्ही विचार केला होता. परंतु सारे वेंगुर्ला शहर सामसूम होते. सगळी दुकाने बंद होती. हॉटेल्स रेस्टॉरंट्स ही बंद होती. असे बरेच भटकल्यावर  शेवटी एकीकडे चौकशी केल्यानंतर आम्ही बंदर रोडला गेल्यास तिथे हॉटेल किंवा होम स्टे मिळेल असे आम्हास कळले.

आम्ही त्याप्रमाणे बंदर रोडला आलो. तिथे उघडे असलेले एकमेव हॉटेल फुल्ल असल्याचे कळले. म्हणून आम्ही मागे फिरलो. एव्हाना पोटात कावळे ओरडू लागले होते. वाटेतच असलेल्या नवीन बांधलेल्या स्काय ब्रिज पाशी आम्ही थांबलो. नुकतेच पाच वाजत होते. त्यामुळे तिथले गाडे उघडण्याची लगबग चाललेली. एक दोन गाडे सुरु झाले होते पण त्यांच्याकडे खाण्यासाठी तयार काहीच नव्हते. एका गाड्याच्या मालकिणीने पटकन ऑम्लेट करून देते असे सांगितले. ऑम्लेट पाव, चहा घेता घेता आम्ही हॉटेलबद्दल चौकशी केली असता, बाईंनी जवळच मिनिटाच्या अंतरावर असलेल्या होम स्टे बद्दल सांगितले. त्यांना फोन करून लगेच आमचे बोलणेही करून दिले..

मांडवी नेचर्स होम स्टे

सेल्फ हेल्प ग्रुप मधल्या एका महिलेचा हा होम स्टे होता व त्यांच्याकडे एक रूमही अव्हेलेबल होती. आम्ही लगेच मांडवी नेचर्स होम स्टे पाशी पोचलो. जागा बघितली मात्र, इतका वेळ आम्हाला कुठेच हॉटेल वगैरे न मिळाल्याबद्दल मी देवाचे आभारच मानले, इतकी अप्रतिम जागा होती. खोल्या तीनच होत्या. स्वच्छ सुदर, बाजूच्या छान अंगणात फुलझाडे, माड भाज्या वगैरे लावल्या होत्या. मागे खाडी होती. संध्याकाळची वेळ असल्याने पक्षी कलरव करत होते. त्या रस्त्याला फक्त हे एकच होमस्टे होते बाकी घरे, दुकाने काहीच नसल्याने संपूर्ण शांत वातावरण होते. हे सगळे पाहून दिल खुश झाले. शिवाय त्या सेल्फ हेल्प ग्रुप मधल्या दुसऱ्या स्त्रियांची जल सफारीही होती. पक्षी निरीक्षण करायचे असल्यास पहाटे त्या होडीतून पक्षी निरीक्षणासाठी साधारण दीड दोन किलोमीटर जल सफर करता येते. शिवाय अस्सल मालवणी घरगुती खाणेही हवे तसे मिळणार होते. हे सगळे ऐकून दिल खुश झाले.

मांडवी नेचर्स स्टे, वेंगुर्ला

आम्ही लगेचच रूम बुक केली आणि फ्रेश होऊन व थोडा वेळ विश्रांती घेऊन पुन्हा स्काय ब्रिज पाहण्यास आलो. तोपर्यंत बराच काळोख झाला. होता. स्काय ब्रिजचे चित्र आता एकदम पालटले होते. सारा ब्रिज खालचा बीच आणि आजूबाजूचे गाडे माणसांनी फुलून गेले होते. 

स्काय ब्रिज वेंगुर्ला

आम्ही स्काय ब्रिजवरून उतरून खाली बीचवर गेलो. आम्हा गोवेकरांना काही बिचविषयी नावीन्य असत नाही. त्यामुळे तिथे फार वेळ न घालवता आम्ही मागे फिरलो. मासेमारीसाठी गेलेल्या होड्या काठावर वाळूत आणून ठेवण्याची मासेमारांची लगबग सुरु होती. होडीच्या एका बाजूला दोर बांधला होता. तो दोर काही जण ओढत होते. तर होडीच्या दोन्ही बाजूनी असलेले काही जण पूर्ण शक्तीनिशी ती होडी ढकलत होते. आवश्यक ती ऊर्जा आणण्यासाठी त्यांचे एका सुरात ओरडणे सुरु होते, ‘जोर लगाके हैशा’ म्हणतो ना तसेच काहीतरी, पण मालवणी भाषेत!

तेवढ्यात तिथल्या एका महिलांची संख्या जास्त असलेल्या एका होडीसाठी आणखीन लोकशक्तीची गरज होती, तिथून जाणाऱ्या आम्हाला तेवढ्यात त्यांनी हाक घातली. माझ्या दोन्ही मुलांना हा अनुभव नवीन त्यामुळे ती लगबगीने पुढे सरसावली. त्यांना मदत करून घामाघूम होऊन परतली तेव्हा कष्टावर पोट भरणाऱ्यांच्या कष्टाचे मोल त्यांना कळले. प्रवासातून मिळणारा अनुभव आणि अनुभवातून मिळालेले शिक्षण हे शाळा कॉलेजमधील शिक्षणापेक्षा अधिक उपयोगी आहे ते असे; पण त्यासाठी प्रवास हा फक्त विकेंडला मजा करणे इतक्याच उद्देशाने केलेला नसावा.

कांदळवन जल सफारी

दुसऱ्यादिवशीची सुरुवात झाली ती जल सफारीने. सेल्फ हेल्प ग्रुपच्या महिला सकाळी आम्ही पोचण्याआधीच होडीवर वल्ही घेऊन तयार होत्या. पाचही महिला. त्यातली एक पक्षांची आणि बाजूला असलेल्या खारफुटी अर्थात मॅन्ग्रूव्हसची माहित देण्यासाठी होती. मला त्या महिलांचं विशेष कौतुक वाटलं. विशेष करून होडी वल्हविणाऱ्यांचं! त्यांच्या कडून मिळणाऱ्या माहितीतून तसेच त्यांच्याशी संवाद साधताना त्यांची निसर्गाबद्दलची, खारफुटीच्या जंगलबद्दलची व पक्ष्यांबद्दलची प्रेम आणि कळकळ स्पष्ट दिसत होती. पक्ष्यांच्या नावाबरोबरच, वेगवेगळ्या पक्षांबद्दलची वेगवेगळी माहितीही आम्हाला मिळत होती. दिवसाची सुरुवातअशी छान झाल्यानंतर, नाश्ता करून आम्ही तो होम स्टे सोडला.

 

कांदळवन जलसफारी वेंगुर्ला
कांदळवन वेंगुर्ला

वेंगुर्ल्यामध्ये काय पाहायचे ह्या यादीत वेंगुर्ल्याचे लाईट हाऊस प्रथम क्रमांकावर होते. परंतु ते पाहण्याचा योग ह्याखेपेच्या आमच्या सफरीत नव्हता. कारण लाईट हाऊस पाहण्याची वेळ केवळ संध्याकाळी चार ते पाच या दरम्यानच होती. त्यामुळे आम्हाला ते न पाहताच परत फिरावे लागले.

कलादालन वेंगुर्ला

त्यानंतर आम्ही वेंगुर्ल्याच्या नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृह तसेच तिथे असलेल्या कलादालनाला भेट देण्यासाठी निघालो. रविवार असल्याने महापरिषद असलेल्या रस्त्यावरआठवड्याचा बाजार भरलेला. कलादालनाला भेट देण्यापूर्वी सहज बाजारावर एक नजर टाकली. त्यामध्ये मला सगळ्यात आकर्षून घेतलं ते अगदी छोट्या अशा बाल मेथीच्या पेंड्यानी…  ज्या मी प्रथमच पाहत होते.  बाकी बाजार हा विविध प्रकारच्या ताज्या भाज्या, कंदमुळे आणि फळे यांनी भरून गेलेला. तेवढ्यात कलादालन उघडणारी व्यक्ती आली आणि आम्ही छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात प्रवेश केला. छोटंसंच असलेलं ते सभागृह छान शोभून दिसत होते. तिथून आम्ही कला दालनात प्रवेश केला. हे कलादालन म्हणजे एकाच छताखाली उभी केलेली वेंगुर्ल्याची छोटी प्रतिकृती. यामध्ये वेंगुर्ला तालुक्यातील कीर्तिवंतांची माहिती,  पर्यावरण स्थळे, मंदिरे, चर्च, इथली खाद्य आणि कला संस्कृती यांच्याबद्दल सर्व माहिती ह्या कला दालनामध्ये आहे. केवळ माहितीच नाही तर ह्या प्रत्येक स्थानांची, इथल्या परंपरा आणि खाद्य संस्कृतीची मॉडेल्स व फोटोही इथे पाहायला मिळतात.

तर अशी ही केवळ एक दिवसाची वेंगुर्ल्याची भेट संपवून आम्ही पुढे मालवण पाहण्यासाठी निघालो.

वेंगुर्ला-खाद्यसंस्कृती
वेंगुर्ल्याची सागर संपत्ती
कॅटेगरी Konkan