गोव्यातील एक पवित्र स्थान लक्ष्मी नरसिंह मंदिर! वेलिंगच्या ह्या मंदिरात प्रवेश केला आणि मी मंत्रमुग्ध झाले.. अत्यंत पवित्र, शांत, प्रसन्न वातावरण! देवळाचा परिसर अतिशय सुंदर, निसर्गाने नटलेला… सुंदर देवालय, डाव्या मांडीवर बसलेल्या लक्ष्मीसह नरसिंहाची काहीशी उग्र परंतु तितकीच आकर्षक मूर्ती आणि सभोवतालचा निसर्ग अशा तीन रूपांमध्ये देव इथे आपल्याला दर्शन देतो.

 

लक्ष्मी नरसिंह, वेलिंग

भगवान विष्णूचे दोन विशेष अवतार.

नरसिंह आणि मोहिनी हे दोन्ही भगवान विष्णूचे अवतार. अवतार म्हणण्यापेक्षा विष्णूची लीला किंवा माया म्हटलं तर जास्त योग्य होईल असं मला वाटतं. दोघेही प्रगट झाले चांगल्याचे वाईटापासून रक्षण करण्यासाठी, योग्याला आणखीन योग्य मिळवून देण्यासाठी. अयोग्याकडे योग्य पोचले की त्याचा उपयोग हा केवळ दुष्ट हेतूसाठीच होत असतो हे निश्चित.  वाईट माजले की ते कुठलीही गोष्ट समजून घेण्याच्या पलीकडे जातात, त्यावेळी त्यांचं पारिपत्य  हा एकमेव शेवटचा उपाय उरतो.

दोन्ही अवतारांचे स्वतःचे खास वैशिष्ट्य, मात्र उद्देश एकच!

ह्या दोन्ही अवतारात किती जमीन अस्मानाचा फरक! अतिशय लोभसवाणी मनमोहक महालसा मोहिनी, तर अत्यंत भीषण विक्राळ नरसिंह. एक अवतार मोहामध्ये अडकवून दुष्टांना फसवतो. तर दुसरा भीषणाला थेट भयंकर मृत्यूचं दर्शन घडवतो. दुष्टांनी कितीही दुष्टपणा केला तरी जर आपण परमेश्वराची सपशेल शरणागती पत्करली आणि आपल्या भक्तीवर संपूर्ण विश्वास ठेवून ठाम राहिलो तर चमत्कार होतोच होतो हे ह्या दोन्ही अवतारांच्या माध्यमातून आपल्याला शिकायला मिळते.

गोव्यामध्ये नरसिंह आणि मोहिनी ह्या दोघांचीही मंदिरे आहेत. मंगेशीहून अगदी जवळ मोहिनी अर्थात महालसा, म्हार्दोळ मध्ये आणि तिथून जवळच वेलिंग येथे लक्ष्मी नरसिंह मंदिर.

लक्ष्मी नृसिंह मंदिर - कुळागर
लक्ष्मी नृसिंह मंदिर - कळस

लक्ष्मी नरसिंह मंदिराचे स्वरूप

लक्ष्मी नरसिंह मंदिराचे बांधकाम हे गोव्यातील पारंपरिक स्वरूपाचे आहे. देवळाचे गर्भ गृह, समोरील चौक, आणि बाहेर सभामंडप. मंदिरातील चौकात असणारे खांब आणि चौकाच्या सजावटीसाठी प्रामुख्याने लाकडाचा उपयोग केलेला आहे.

मंदिरामध्ये चोहोबाजूनी भिंतीवर नरसिंह पुराणातुन भक्त प्रल्हाद,हिरण्यकशिपू आणि नरसिंहअवताराची कथा लिहिलेली आहे. त्या अनुषंगाने काढलेली चित्रेही अप्रतिम आहेत. मला परमेश्वराच्या सगळ्या भक्तात प्रल्हाद अतिशय आवडतो आणि माझ्या मते भक्त म्हणून प्रल्हाद सर्वश्रेष्ठ आहे. मी मनातल्या मनात त्याला माझा गुरु करून टाकले आहे. कधीही आपली भक्ती डळमळते आहे, आपण कमी पडत आहोत असं वाटलं की मी प्रल्हादाला स्मरते.  

बाहेरील सभामंडपात वरती चारी बाजूनी असलेली वाल्मिकी, विश्वामित्र, व्यासांपासून ते तुलसीदास, ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव पर्यंतच्या ऋषीमुनी, संतांची चित्रेही आपलं लक्ष वेधून घेतात.

 

लक्ष्मी नरसिंह मंदिर, वेलिंग, गोवा

हे मंदिर पूर्वापार आहे त्याच स्वरूपात ठेवलेले आहे. म्हणजे तिथे काही बदल करण्याला देवच आज्ञा देत नाही असं म्हणतात.  त्यामुळे जरी काही डागडुजी केली तरी मूळ स्वरूपात बदल किंवा आधुनिकीकरण अजिबात झालेले नाही. मंदिराच्या समोर एक मोठे तुलसी वृंदावन आहे. परंतु सर्वसाधारणपणे मंदिरासमोर असणारा दीपस्तंभ इथे नाही हे या मंदिराचे आणखीन एक वैशिष्ट्य.

मंदिराला सुशोभित करते पवित्र तळी

मंदिरासमोरची तळीही छान मूळ स्वरूपातच आहे. इथेही कुठेच आधुनिकीकरण नसल्याने काहीसे ओबडधोबड असले तरी तळीच्या आसपास खूप प्रसन्न वाटते. बाजूच्याच डोंगरावरून झरीतून येणारी स्वच्छ, निर्मळ थंड पाण्याची धार ह्या तळी मध्ये उडी घेते. ह्या पाण्याचा गोडवा जीव सुखावून टाकतो.

लक्ष्मी नरसिंह मंदिर तळी

गोव्यातील नरसिंह आणि मोहिनी मंदिर

असे हे सुंदर निसर्गाच्या कोंदणात वसलेले एकदा तरी भेट द्यावे असे लक्ष्मी नरसिंह मंदिर. गोव्याच्या वेलिंग गावातील हे मंदिर मंगेशीपासून साधारण दोन कि. मी. अंतरावर आहे. जवळच म्हार्दोळ येथे महालसेचे मंदिरही आहे.  गोव्याला भेट देऊ इच्छिणाऱ्यांनी मंगेशी दर्शनाबरोबरच लक्ष्मी नरसिंहाचे आणि महालसा नारायणीचे दर्शनही जरूर घ्यावे..

कॅटेगरी Goan Temples