रशेद मसाला (Recheado masala) हा गोवन मसाल्याचा एक प्रकार आहे. रशेदो ह्या पोर्तुगीज शब्दाचा अर्थ आहे stuffed. भरलेल्या माशासाठी ह्या मसाल्याचा वापर विशेषतः केला जातो. माशांबरोबरच चिकन, पनीर आणि भाज्यांमध्येही ह्या मसाल्याचा वापर करता येतो. परंतु ह्या मसाल्याची जोडी परंपरेने माशाबरोबर आणि ती ही बांगड्याबरोबर छान जमते. रशेद बांगडा हा पदार्थ म्हणजे माझ्या मते रुचकरतेची परमावधी आहे. बांगड्याशिवाय पापलेट आणि चणक इत्यादी माशांसोबतही हा मसाला फर्मास लागतो.
तिखट, आंबट, गोड चवीचा हा मसाला बनवणं अत्यंत सोपं आहे.
हा मसाला बनवताना लागणारे साहित्य आणि बनवण्याची पद्धत पुढे देत आहे.
रशेदो मसाला बनवण्यासाठी साहित्य:
- १५ ते २० काश्मिरी मिरच्या
- १ कांदा
- १ मोठी लसूण (१० ते १२ पाकळ्या)
- १ इंच आले
- १ ते दिड इंच दालचिनी
- लहान लिंबाएवढी चिंच
- ८ ते १० लवंगा
- १/४ चमचा हळद
- अर्धा लहान चमचा जिरे
- २ लहान चमचे साखर
- १ चमचा (चवीनुसार) मीठ
- व्हिनेगर
कृती
- प्रथम अख्खा कांदा गॅसवर चांगला भाजून घ्यावा. हा कांदा थंड झाला की त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यावेत.
- एका बाऊल मध्ये भाजलेल्या कांद्याचे तुकडे, काश्मिरी मिरची आणि वरील सारे मसाले एकत्र करावेत.
- त्यामध्ये साधारण लहान वाटी व्हिनेगर घालून ते तासभर मुरू द्यावेत.
- एका तासानंतर हे मिश्रण अजिबात पाणी वगैरे न घालता जाडसर वाटून घ्यावे. आवश्यक वाटल्यास वाटताना थोडे व्हिनेगर घालावे पण पाणी घालू नये.
फ्रिज मध्ये ठेवल्यास रशेद मसाला आठवडाभर टिकू शकतो.