कोण आहे लईराई देवी?
गोव्यातील अनेक देवतांपैकी एक देवी लईराई. तिचा भक्तगणही मोठा! गोव्यातल्या बहुसंख्य लोकांना जरी लईराई देवीबद्दल माहित असले तरी, कामानिमित्त गोव्यात येऊन राहिलेल्यांना तसेच गोव्यातील मंदिरे पाहण्याची उत्सुकता असलेल्या पर्यटकांना मात्र कोण ही लईराई देवी? असा प्रश्न पडतो. लईराई देवीची कथा अतिशय अद्भुत आहे.
लईराई देवी आणि भावंडांची कथा
सुमारे सातशे आठशे वर्षांपूर्वी आठ भावंडे काशी तीर्थ क्षेत्रातून फिरत फिरत दक्षिणेकडे आली. दक्षिणेतील घाटमाथ्यावरून ही भावंडे गोव्यातील डिचोली येथे आली व तिथल्या देवी श्री शांतादुर्गेकडे पाहुणचारासाठी थांबली. शांतादुर्गेने आपल्या दिव्य शक्तीने ही आठ भावंडे देव देवता असल्याचे ओळखले व त्यांना मये येथे जाण्यास सांगितले. शांतादुर्गेच्या सांगण्यावरून ही भावंडे; आज ‘सात मायेची वसका’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मये येथील प्रसिद्ध वडणे या ठिकाणी विश्रांती साठी थांबली. निसर्गाने नटलेल्या ह्या गावात सात बहिणी आणि एक भाऊ अशी ही सुंदर भावंडे लोकांचे लक्ष वेधून घेत होती. पण ह्या सुंदर भावंडांच्या प्रेमळ कथेला एक वेगळेच वळण लागायचे होते. ह्या भावंडामधील प्रेमाच्या बंधाची जणू नशीब परीक्षा घेत होते.
ह्या सात भावंडात थोरली असणाऱ्या केळबाईने, जेवणाची काही सोय करण्याकरता गावातून अग्नी आणण्यासाठी धाकट्या खेतोबास पाठवले. गावात गेलेला बालवयातील खेतोबा, तिथे खेळत असणाऱ्या काही मुलांचा खेळ पाहण्यात रमून गेला. बराच वेळ झाला तरी खेतोबा परतला नाही म्हणून केळबाईने, लईराईस त्याला पाहण्यासाठी पाठवले.
लईराई गावात पोहोचली तो तिला आपला भाऊ खेळ पाहण्यात रमलेला दिसला. हे पाहून लईराई रागावली आणि तिने त्याच्या कंबरेत लाथ मारली. त्यामुळे रागावलेल्या खेतोबाने परतण्यास नकार दिला व तो वाइंगीनी येथे निघून गेला. लईराई एकटीच परत फिरली. थोड्या वेळाने राग शमल्यानंतर तिला आपल्या कृत्याचे वाईट वाटते आणि ती तिथून शिरगावला निघून जाते. आपल्या कृतीचे प्रायश्चित म्हणून ती अग्नी वरून चालण्याचे अग्निदिव्य करते. म्हणून लईराई देवीचे हजारो धोंड आजही निखाऱ्यावरून चालण्याचे अग्निदिव्य करतात. हे सगळे घडण्यास केळबाई स्वतःला जबाबदार धरते आणि मुळगाव येथे निघून जाते. प्रायश्चित करण्यासाठी ती आपल्या डोक्यावर अग्नीचे आगटे घेऊन अग्निदिव्य करते. म्हणून मुळगावच्या जत्रेत डोक्यावर माले घेऊन नाचतात.
आठही भावंडांची आठ स्थाने
ह्या बहिणींना गोव्यातील लोक ग्रामदेवता म्हणून पूजतात. त्यांना माया म्हणजे प्रथम माता मानतात.
थोरल्या बहिणीच्या आज्ञेने इतर भावंडे पुढे वेगवेगळ्या ठिकाणी स्थायिक झाली.
शिरगांव येथे लईराई, मुळगाव येथे केळबाई, मये येथे महामाई, म्हापशाला मीराबाई अर्थात मिलाग्रेस, मोरजी येथे मोरजाई, अंजदीप ह्या कारवार येथील द्विपावर आजादीपा, शीतलाई अरबी समुद्राच्या तटावर आणि देव खेतोबा वायंगिनी येथे. अशा आठ ठिकाणी ह्या आठ भावंडांची मंदिरे आहेत.
ही भावंडे वर्षातून एकदा भेटवस्तू घेऊन एकमेकांना भेटतात असे गोव्यातील सर्व भाविक मानतात.
ह्या सात बहिणीतील एक मीराबाई म्हणजे सध्याची म्हापसा येथील आवर लेडी ऑफ मिरॅकल्स अर्थात मिलाग्रेस. पोर्तुगीजांच्या कारकिर्दीत ह्या मीराबाईचे मंदिर नष्ट करण्यात आले. पुढे ह्या मीराबाईने मिलाग्रेसचे रूप धारण केले असे मानले जाते.
दोन संस्कृतींचा मिलाफ
ह्या मिलाग्रेस सायबिणीचे फेस्त असते तेव्हा शिरगांव येथील लईराईच्या देवस्थानातून तेल अर्पण करण्याची प्रथा आजही पाळली जाते. तर शिरगांवच्या जत्रेच्या वेळी मिलाग्रेस देवीच्या चर्च मधून लईराई देवीला प्रिय असलेली मोगऱ्याची फुले अर्पण केली जातात. परंपरेनुसार ईस्टर नंतरच्या तिसऱ्या सोमवारी मिलाग्रेसचे फेस्त साजरे केले जाते. देवी लईराईची जत्रा वैशाख शुद्ध पंचमीला असते. हे दोन्ही उत्सव एकाच वेळी येण्याचा योग बऱ्याच वर्षातून कधीतरी जुळून येतो. अशावेळी हिंदू आणि कॅथलिक दोघेही देवीची आणि सायबिणीची अत्यंत श्रद्धेने आणि उत्साहाने पूजा करतात. दोन वेगवेगळ्या संस्कृतींचा सुंदर मिलाफ ह्या दोन देवतांच्या रूपाने पाहायला मिळतो.
अशी आहे ही लईराई देवी आणि तिच्या भावंडांची अद्भुत कथा.