आपल्या विशेष चवीने बांगडा अनेक लोकांचा आवडता बनलेला आहे. गोव्यामध्ये तर ह्या बांगड्याचे अनेक प्रकार केले जातात. जसे बांगड्याचे सुके, बांगड्याचे आमट तीख, बांगड्याचे हुमण (fish curry) इत्यादी. इतकेच नाही तर बांगड्याचे लोणचे सुद्धा केले जाते. त्यातील आपल्या विशेष चवीने सर्वप्रिय असलेला असा बांगड्याचा एक प्रकार म्हणजे रशेद बांगडा (Recheado Bangado). रशेद मसाला भरून फ्राय केलेला हा बांगडा अतिशय रुचकर लागतो.
रशेद बांगडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती
साहित्य :
चार-पाच मध्यम आकाराचे बांगडे
रशेद मसाला
गावठी खोबरेल
रवा
हळद
मीठ
कृती :
बांगडे स्वच्छ धुवून ते एका बाजूने कट करून घ्यावेत. हवे असल्यास वरच्या बाजूनेही त्याला तिरपे स्लीट्स करावेत. माशांना थोडे हळद आणि मीठ लावून काही वेळ ठेवावे. मसाल्यामध्ये मीठ असल्याने माशांना मीठ लावताना ते जास्त होणार नाही याची काळजी घ्यावी. ह्या माशांच्या कट्स मधून रशेद मसाला भरावा. बाहेरील दोन्ही बाजूनेही मसाला लावून घ्यावा. अर्धा तास हा मसाला भरलेला मासा तसाच ठेवावा म्हणजे मसाला माशामध्ये छान मुरतो. नंतर एक एक मासा रव्यामध्ये घोळून घ्यावा. एका फ्राइंग पॅन मध्ये आवश्यक तितके तेल घालावे. तेल चांगले गरम झाले की त्यात मासे मध्यम आंचेवर दोन्ही बाजूने छान तळून घावे.
बांगडा प्रिय असलेल्यांनी हा रशेद बांगडा (Recheado Bangado) एकदा तरी चाखावाच.